आठ दिवस घरात असलेली रक्कम खात्यावर भरण्यासाठी थांबलो होतो. नोटा बदलून घेण्याची गरज भासली नाही. बँक खाते आहे. त्या खात्यावर रक्कम भरली आणि लगेच बेअरर चेक नि थोडी रक्कम काढून घेतली. बँकेचे कर्मचारी कल्पना करवणार नाही इतके चांगले वागत होते. सगळ्या खाजगी बँकेत हाच अनुभव येतोय असे लोक बोलतात.
मध्यम वर्गीय आनंदित !!!!
या सर्व ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याच्या देश व्यापी मोहिमेत सर्वात अधिक आनंदित झाला असेल तर तो , नवं श्रीमंत लोकांचे उन्माद पाहून हतबल झालेला सुशिक्षित ,पापभिरू पांढरपेशा वर्ग.ज्यांची दरवाजावर उभी राहण्याची लायकी नाही अशा लोकांकडे प्रचलित राजकारणाच्या मुळे आलेली सुबत्ता पाहून हा सुशिक्षित माणूस पुरता वैफल्य ग्रस्त झाला होता.या देशात प्रामाणिक कामाला किंमत नाही हेच ठाम मत या लोकांचे झाले होते .हे चित्र कुणी बदलू शकेल यावरील विश्वास उडाला होता. राजकारण हे फक्त सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठी असते हेच मत समाजातील मध्यम वर्गाचे झाले होते.
हा मध्यम वर्गीय पापभिरू माणूस कधीतरी चांगले दिवस येतील आणि आपण नाडले जाणार नाही या भाबड्या आशेवर जगत आला आहे.काही मध्यम वर्गीय ज्यांच्या घरात आजारपण ,लग्नकार्य इत्यादी आहे ते जरा या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेने नाराज झालेले वाटतात .पण हे एक त्यांचे वयक्तिक कारण सोडले तर हि नाराजी फार काळ टिकणारी नाही.कारण हा धक्का तात्कालीन आहे. साधारण दोन आठवड्यात परिस्थिती सुरळीत होणार आहे. त्यानंतर त्या निर्णयाचे सरकारला अपेक्षित असलेले परिणाम दिसू लागले, तर आजची नाराजी उद्या पाठींब्यातही बदलू शकते.
गोरे गेले पण काळे प्रचंड लबाड निघाले.!!!
होऊ घातलेल्या मतदानात व निवडणूकीत काळ्यापैशाचा वापर घटणार याविषयी मतभेद होण्याचे कारण नाही. खरेच तसे घडले, तर गावागावातल्या सामान्य माणसाला त्याची पहिली प्रचिती येऊ शकेल. कारण तिथले गुंड वा खंडणीखोर काळापैसा बाळगणारे, लोकांना परिचीत असतात. त्यांची पैशाअभावी होऊ शकणारी तारांबळ लपून रहाणारी नाही. पैशाच्या बळावर गुंडगिरी करून निवडणूका जिंकणार्यांना पायबंद घातला गेला, तरी लोक खुश होऊ शकतात.
दुसरी बाब आहे, पैशाच्या बाजारातील मूल्यवृद्धीची! मोठ्या प्रमाणात लपवलेल्या बेहिशोबी नोटा व खोटे चलन व्यवहारातून बाद झाले, तरी त्याचा खर्या हिशोबी व्यवहाराला लाभ मिळू शकतो. त्याचा अर्थ साठेबाजी वा काळाबाजारी करण्याला आळा बसु शकतो. त्याचा प्राथमिक लाभार्थी सामान्य जनताच असते.
सामान्य जनता जेव्हा पाठिंबा देते तेव्हाच कुठलीही आंदोलने यशस्वी होतात ॰ सरकारी निर्णया बाबत सुद्धा हेच तत्व लागू आहे.
देश सुधारण्याची प्रक्रिया ही सततची असली पाहिजे॰ निवडणुकी पूर्वी घेतलेले निर्णय कधी कधी औट घटकेचे ठरतात.या निर्णयाचे असे होऊ नये हीच पंतप्रधानांकडून अपेक्षा —
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply