कोकणातली खूप मंदिरे…
सागरकाठावरी!
भक्ती गाठते मुक्तीकिनारा,
बसून लाटांवरी!
कृतज्ञतेचे मीठ सांडते,
रात्रंदिन येथे,
जाळ्यामध्ये येती धावत,
माशांचेच जथे!
आकाशाचा रंग पांघरून
स्वच्छ निळे पाणी
ओठावरती लाटांच्या तर,
फेसांची गाणी!
होड्या झुलती दबा धरुनिया,
पकडाया मासे,
शकुनी मामा होऊनी कोळी,
जाळ्यांचे फासे!
समुद्र भेटे जिथे नभाला
क्षितीजरेषा निळी!
सांजसूर्य भेटाया येता,
क्षितीज त्याला गिळी!
दगडांचा आडोसा पाहून,
कुजबुज करते प्रेम,
चोरून बघणारांची दृष्टी,
अचूक साधी नेम!
विश्रांती ना चुकून घेती,
लाटा दमल्या तरी,
ओंकाराला स्मरते येथे,
वाऱ्यातून वैखरी!
अहंपणाचा अंश उरेना,
ऐकून सागरगाज!
आत्मपरीक्षण करता येते,
माजालाही लाज!
– प्रमोद जोशी
102 निर्मल अपार्टमेंट्स, श्रीकृष्णनगर,मु.पो. जामसंडे,
ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग-416612. 9423513604
Leave a Reply