नवीन लेखन...

‘बिनाका गीतमाला’ ची सुरुवात

बरोबर ६९ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी बिनाका गीतमाला ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली.

हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत.

बीनाका गीतमाला’ची जन्मकथा.

”बिनाका गीतमाला’चे स्वरूप काय होते? तर हा कार्यक्रम म्हणजे केवळ सर्वाधिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम नव्हता, तर हा कार्यक्रम हेही सांगत असे की, गेल्या आठवडयात कोणती हिंदी चित्रपटगीते कोणत्या क्रमाने लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटगीतांच्या लोकप्रियतेची अशी क्रमवारी केवळ बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने सतत ४१ वर्षे जाणकारांपर्यंत पोहोचवली.

हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीतील ही अशी माहिती बिनाका गीतमाला सुरू होण्याआधी म्हणजे १९५२ पूर्वी आणि बिनाका गीतमाला संपल्यानंतर म्हणजे १९९४ नंतर कोणत्याही कार्यक्रमाने ठेवली नव्हती व ठेवली नाही.

हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासाच्यादृष्टीने बिनाका गीतमालाचे फार मोठे योगदान आहे. ७७ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासातील जवळ जवळ ४१ वर्षांची ही नोंद फार महत्वपूर्ण ठरते. त्या संदर्भातील खूप महत्वाची माहिती या नोंदीत समाविष्ट आहे.

जेव्हा टीव्ही नव्हता त्याकाळात सामान्य रसिकांना गाणी ऐकण्यासाठी रेडिओचीच गरज लागत होती, आजच्या इतका जाहिरांतीचा भडीमार नव्हता त्या काळात एका टुथपेस्टचा खप वाढविण्यासाठी हा कार्यक्रम असूनही हा कार्यक्रम फिल्मी गीतासाठीच आहे, असे वाटावे असे याचे स्वरूप होते.

बिनाकासारखे कार्यक्रम वारंवार तयार होत नसतात. रसिकांची आजची नवी पिढी या कार्यक्रमाचे तसे महत्त्व जाणू शकणार नाही, पण मागच्या एका पिढीचे भावविश्व या कार्यक्रमाशी गुंतलेले होते. अमीन सयानी यांचा आवाज ह्या कार्यक्रमाचा आत्मा होता. निवेदनशैलीचे आदर्श म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघावे असे अमीन सयानी बिनाका गीतमाला कार्यक्रमाचे निवेदन करीत असत. त्यांच्या आवाजातील गोडवा, मार्दव, रसिकांशी संवाद साधण्याची शैली ही श्रोत्यांशी नाते जोडून गेली होती.

‘सीबा गायगी ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीने तयार केलेली बिनाका टुथपेस्ट व टुथब्रश यांची जाहिरात कशा पध्दतीने करावी याचा विचारविनिमय कंपनीचे मॅनेजर करत होते. त्याकाळात रेडिओ सिलोन इंग्रजी आणि हिंदी सेवा अशा दोन भागातून आपल्या श्रोत्यांचे मनोरंजन करत असे. त्यापैकी इंग्रजी विभागातर्फे लोकप्रिय गीतांचा ‘हिट परेड’ नावाचा एक कार्यक्रम सादर होत असे. त्याची लोकप्रियता पाहून (म्हणजे त्याकाळात दर आठवडयाला ९०० पत्रे येत असत) असाच एखादा कार्यक्रम हिंदी विभागातर्फे प्रसारित करावा असे रेडिओ सिलोनच्या व्यवस्थापनाने ठरविले आणि त्याचवेळी सीबा गायगी कंपनीच्या व्यवस्थापकांकडेही विचारणा झाली आणि त्यातूनच एका नव्या कार्यक्रमाचा जन्म झाला आणि त्याची रूपरेषा ठरली.

३ डिसेंबर १९५२ रोजी, बुधवारी, रात्री ८ ते ८.३०, यावेळेत बिनाकाचा पहिला कार्यक्रम सिलोन आकाशवाणीवर प्रसारित झाला. याबाबतीत निवेदक अमीन सायानी यांनी म्हटले होते ”साल है १९५२! जिसमे एक नौजवान ब्रॉडकॉस्टरसे कहा गया है की वह एक्सपेरिमेंट के तौरपर ‘गीतमाला’ नामका एक रेडिओ प्रोग्रॅम लिखे, प्रोड्यूस करे और खुदही उसे पेश करे जिसके लिए उसे हर हप्ते २५ रुपये दिये जाएंगे…जी हाँ, वो नौजवान ब्रॉडकॉस्टर मैं ही था….खैर तो प्रोग्रॅम तैयार हुआ, ब्रॉडकॉस्ट हुआ और पहलेही हप्तेसे दाखील हो गया सुननेवालोंके दिलोंमें….”

बिनाका गीतमालाशी सबंधित जी कॅसेट पुढे कालांतराने एच.एम.व्ही कंपनीने तयार केली. त्यामधील अमीन सयानी यांच्या आवाजातील हे…आहे. आणि ”पहलेही हम दाखील हो गया सुननेवालोंके दिलोंमे…..” हे शब्दश: खरे आहे.
१९५२ मध्ये बिनाका गीतमालाचे फक्त पाचच कार्यक्रम प्रसारित झाले, त्या तारखा होत्या ३ डिसेंबर, १० डिसेंबर, १७ डिसेंबर, २४ डिसेंबर, आणि ३१ डिसेंबर!

‘आन, दाग’ तसेच ‘बैजूबावरा’च्या गीतांनी तेव्हा अमीन सयानी यांच्या भाषेत ‘धुम मचाई थी!’ प्रचंड लोकप्रिय गीतांच्या बाबतीत अमीन सयानी यांनी रूढ केलेला हा शब्दप्रयोग ‘धुम मचाई थी!’ अशा अनेक गोष्टी बिनाका गीतमालामधून रूढ केल्या होत्या.

‘बहनों और भाईयो’ असे म्हणत गेली कित्येक वर्ष अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत आहेत.

एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो. तो आवाज २१ डिसेंबर रोजी ८८ वर्षे पूर्ण करत आहे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..