१८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात मडगाव इथे सभाबंदीचा हुकूम मोडून जाहीर भाषण केले आणि गोवामुक्तीच्या चळवळीला प्रारंभ झाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता.
सुमारे ४५० वर्षांपूर्वी पोर्तुगालचा अल्फान्सो आल्बुकर्क गोव्यात घुसला, तेव्हा तिथे आदिलशहाची हुकूमत होती. ६००० मुसलमानांच्या रक्ताचे पाट वाहवून त्याने गोवा जिंकला होता. त्यांना गोव्यात त्यांचे राज्य, धर्म आणि व्यापार उदीम वाढवायचा होता. धर्मातराची जबरदस्ती, जुलमी अत्याचार यातून पोर्तुगीजांनी आपले बस्तान बसविले होते. खरे तर, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लष्करी कारवाई करून गोवामुक्ती शक्य होती, परंतु पं. नेहरू यांनी लष्करी वापर न करण्याची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती. गोवा व भारतीय जनतेच्या आंदोलनाने जनमताचा रेटा यावा असे त्यांना वाटत होते.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय स्वातंत्र्याचे वारे गोव्यात पोहोचले होते. त्यातून गोवामुक्तीचे स्वप्न आकार घेऊ लागले. महाराष्ट्र आणि गोवा यांतील बंध आधीपासूनच घटत होता. गोव्यातून महाराष्ट्र आणि बंगालमधील स्वातंत्र्य सैनिकांना मदत मिळत होती. १९२८ च्या सुमारास मुंबईत गोवा काँग्रेस समितीची स्थापना झाली. डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भूमिगत चळवळ सुरू झाली. १९२९ मध्ये भारतीय काँग्रेसमध्ये गोवा काँग्रेसला सामावून घेतले गेले. १९४५ नंतर दुसऱ्या महायुद्धात जगभर साम्राज्यवादी शक्ती निष्प्रभ होऊन स्वातंत्र्यवादी चळवळींना बळ मिळाले. याचा फायदा गोवामुक्ती संग्रामालाही निश्चितपणे झाला. गोव्यात सुरू झालेली सत्याग्रही चळवळ पोर्तुगीजांनी निर्घृणपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात येऊन ठेपल्यामुळे १९४६ मध्ये काँग्रेसने गोवामुक्तीची लढाई जाहीरपणे लढायचे ठरवले. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात मडगाव इथे सभाबंदीचा हुकूम मोडून जाहीर भाषण केले आणि गोवामुक्तीच्या चळवळीला प्रारंभ झाला.
या चळवळीने सगळीकडे हरताळ, मोर्चे यांनी वातावरण तापले. पोर्तुगीज सरकारची ही जुलूमशाही आणि आंदोलनाला मिळणारा जनतेचा तीव्र प्रतिसाद या पाश्र्वभूमीवर नेहरूंनी १७ डिसेंबर १९६१ रोजी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारतीय सैन्य गोव्यात घुसवण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील जनतेने सैन्याचे स्वागत आणि सहकार्य केले. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले.
अनेक वर्षे राष्ट्रप्रेमी गोवा क्रांती दिनाला हात कात्रो खांब ओल्ड गोवा येथे या स्मारकाच्या ठिकाणी एकत्रित येवुन बलिदानांचे स्मरण व आदरांजली अर्पित करतात.
Leave a Reply