आज महाराष्ट्रातील बेंदूर सण. या दिवशी शेतकरी आपल्या रानधन्याला सजवतो. शेतीसाठी वर्षभर तो राबल्याबद्दल, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो… या सणावरुन मला माझ्या एका मित्राची आठवण होते.. त्याचं नाव मोहन!
याचा वाढदिवस असतो, एक मे रोजी. त्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून सार्वजनिक सुट्टी असते. तो या दिवसाला ‘बैलपोळा’ म्हणतो. त्याच्या म्हणण्यानुसार घरातील कर्ता कर्ता पुरुष ‘कामगार’ होऊन, वर्षभर राबतच असतो, पोळ्याला गोडधोड करतात.. अगदी तसंच त्याच्या वाढदिवसाला घरातले करतात…
हा मोहन, खरं तर रमेशचा मित्र. तो रहायचा पुणे विद्यार्थी गृहासमोरील, नृसिंह मंदिराच्या शेजारील वाड्यात. त्याचं शिक्षण झालं, पुणे विद्यार्थी गृहात. तेव्हापासूनची रमेशशी त्याची मैत्री..
मोहन साधारण उंचीचा, अर्धवट रेशमी केस मागे वळविलेला, रंगाने सावळा, सिगारेटने काळवंडलेल्या ओठाने हसताना पडलेल्या दाताची पोकळी दाखवणारा, महिनाभराची दाढी मिशा वाढवलेला, अंगात चेक्सचा निळ्या रंगाचा शर्ट, डार्क कलरची पॅन्ट व पायात चपला असा दिसायचा.
त्याचा वडिलोपार्जित प्रिंटीग प्रेस होता, पेशवे पार्क जवळील आदमबाग शाळेशेजारील, एका बिल्डींगच्या तळघरात. ट्रेडल मशीनवर तो काम करीत असे. छोटी मोठी डिझाईन करुन घेण्यासाठी मोहन आमच्या घरी येत असे.
आला की, त्याचा पहिला प्रश्र्न… ‘चहा तू पाजणार आहेस की, मी पाजू?’ मग त्याची सिगारेट ओढून होईपर्यंत, गप्पा मारत आमचं चहा पिणं चालू रहायचं.
डी. जी. कॉपिअर्सच्या दामले बंधूंपैकी मोठा त्याचा वर्गमित्र तर धाकटा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा माझा वर्गमित्र! झेरॉक्सचं कोणतंही काम असेल तर आम्ही डी.जी. कडेच जायचो.
मी मराठी चित्रपटांचे स्थिरचित्रणाचे काम करतो, हे त्याला ठाऊक होतं. मोहनला प्रत्यक्ष शुटींग पहाण्याची फार इच्छा होती, मात्र त्याची ती इच्छा, कधीच पूर्ण झाली नाही.. एका दृष्टीनं ते बरंच झालं, कारण त्याच्या ज्या काही अनाठायी शंका होत्या, त्यांचं समाधान होणं अशक्य होतं…
त्याला शुटींग चालू असताना हे पहायचं होतं की, एखाद्या प्रेमप्रसंगाचं शुटींग चालू असताना नायक नायिकेची मानसिक स्थिती नेमकी कशी असते? त्यांच्या मनात काय भावना असतात? आणि त्याचं शुटींग कसं केलं जातं? या त्याच्या प्रश्नांना मी दिलेल्या उत्तराने समाधान झालं नाही… आणि त्याची ही इच्छा, अधुरीच राहिली..
त्यानं एकदा पांढऱ्या रंगाच्या ऑईल पेंटचा छोटा डबा व ब्रश आणला व म्हणाला, ‘चल, एक छोटंसं काम करायचंय.’ मी त्याच्या बरोबर प्रेसवर गेलो. प्रेसच्या वर एक उडपी हॉटेल होतं. त्याला वन बाय टू चहाची ऑर्डर देऊन तळघरात गेलो. चहा झाल्यावर त्याने दारावरती ‘सुगंधा मुद्रणालय’ असं माझ्याकडून लिहून घेतलं.
पावसाळ्यात त्याच्या तळघरातील प्रेसमध्ये, फूटभर उंचीचं पाण्याचं तळं होतं असे. पंपाने सगळं पाणी काढल्यावरच तो काम करु शकत असे.
मोहनच्या बंधूचं, लक्ष्मी रोडला वधू-वर सूचक केंद्र होतं. तो रहायला कात्रज-आंबेगाव हायवेला होता. एकदा त्यानं रविवारी घरी बोलावलं. मी पत्ता शोधत गेलो. रस्त्याच्या थोड्याशा चढावर त्याचं घर होतं. घराच्या मागे विहीर होती. घरातल्या पुढच्या बाजूला त्याची पीठाची गिरणी होती. घराच्या एका बाजूला मोठी मोकळी जागा होती. चहापाणी झालं. त्यानं मुलाची व मुलीची ओळख करुन दिली. दोघेही अभ्यास करीत बसले होते. वहिनी स्वयंपाकघरात होत्या.
मोहनने एक पेटारा उघडला व त्यानं जमविलेल्या मासिकांचा गठ्ठा मला सुपूर्द केला. त्यानं कधीकाळी इंग्रजी डेबोनेअर मासिकं झपाटल्यासारखी गोळा केली होती. आता मुलं कळती झालीत, हे पाहून त्यानं ती मला दिली.
कधी ऑफिसवर आला की, तो नवीन पाहिलेल्या चित्रपटाबद्दल बोलत असे. विशेषतः इंग्रजी चित्रपट तो राहुल टॉकीजला जाऊन पहात असे. मुलांनी कधी चित्रपटासाठी हट्ट केला तर, त्यांना योग्य वय झाल्यावर नक्की घेऊन जाईन, असं त्यानं वचन दिले.. नंतर ते पाळले देखील! दोन्ही मुलं मोठी झाल्यावर, त्यांना राहुल टॉकीजला लागलेला ‘ ‘फक्त प्रौढांसाठी’ असलेला चित्रपट तो दाखवून आला..
मोहनच्या एका मित्राचं शनिपार जवळ दुकान आहे. त्या मित्राला कुठे बाहेर फिरायला जाण्याची इच्छा झाली की, तो मोहनला बोलावून घेतो. मग खेड शिवापूरसारख्या ठिकाणी जाऊन यथेच्छ गप्पा व खाणं करुन मोहनला त्याच्या घरी सोडतो.
एकदा मोहनने ऑफिसवर येऊन एक प्लॅन दाखवला. त्याच्या घरातल्या जागेत एखादं हॉटेल बांधायचं ठरलं तर ते कसं करता येईल, ते त्यात आर्किटेक्चरनं दाखवलेलं होतं. एका शेट्टीशी त्याची बोलणी चालू होती. दरम्यान त्याचा प्रेस बंद झाला होता. त्या जागेच्या मिळालेल्या मोबदल्यावर त्याचं घर चाललं होतं.
त्याला एक ट्रकने मालाची ने-आण करणारा मित्र भेटला होता. त्याच्याबरोबर तो कोल्हापूर, बेळगांव पर्यंत जाऊन आला. तिथे मल्याळी चित्रपट पाहिले. भेटल्यावर तो मला सगळं प्रवासवर्णन सांगायचा.
आमच्या भेटीगाठी आता कमी होऊ लागल्या होत्या. कधी कात्रजच्या २ नंबरच्या बसमध्ये तो दिसायचा. शनिपारला आम्ही दोघे उतरायचो, तो त्याच्या मित्राकडे व मी ऑफिसला जात असे.
काही वर्षांपूर्वी बालाजी नगरमध्ये मी रस्ता क्रॉस करताना माझा फोन वाजला, मी ‘हॅलो’ म्हटल्यावर मोहनने रस्त्यावरील आवाजावरुन ओळखलं की, मी गडबडीत आहे..तो म्हणाला निवांत असताना फोन कर…
दिवस, महिने, वर्ष गेली.. मी काही मोहनला फोन करु शकलो नाही. कदाचित आता मोहनच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली असेल.. मुलगा नोकरीला लागून त्याचंही लग्न झालेलं असेल… मोहन घराच्या पडवीत खुर्ची टाकून सिगारेट ओढत असेल… आणि त्या निघणाऱ्या धुम्रवलयातून दिसणाऱ्या, त्या स्वप्नातल्या ‘गार्डन हॉटेल’कडे टक लावून पहात असेल….
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-७-२१.
Leave a Reply