नवीन लेखन...

मुंबैची BEST बस..

आज आपल्या लाल चुटूक बसचा वाढदिववस..!

बरोबर ९२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, म्हणजे १५ जुलै १९२६ रोजी, मुंबैतली पहिली बसगाडी कुलाब्यातील अफगाण चर्च ते क्राॅफर्ड मार्केट या रुटवर धावली होती, ती अजुनही धावतेच आहे..!!

मला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो.

बसचा प्रवासच मनोरंजक असतो असं नाही, तर बस स्टाॅपवर बसची वाट पाहाणं, हा प्रकारही आनंददायी असतो. बसची वाट पाहाणारे प्रवासी, त्यांची चुळबूळ, राग किंवा स्थितप्रज्ञता, नविनच आलेल्या माणसाचा बसच्या रुट नंबरांचा गोंधळ, आलेल्या बसमधे मुसंडी मारून घुसणारे किंवा सर्वजण चढल्यानंतर शांतपणे आत चढणारे, लटकणारे (बसच्या दोन्ही दरवाजांना लटकणारी माणसं पाहून मला तरी अंगा-खांद्यावर दोन-चार आणि पोटातही एखाद-दुसरं पोर असलेल्या लेकुरवाळ्या माऊलीचीच आठवण होते..), ठराविक सीट मिळणार नसेल तर बस सोडणारे तपस्वी, अशी कितीतरी सॅम्पल्स. कितीदा तरी आयुष्यातं डेस्टीन्शन हेच हवं, असं वाटायला लावणारी ‘स्थळं’ही असतात. आताही दिसतात अशी स्थळं, पण पूर्वीच्या त्या कितीतरी बशी चुकल्या त्या चुकल्याच..! पण काय करणार, आशा अमर असते आणि चमत्कार कधीही घडू शकतो, असं माझ्या पुराणकथा वाचत मोठ्या झालेल्या (पण मनाने तरुणच असणाऱ्या) माझ्या मनाला वाटतं आणि मग स्थळं दिसू लागतात..

मुंबैची लोकल गाडी माणसांना घेऊन जाते, तर बसगाडी माणसांतून जाते. बरीचशी घड्याळाबरोबर चालणारी लोकल काहीशी यांत्रिक वाटते, तर घड्याळाला फारशी न जुमानणारी बस मला अधिक मानवी वाटते. तिच्यात माणुसकी असते. माणुसकीच्या ऐवजी ‘बस’की म्हणू फारतर..! ट्रेनमधे माणसं चढली की नाही याचा विचार न करता ती चालू होते, तर एखादी वृद्ध किंवा अपंग व्यक्ती नीट चढून स्थानापन्न झाल्याशिवाय बस सुटत नाही. अर्थात याला अपवाद आहेत, पण ते अपवादच.

मी सकाळी रोज ज्या बसने जातो, त्याच बसला एक २५-२६वयाची देखणी तरुणी असते. देखणी, परंतू दोन्ही पायांनी अधू. कुबड्या अधिक पायाला कॅलिपर्स लावून ती प्रवास करते. तिला बसमधे चढायलाच किमान ४ मिनिटं लागतात आणि तेवढा वेळ ती बस स्वत: आणि मागचं सर्व ट्राफिक थांबवून ठेवते. एखादा प्रवासी कटकट करतो, तर डायव्हर त्याला त्याच्या मराठवाडी टोनमधे बोलून गप्प करतो. गेले वर्षभर मी हे कौतुक बघतोय. तिची आणि तिच्यासारख्या अनेक गरजुंची निगुतीने काळजी घेणारी बस मला मग अधिकच आवडायला लागते..ही अगत ट्रेनच्या प्रवासात नाही..!!

अश्या ह्या माझ्या प्रिय लाल डब्याला आज ९२ वर्ष पूर्ण झाली. तिचं वय जाणवत नाही, कारण ती सतत चालत असते. ‘थांबला तो संपला’ ह्या म्हणीचा अर्थ बीयश्टीच्या बसकडे पाहून अधिक चांगला कळतो..

या ९२वर्षांच्या प्रवासात तिचं रुपडं अनेकदा बदललं, पण तिचा जिव्हाळा मात्र तोच त्याकाळचा राहिलाय..

माझी ही आवडती बस, हिचं पालकत्व सांगणार् स्वार्थी राजकारणी आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडूनही या पुढेही अशीच चालत राहाणार, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाचं तिच्यावर प्रेम आहे. आणि प्रेमातच सर्व संकटाना पुरून उरण्याची ताकद असते..

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..