नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित रे

पथेर पांचाली,अपराजितो,अपूर संसार,(‘अपू चित्रपटत्रयी’), अभिजन, चारुलता, शतरंज के खिलाडी आणि असे अनेक दर्जेदार चित्रपट देणारे सत्यजित रे. त्यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे झाला. सत्यजित रे यांना प्रेमाने “माणिकदा‘ असे ही म्हटले जाई. नावाप्रमाणे ते भारतीय सिनेमातील एक “माणिक‘ होते. अमूल्य रत्न होते. सत्यजित रे यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, कलेच्या ओढीमुळे १९४० साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतन मध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार-कलातज्ञाचे तेथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. तेथून बाहेर पडल्यावर १९४३च्या सुरुवातीला ‘डी. जे. केमर अँड कंपनी’ या ब्रिटिश जाहिरातसंस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजविण्यात त्यांचा हातखंडा होता. नोकरीत असतानाच त्यांची चित्रपटाची रुची आणि व्यासंग वाढत गेला. रे त्यावेळी अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेख लिहीत असत. १९४७ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ सुरू केली. १९५० मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरिता इंग्लंकडला पाठविण्यात आले. तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. मात्र त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली, ती मुख्यत्वे डी सिका या दिग्दर्शकाच्या द बाय्‌सिकल थीफ या चित्रपटामुळे. १९५० मध्ये भारतात परतल्यावर त्यावेळी येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झां रन्वार यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. तत्पूर्वी बिभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेने त्यांच्या मनात घर केले होतेच. त्याच कथेवर चित्रपट काढावा असे त्यांना इतक्या तीव्रतेने वाटू लागले, की बोटीतून हिंदुस्थानात परत येत असतानाच त्यांनी त्यावर चित्रपटकथा लिहायला सुरुवात केली होती. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रणकाळ अगोदरच लांबत गेला होता आणि पैशाचे सर्व प्रवाह आटले होते.

योगायोगाने पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल, असे घोषित केले. त्यामुळेच ३-४ वर्षे रखडलेला चित्रपट १९५५ साली एकदाचा पुरा झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरविणार होती. संस्थेच्या रे यांना परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पहिलाही होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखविण्याबद्दल मागणी आली. अशी अमोल संधी दवडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यानंतर सु. दोन महिन्यांनी चित्रपट भारतात, म्हणजे कलकत्त्यात दाखविण्यात आला. पथेर पांचालीच्या न्यूयॉर्कच्या प्रदर्शनामुळे अनेक दूरगामी फायदे झाले. तज्ञांना तो चित्रपट इतका आवडला, की तेथील एक प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी १९५६ च्या कॅन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखविण्याची व्यवस्था केली. पथेर पांचाली मधील वास्तवता व कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि ‘मानवतेचा अत्युत्कृष्ट आलेख’ अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली. कॅनखेरीज अनेक देशांत पथेर पांचालीला पारितोषिके मिळाली आणि सत्यजित रे यांना या पहिल्याच चित्रपटाने दिगंत कीर्ती मिळवून दिली. पथेर पांचाली या कथामालिकेत पुढे त्यांनी अपराजितो (१९५६) व अपूर संसार (१९५९) हे आणखी दोन सलग चित्रपट निर्माण केले. ही ‘अपू चित्रपटत्रयी’ विशेष मान्यता पावली. त्यांची पटकथा पुस्तकरूपात उपलब्ध आहे (द अपू ट्रिलॉजी, इं. भा. शंपा बॅनर्जी, १९८५). दरम्यान रे यांनी परश पथर (१९५७) आणि जलसाघर (१९५९) हे दोन चित्रपट तयार केले. त्यांचा देवी हा चित्रपट (१९६०) बंगालच्या सरंजामदारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर होता. या पहिल्या सहा चित्रपटांना पं. रवि शंकर, विलायतखाँ, अली अकबर खाँ असे नामवंत संगीत दिग्दर्शक लाभले होते. नंतरच्या सर्व चित्रपटांना मात्र स्वतःच उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनी संगीत दिले आहे. १९५५ ते १९८५ या तीन दशकांत रे यांनी पंचवीस चित्रपट व काही अनुबोधपट निर्माण केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक अनुबोधपट त्यांनी १९६१ मध्ये तयार केला.

शिवाय टागोरांच्या कथेवरील तीन कन्या हा चित्रपटही त्याच वर्षी निर्माण केला. त्यानंतर कांचनजंगा व अभिजान (१९६२), महानगर (१९६३), टागोरांच्या कथेवरील चारुलता (१९६४), कापुरुष ओ महापुरुष (१९६५) आणि नायक (१९६६) इ. उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. चिडियाखाना (१९६७) व गोपी ग्याने बाघा ब्याने (१९६८) हे त्यांनी खास मुलांसाठी तयार केलेले चित्रपट होत. अरण्येर दिन रात्री व प्रतिद्वंदी (१९७०), सीमाबद्ध (१९७१) आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील, १९४३ च्या मानवनिर्मित दुष्काळाचे चित्रण करणारा अशनी संकेत (१९७३) हे त्यांचे नंतरचे चित्रपट. सोनार केल्ला हा आणखी एक बाल-चित्रपट त्यांनी १९७४ साली काढला. १९७५ ते १९८५ या दशकातील रे यांचे चित्रपट म्हणजे जनअरण्य (१९७५), शतरंज के खिलाडी (१९७७), स्वतःच लिहिलेल्या गुप्तहेर कथेवर आधारित जय बाबा फेलुनाथ (१९७८), हीरक राजर देशे (१९८०) आणि अनेक वर्षे मनात घोळत असलेल्या टागोर कथेवरील घरे बैरे (१९८४). मा.सत्यजित रे हे चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत होत. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रांत त्यांनी विपुल निर्मिती केली. चित्रपटाप्रमाणेच साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्याने संदेश या नियतकालिकाचे पुनरुज्जीकवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला आहे. तसेच त्यांनी स्वतःही विपुल कथावाङ्‌मय निर्माण केले आहे. त्यांचे अवर फिल्म्स देअर फिल्म्स (१९७६) हे पुस्तकही चित्रपटसमीक्षेत मोलाची भर घालणारे आहे. चित्रपटक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या विविध कला-संस्कारांचे संमिश्र प्रतिबिंब त्यांच्या चित्रणशैलीवर पडणे स्वाभाविक होते.

पडद्यावरील आकृतिबंधाची रचना, प्रमाणबद्धता, दृश्यप्रकार, चित्रणकोन, अवकाशीय खोली, रंगसंगती, त्याचबरोबर बाह्य प्रतिमा व संगीत, कॅमेऱ्याची आशयानुरूप हालचाल, त्याद्वारे साधली जाणारी पोषक लय व तीच लय दृढ करणारे संकलन, नैसर्गिक ध्वनींचा केलेला मार्मिक उपयोग असे घटक रेंच्या चित्रपटात क्षणोक्षणी दृग्गोचर होतात. त्यासाठी त्यांचे चित्रपट एकदा पाहून पूर्णपणे आस्वादले जाऊ शकत नाहीत. कारण चित्रपट वेगाने पुढेपुढे सरकतो. प्रथम पहात असताना त्यांच्या इतर बारकाव्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. विशेषतः पथेर पांचाली या त्यांच्या पहिल्या कलाकृतीत साधी साधी दृश्ये केवळ रचनात्मकतेमुळे दृष्टीला सुखावणारी वाटतात. रे यांचे मोठेपण केवळ दर्जेदार कथावस्तू पडद्यावर पेश करण्यात नसून, ते भारतीय कथाशय चित्रपट-माध्यमाच्या सर्व घटकांच्या योग्य, कलात्मक संयोगातून प्रेक्षकाप्रत पोचविण्याच्या त्यांच्या प्रभावी शैलीतून सिद्ध झाले आहे. रे यांनी १९५९ पासून आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचे ज्यूरी म्हणून अनेक देशांत काम केले होते. त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते, रामॉन मागसायसाय पारितोषिक, ‘ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्’तर्फे गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मा.सत्यजित रे यांना मिळाला होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सत्यजित रे यांचा गौरव केला होता. फ्रान्स राष्ट्रातर्फे ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च बहुमानाचा किताब रे यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मीत्तरां यांच्या हस्ते कलकत्ता येथे देण्यात आला. अनेक देशांतील चित्रपटविषयक पारितोषिके आणि मानसन्मान सातत्याने तीस वर्षे मिळविणारा सत्यजित रे यांच्यासारखा भारतीय कलावंत तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. आगंतुक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.या अवलियाच्या कामाचा गौरव १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कार पुरस्कार देऊन करण्यात आला. सत्यजीत रे हे ऑस्कार मिळवणारे एकमेव भारतीय दिग्दर्शक होते. सत्यजित रे यांचे यांचे २३ एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..