संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही.
एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ” पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भॊमसेन जोशींचा एक बडॊद्याचा अनुभव सांगितला .रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत पूरियाधनाश्री गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर.. तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला. लय थांबली, आणि त्या बरोबरच पंडीतजींचा आवाजही थांबला. टांगेवाला म्हणतो, ” पूरियाधनाश्री क्युं बंद किया? शुरु रखिये नां”.. आता एक टांगेवाल्याने कुठला राग आहे हे ओळखलेले ऐकून पंडितजींना खूप आश्चर्य वाटले, त्यांनी विचारले,” आपको , कैसे मालूम की ये धनश्री पुरीया है” त्यावर टांगेवाल म्हणतो, ” बाबूजी, हम फैय्याज खां साहब के पडॊसमे रहते, है, और हमेशा उनका रियाज सुनते हुए बडे हुए है, इतना तो मालूम रहेगाही नां…”
वरचा अनुभव म्हणजे त्या टांगेवाल्याच्या कानावर ऐकण्याचे संस्कार झाले होते. हा प्रसंग ऐकण्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे दाखवणारा आहे. गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ते ऐकता येणं हे ही महत्त्वाचं. त्या टांगेवाल्याच्या कानावर गाणं ऐकण्याचे संस्कार झाले होते.गाणं कसं ऐकावं यातलं मर्म त्याला समजलं होतं. म्हणूनच तो पंडितजींना दाद देऊ शकला.
कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत.
सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज
सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भनकर
सकाळी ६ ते ८ :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा, विभास,गुनकली
सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल
दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४ :- भिमपलासी ,मुलतानी
दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा
सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण, कलावती
रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,
रात्री १२ ते २ :-अडाणा, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस
Leave a Reply