सकाळी उठलो अन क्षणभर आपण स्वप्नात तर नाही ना अशी शंका आली ..कारण काहीही कटकट न करता अलका चहा घेऊन आली होती ..चक्क बेड टी ? . ऐरवी आधी तोंड धुवा असा म्हणणारी अलका हीच का ? चहाची कपबशी हाती घेताना होणाऱ्या हातांच्या थरथरी कडे दुर्लक्ष करीत एकही टोमणा न मारता ती शेजारी बसली , ” मग आज चालायचे ना ?” अतिशय प्रेमळ स्वरात तिने विचारले . मला काही समजलेच नाही ‘ आज कुठे बर जाणार होतो मी हिच्यासोबत ? ‘ मी डोक्याला जरा ताण दिला पण छे ! डोके नुसते सुन्न झाले होते , मी बावळटा सारखा तिच्याकडे पाहत राहिलो… मी पुरेसा बेसावध आहे हे बघून म्हणाली ‘ अहो , असं काय करताय , आज आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात जायचे आहे ना माहिती घ्यायला ? ‘ मी काही उत्तर देईपर्यंत तिने हाताला धरून मला बेडवरून उठावलेच होते .
पटापट दोन्ही मुलांना उठवले त्यांचे आवरून मुलांना शेजारच्या काकूंकडे सोडून आम्ही निघालो ..मी थोडा प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला पण तिने चक्क माझ्याकडे दुर्लक्ष केले होते …मी कालच स्टॉक मध्ये आणून ठेवलेली क्वार्टर काढून पटापट संपवून निघालो होतो ..पण आज म्हणावी तशी मजा येईना ..मला जरा जास्त टेन्शन आले होते म्हणून वाटेत पुन्हा ऑटो थांबवून मी समोरच्या बार मध्ये शिरलो कौंटर वरच उभे राहून उभ्याउभ्याच ऐक क्वार्टर लावली , आता जरा तरतरी आली होती . ‘ मैत्री ‘ व्यसनमुक्ती केंद्र अशी पाटी असलेल्या वास्तुसमोर ऑटो उभा राहिला . अलकाने मला हात धरून खाली उतरवले आणि मुख्य कार्यालयात आम्ही पोचलो .
समोरच्या खुर्चीत ऐक प्रसन्न चेहऱ्याचा माणूस बसला होता , म्हणजे हे महाशय मला समजावणार तर ? …मी मनातल्या मनात हसलो ..या पूर्वी मला समजवायला आलेल्या अनेक लोकांना मी माझ्या युक्तिवादाने उडवून लावले होते . अलकाची बडबड सुरु झाली होती , मी किती पितो , कसा त्रास देतो , वगैरे वगैरे …परक्या माणसाजवळ भडभडा आपल्या नवऱ्याबद्दल तिचे असे बोलणे मला आवडले नव्हते पण घरी गेल्यावर तिचा बेत पाहू असे ठरवले मी ..कारण माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीला तिला परक्या माणसासमोर रागावणे शोभले नसते , मी नुसताच ऐकत बसलो , मजेत ऐक सिगरेट काढून पेटवली आणि तिचे झुरके मारत त्या ऑफीसचे निरीक्षण करू लागलो , ” हं ! काय म्हणता मग विजयभाऊ ? ” त्या माणसाने एकदम दोस्ती खात्यात बोलायला सुरवात केली माझ्याशी . ‘ मी काय म्हणणार ? माझ्या बद्दल सगळेच तर हिने आपल्याला सांगितलेच आहे आता , पण नाण्याला दुसरीही बाजू असते ” मी जरा उपहासाने म्हणालो . ‘ वाहिनी , अहो विजयभाऊना समजतेय हो सगळे की जे चालले आहे ते काही योग्य नाहीय ते पण…” तो माणूस पुढे बोलू लागला , अश्या प्रकारच्या बोलण्यावर काय विरोध करावा हे मला उमजेना तो गृहस्थ माझीच बाजू घेत होता , मी होकारार्थी मान डोलावली ‘ मग ..राहताय ना तुम्ही आमच्या बरोबर ?’ तो पुढे उद्गारला . ” अहो ..पण ..पण मला सुटी मिळणे कठीण आहे ” मी लटका विरोध केला ” त्याची काही काळजी करू नका , सारे काही सुरळीत होईल” असे म्हणत त्याने माझ्यासमोर ऐक फॉर्म सरकवला नाईलाजाने मी सही केली तेव्हा तो माझ्याकडे पाहून प्रेमळ हसला आणि मला एकदम मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटले .अलकाच्या डोळ्यात पाणी तरळले ..ते पाहून मला कसेसेच झाले ..तिला इतके अगतिक झालेले मी कधी पहिले नव्हते ..मी उपचारांसाठी दाखल होतोय ही खरे तर तिच्यासाठी आनंदाची बाब होती तरी तिच्या अश्रुंचे कारण मला समजेना .
” इथे जेवणाची सोय काय ? , स्वयंपाक कोण करते , अंघोळीला गरम पाणी देता का ? ‘ वगैरे प्रश्न ती विचारात होती …मला आता मस्त गुंगी येत होती ..शरीर सैलावले होते , डोळे जड झाले होते ‘ चला विजयभाऊ , आपण आता जाऊ तुम्ही जरा विश्रांती घ्या म्हणत कोणीतरी मला हात धरून उठवले हे आठवते आहे .
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८
Leave a Reply