नवीन लेखन...

भाग्यवान दारुडा – औषधे वाटप (बेवड्याची डायरी – भाग १६)

हॉल मध्ये सर्वाना एकत्रित बसवले गेले होते ..आता अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची मिटिंग होणार आहे हे समजले ..मी कुतूहलाने अगदी पुढच्या रांगेत जाऊन बसलो ..माँनीटर ने प्रार्थना घेतली ..बोलायला सुरवात केली ..नमस्कार मित्रानो माझे नाव संदीप ..”मी एक भाग्यवान दारुडा आहे ..केवळ ईश्वराची असीम कृपा ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दर्शवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..आणि आपणा सर्वांचे मला लाभलेले प्रेम ..केवळ याच बळावर मी आज दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटापासून दूर आहे ..तसेच सुखी ..समाधानी ..संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय ” संदीप ने असे म्हणताच ..सर्वांनी ‘ हाय संदीप ‘ ..असे म्हणता त्याला अभिवादन केले …पुढे तो म्हणाला ” मी स्वतःला भाग्यवान दारुडा का म्हणतोय याचे सर्वाना आश्चर्य वाटत असेल .. सुरवातीची काही वर्षे सोडल्यास ..नंतर अनेक वर्षे मी दारूच्या गुलामीत जगत होतो ..दारूमुळे माझे शरीर .मन ..कुटुंब ..आर्थिक बाजू ..सामाजिक स्थान ..माझे आत्मिक स्वास्थ्य ढासळत जात होते..

हे समजत असूनही मी नाईलाजाने पुन्हा पुन्हा दारू पीत गेलो ..जीवन जगणे म्हणजे माझ्या साठी जणू सक्तमजुरीची शिक्षा झाले होते ..दारू शिवाय जीवन जगण्याची कल्पनाही करवत नव्हती इतकी प्रचंड गुलामी निर्माण झाली होती ..मनोमन मी यातून सुटका व्हावी अशी इच्छा करत होतो ..मात्र मला सुटकेचा मार्ग सापडत नव्हता ..कोणाच्या तरी ओळखीने माझ्या कुटुंबियांना या व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता मिळाला ..हो ..नाही ..करता करता शेवटी येथे दाखल झालो ..इथेच मला अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची माहिती मिळाली ..हे देखील समजले की मी अतिशय घातक अशा आजारात अडकलो आहे ..त्यातून सुटका होण्यासाठी बारा पायऱ्यांचा मार्ग मिळाला ..मित्रानो मी भाग्यवान अशासाठी आहे की आज जगात लाखो लोक दारूच्या विळख्यात अडकले असूनही त्यांना सुटकेचा मार्ग मिळत नाहीय ..ते आपल्या नशिबाला ..परिस्थितीला ..कुटुंबियांना ..किवा आणखी कुणाला तरी दोष देत पुन्हा पुन्हा दारू पीत आहेत ..रोज कणाकणाने उध्वस्त होत आहेत ..तरीही त्यांना मला मिळाला तसा मार्ग अजून मिळाला नाहीय …मला हा मार्ग मिळाला आणि माझा पुनर्जन्म झाला ..म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतोय ”

तो हिंदीत स्वतची कथा न संकोचता सांगत होता ..आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन त्याचे बोलणे ऐकत होतो ..तो जणू आमचेच मनोगत सांगत आहे असे वाटत होते ..पुढे तो म्हणाला ‘ सर्वसाधारण मुलांप्रमाणेच मी मोठा होत गेलो ..माझ्यावर प्रेम करणारे आईवडील ..भाऊ बहिण ..सर्व इतरांसारखेच ..मी अआभ्यासात हुशार होतो ..पदवी प्राप्त केल्यानंतर ..पुढेही मी शिकलो ..चांगली नोकरी मिळाली ..त्याच आनंदात मित्रांच्या आग्रहाखातर माझ्या हातात दारूचा ग्लास आला ..सुरवातीचे काही दिवस दारू म्हणजे मला मिळालेली एक जादू आहे असे मला वाटले ..दारूचा घोट पोटात जाताच ..माझ्या चित्तवृत्ती बहरून जात असत ..माझ्या विनोदबुद्धीला धार चढत असे ..माझी रसिकता जागृत होई ..सगळ्या समस्या ..ताण तणाव चुटकीससरशी निघून गेल्याची ..एक प्रचंड हलकेपणाची भावना निर्माण होई ..सुंदर समृद्ध भविष्य मला खुणावत असे ..परंतु मित्रानो हळू हळू दारू पिण्याची ओढ माझ्या मनात घट्ट होत होती ..माझ्या मनावर त्या नशेच्या अवस्थेचा पगडा ..मगरमिठी अधिक दृढ होत होती हे मला समजले नाही ..पुढे पिण्याचे प्रमाण वाढत गेले ..

पगारातील सगळा पैसा दारूत खर्च होऊ लागला ..मनाचे असमाधान ..अवस्थता वाढत गेली ..त्याच बरोबर नैराश्य ..वैफल्याचा मी धनी होत गेलो ..माझे दारू पिणे आता एक आनंदोत्सव न राहता सर्वांच्या काळजीचा विषय बनत चालला होता ..कुटुंबियांच्या आग्रहाखातर काही दिवस दारू बंद केली ..मात्र पुन्हा सुरु झाली ..असे वारंवार घडत गेले ..सर्वांचा विश्वास गमावला ..नोकरीत दांड्या मारण्याचे प्रमाण वाढल्यावर ..जेव्हा साहेबांनी मला नोटीस दिली तेव्हा मी रागाने बेदरकारपणे नोकरी सोडली ..दुसरी मिळवली ..अश्या किमान दहा नोकऱ्या करून झाल्या ..सगळा पैसा दारूत गेला ..वय वाढत गेले तसे नुकसानही वाढत गेले ..शेवटी भावाच्या एका परिचिताने भावाला या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहिती सांगितली ..भावाने मला त्याबद्दल विचारले ..मी साफ नकार दिला ..दारू मी स्वतच्या बळावर सोडू शकेन ..अशी माझी खात्री होती ..परंतु ते जमू शकले नाही ..शेवटी मला इथल्या लोकांनी प्यायलेल्या अवस्थेत जबरदस्ती उचलून येथे आणले .,,मला सुरवातीचे काही दिवस प्रचंड अपमानास्पद वाटत होते ..नंतर नंतर इथल्या थेरेपीज ..योगाभ्यास ..प्राणायाम या सर्व गोष्टींमुळे माझ्या बुद्धीवर असलेला दारूचा पगडा कमी होण्यास मदत झाली ..अल्कोहोलिक्स अँनानिमसचे साहित्य वाचल्यावर मी दारूच्या गुलामीत जगत होतो हे जाणवले ..मग सगळे काम सोपे होत गेले ..मी येथे रमलो ..

मित्रानो दारू सोडली म्हणजे माझ्या जीवनातील समस्या संपल्या असे नाही ..परंतु आता माझ्या जीवनातील समस्यांवर दारू हे औषध नाहीय हे मला पक्के समजले आहे ..माझे जीवन कितीही समस्यापूर्ण असले तरीही ..दारू ही त्यावरची तात्पुरती मलमपट्टी असते ..त्याऐवजी आत्मभान बाळगून ..नैतिकतेचा पाठपुरावा करून ..जीवनावर श्रद्धा ठेवून ..नक्कीच समस्यांचा सामना करता येतो हे मला येथे शिकायला मिळाले ..त्यामुळेच आज मी हातीपायी धडधाकट उभा आहे तुमच्या समोर ..रोज दारूच्या नशेत वाहने चालवून अपघातात मरणारे ..दारूमुळे घरदार सोडून भटकणारे ..एकाकी रहाणारे ..दारूमुळे लिव्हर फुटून ..कावीळ होऊन ..मरणारे अनेक लोक आहेत ..मात्र मला हा मार्ग मिळाला म्हणूनच मी वाचलो ..नव्याने जीवनाला समोरा गेलो ..माझ्या मनात नम्रता ..कृतज्ञता ..सहिष्णुता ..ही बीजे रोवली गेली आहेत ..आता रोजच्या रोज माझ्या समर्पणाचे खतपाणी घालून ती बीजे प्रचंड वृक्ष कसा होतील यासाठी प्रामाणिकपणे मला श्रम करावे लागतील ..याची मी नियमित खबरदारी घेत असतो …

..माँनीटरने आपले बोलणे संपवले तसे सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..त्याने प्रामाणिक पणे स्वतच्या चुका सांगत ..सुधारणेकडे जाण्यासाठी काय काय गरजेचे आहे ते सांगितले होते ..त्याचे बोलणे ऐकून मलाही वाटले मी देखील ‘ भाग्यवान ‘ आहे ..कारण निसर्गाने मला कोणतेही व्यंग न देता जन्माला घातले ..माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे पालक मला मिळाले ..माझे शिक्षण ..माझा सांभाळ त्यांनी योग्य पद्धतीनेच केला होता ..आपल्या कर्तव्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नव्हती ..पत्नीनेही नेहमी मला समजूनच घेण्याचा प्रयत्न केला होता ..जेव्हा माझे पिण्याचे प्रमाण वाढले ..आर्थिक समस्या येवू लागल्या .माझ्या शारीरिकतेवर ..इतर वर्तनावर परिणाम होऊ लागला ..तेव्हाच तिने मला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता ..मला इथे दाखल करून तिने एकप्रकारे माझ्यावर उपकारच केले होते ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात आपल्याला अडकवले गेले आहे ..इथे माझ्या मनाविरुद्ध मला ठेवले गेले आहे ही भावना व्यर्थ होती ..त्यापेक्षा सावरण्यासाठी मला मदत केली जातेय ..म्हणून मी ‘ भाग्यवान ‘ आहे असे मला वाटू लागले …

मिटिंग संपल्यावर सर्वाना एका जागी बसवून औषध वाटप सुरु झाले ..मी माझा नंबर येण्याची वाट पाहत होतो ..माँनीटर आणि त्याचे सहकारी दोन डबे उघडून बसले होते ..त्यात एकेकाच्या नावाची प्लास्टिकची पाकिटे ठेवलेली होती ..त्यातून एकेकाचे नाव पुकारून गोळ्या देण्याचे काम सुरु होते ..प्रत्येकाचा हातावर पाकिटातील गोळ्या दिल्यावर तो गोळ्या खातोय की नाही यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाई ..एकाने गोळ्या तोंडात टाकल्या आणि वर तेथे ठेवलेल्या बाटलीतले पाणी प्यायले ..तो जायला निघाला तसे त्याला माँनीटरने अडवले ..त्याचे हात तपासले ..तेव्हा लक्षात आले की त्याने शिताफीने एक गोळी हाताच्या बोटांमध्ये लपवून ठेवली होती ..त्याला पुन्हा गोळी खायला सांगितले गेले ..कुरबुर करत त्याने ती गोळी घेतली..असे गोळ्या लपवणारे दोन तीन जण निघाले..

सर्वांचे गोळ्या घेवून होई पर्यंत कोणीही जागेवरून उठायचे नाही अशी कडक सूचना दिली होती माँनीटरने..एक दोन जण तरीही गोळी तोंडात टाकल्यावर बाथरूम कडे जायला निघाले ..त्यानाही अडवले गेले ..त्यांचे तोंड तपासले गेले ..त्यांनी गोळ्या न गिळता तशाच तोंडात धरून ठेवल्या होत्या ..बाथरूम मध्ये जाऊन गोळ्या थुंकून टाकण्याचा त्यांचा डाव फसला … हे लोक स्वत:च्या बरे होण्यासाठी आवश्यक असणारी औषधे घ्यायला कुरकुर का करतात ते मला समजेना ..या बाबत नंतर माँनीटरला मी विचारलेच ..गोळ्या वाटप करताना इतके लक्ष का ठेवावे लागते ? .त्याने सांगितलेले कारण ऐकून मला नवल वाटले ..तो म्हणाला या इथे उपचारांना दाखल असलेले सगळेच लोक गंभीरपणे उपचार घेतातच असे अजिबात नाही ..काहीना अजूनही आपण व्यसनी आहोत हे मान्य नाहीय ..काहीना असे उपचार घेवून दारू सुटते यावर विश्वास नाहीय .. काही असेही आहेत की ज्यांना मुळातच स्वतचे भले समजत नाही ..तर काही जण मानसोपचार तज्ञ ..औषधे या बाबत अनेक गैरसमज बाळगून आहेत ..

खरेतर जसे प्रत्येक व्यक्तीला काही शारीरिक दुखणी उद्भवतात तसेच काही मानसिक दुखणी देखील असतात ..ज्यात सातत्याने निराशा वाटणे ..वैफल्यग्रस्त वाटणे ..जगात आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटून सतत खंत करत राहणे ..कधी खूप उत्साही वाटणे..तर कधी एकदम शक्तिपात झाल्यासारखे वाटणे ..एका अनामिक भीतीने ग्रस्त असणे ..सतत चिंता करत राहणे ..भावनिक असंतुलना मुळे सतत चिडचिड करणे ..तणावग्रस्त राहणे अशी काही भावनिक आजाराची लक्षणे असतात ..तसेच व्यसन केल्यामुळे देखील व्यसनांचे दुष्परिणाम म्हणून काही मानसिक विकार उद्भवतात ..ज्यात डिप्रेशन ..ओब्सेसीव्ह कंपल्सीव डिसऑर्डर..स्कीजोफ्रेनिया..या सारखे गंभीर विकार असू शकतात.. ज्या वर योग्य उपचार करणे आवश्यक असते ..अन्यथा अश्या व्यक्तीच्या हातून आत्महत्या..खून ..असे गंभीर गुन्हे घडू शकतात ..असे लोक जरी व्यसनमुक्तीचे उपचार घेवून बाहेर पडले तरी त्यांच्या विशिष्ट मानसिक विकारांमुळे अवस्थ होवून पुन्हा पुन्हा व्यसनाकडे वळतात..

त्यामुळे त्यांना औषधे देणे गरजेचे असते..काहीवेळा समस्या नीट उलगडून सांगून ..समुपदेशन करून तात्पुरते बरे वाटते अशा व्यक्तीला .. मात्र कायमचे बरे होण्यासाठी काही औषधे मदत करतात .परंतु समाजात अजूनही मानसोपचार तज्ञ म्हणजे ‘ वेड्यांचा डॉक्टर ‘ वाटतो ..जे लोक डोक्यावर ठार परिणाम होऊन दैनंदिन कामे करू शकत नाहीत ..जे रस्त्यावर निरुद्देश भटकत असतात ..स्वतःशीच बोलतात ..हातवारे करून हवेशी भांडतात ..ज्यांना कपड्याचे भान नसते ..ते वेडे ‘ असा समज बाळगून काही जण ” मी कुठे तसा करतो ” म्हणून आपल्याला काही मानसिक समस्या असल्याचे साफ नाकारतात ..मानसोपचार तज्ञांची मदत घेत नाहीत ..नकळत स्वतचा मानसिक विकार जपतात ..वाढवतात ..अशा लोकांवर त्यांनी गोळ्या घ्यावे म्हणून लक्ष ठेवावे लागते …

ठार वेडे होऊन भटकणे ही मानसिक विकाराची अंतिम किवा टोकाचे नुकसान झाल्याची अवस्था असू शकते ..जर त्या आधीच सावधगिरी बाळगली तर चांगलेच असते ते या लोकांना समजत नाही ..तसेच मानसोपचार तज्ञांच्या औषधांमुळे काही ‘ साईड इफेक्ट्स ‘ होतील अशी भीती असते यांना ..उदा ..लैंगिक उत्तेजना न येणे ..सतत आळस वाटणे ..खूप झोप येणे वगैरे ..परंतु हे सर्व गैरसमजच आहेत …मानसोपचार तज्ञ काही अपाय होणार नाहीत हे पाहूनच गोळ्यांचा डोस ठरवत असतात ..मात्र मुळातच संशयी स्वभावाची ..हट्टी ..जिद्दी ..स्वतःचेच खरे समजणारी माणसे मानसोपचार तज्ञांना सहकार्य करू शकत नाहीत ..म्हणून आम्हाला असे लक्ष ठेवावे लागते .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..