काल एका पोस्ट वर वाचले होते की घरी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत दोन त्या साठी चौरंग व पाट भाड्याने कुठे मिळत असतील तर… हे वाचून मला खूप हसू आले. काय भाड्याने मिळतील आणि कोण देतील याचा काही नेम नाही.
अशीच एक जाहिरात पत्रिका पेपर सोबत आले होती. दुल्हन सेट भाड्याने मिळतील. त्यावर बांगड्या आणि काही तरी गळ्यातील दागिने असे चित्र छापले होते. आता हातातील लग्नाचा चुडा ही काय भाड्याने घेण्याची वस्तू आहे का? पण हौस आणि गरज दोन्ही दोघांचीही पूर्ण होणार हे नक्की. कपडे दागिने आणि बरेच काही भाड्याने मिळते हे ऐकून होते. आणि आठवले की दोनच काय पण कितीतरी पाट चौरंग मिळायचे पूर्वी नुसते म्हणायचा अवकाश. मोठ्या पंगतीला पत्रावळी द्रोण. केळीची पाने तर घरगुती कार्यक्रमात आजुबाजुला असलेल्या शेजारच्या कडून ताट. वाटी. तांब्या फुलपात्र. स्वयंपाकासाठी पातेली. आणि बरेच काही आणून नंतर परत केली जायची. एखाद्या दिवशी अचानक रात्री पाहुणे आले की लगेच शेजारच्या घरात जाऊन हक्काने ताटवाटी आणली जायची. जर त्यांची भांडी खरकटी असली तर ती स्वतः घासून घेऊन जाताना काही वाटायचे नाही…
आता बाहेरच सगळे कार्यक्रम होतात. त्यामुळे हा प्रश्न नाही. आणि घरी केला तर कागदी सगळे मिळते. वापरा फेका. संपले. आणि जेवण तर अॉनलाईन आहे. मी विचार करत होते की ज्यांनी चौरंग व पाट मिळतील का अशी विचारणा केली होती. त्यांच्या घरी किमान एक तरी अपत्य असेल. मग त्या निमित्ताने या वस्तू आपल्या घरी आणून का ठेवले नसेल. रोजचे उपयोगी नाही म्हणून असेल तर शेजारी कोण राहतो हे माहित नाही तिथे मागण्याचा प्रश्नच येत नाही. एक सोसायटी म्हणजे लहान गावच असते. कोण कुणाला बघत नाही बोलत नाही म्हणून भाड्याने आणावे लागते….
प्रत्येक वेळी साथ देणारे आयुष्य भराचे जोडीदार. लहानाचे मोठे करणारे आई बाबा. राखीबंधनाला भाऊबीजेला भाऊ बहिण. भाच्यांचे नामकरण करायला आत्या. वधू वराच्या मागे लागणारा मामा. कौतुक करायला मावशी. आशीर्वाद द्यायला आजोबा आज्जी. मित्र मैत्रिणी अशी किती तरी रक्ताची. हृदयाची नाती असणारी अनमोल माणसं हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी लागतात. एक थेंब ही दुरावला जाऊ नये म्हणून खूप जपावी लागतात. त्यासाठी भाड्याने किंवा विकत मिळत नाहीत नाती. मौल्यवान असतात.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply