नवीन लेखन...

भगवन्मानसपूजा – मराठी अर्थासह

श्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही.


हृदम्भोजे कृष्णः सजलजलदश्यामलतनुः
सरोजाक्षः स्रग्वी मुकुटकटकाद्याभरणवान् ।
शरद्राकानाथप्रतिमवदनः श्रीमुरलिकां
वहन् ध्येयो गोपीगणपरिवृतः कुङ्कुमचितः  ॥ १॥

मराठी-  पाण्याने संपृक्त मेघाप्रमाणे सावळा देह असणा-या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, गळ्यात माळा, शिरावर मुकुट व सोन्याचे करभूषण,माळ,कंकण इत्यादी अलंकार घातलेल्या, शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मुख असलेल्या, (कपाळावर) केशरी टिळा लावलेल्या व (हाती) पावा घेतलेल्या, गोपींच्या समूहाने वेढलेल्या श्रीकृष्णाचे ध्यान (मी आपल्या) हृदयकमळात करावे (मी करतो).

तनू काळी वर्षा घन सम, गळा माळ विलसे
सुवर्णाच्या वाकी, मुकुट, नयने नीरज जसे ।
करी पावा, राका शरद शशि जेवी मुख दिसे
टिळा भाळी, गोपी सह, मनन त्याचे करितसे  ॥ ०१


पयोऽम्भोधेर्द्वीपान्ममहृदयमायाहि भगवन्
मणिव्रातभ्राजत्कनकवरपीठं भज हरे ।
सुचिह्नौ ते पादौ यदुकुलजनेनेज्मि सुजलैः
गृहाणेदं दूर्वाफलजलवदर्घ्यं मुररिपो ॥ २॥

मराठी- हे परमेश्वरा, क्षीरसागरातील आपले स्थान सोडून माझ्या चित्ती ये. हे हरी, अनेक रत्नांनी झळाळणा-या सोन्याच्या श्रेष्ठ आसनावर विराजमान हो. हे यादवा, तुझी शुभ चिन्हे असलेली पावले मी स्वच्छ पाण्याने निर्मळ करतो. हे मुर राक्षसाच्या शत्रो, हा दूर्वा,फळ आणि पाणी यांचा अर्घ्य स्वीकार कर.

तुझ्या सोडी स्थाना जलधिमधल्या, ये मम मनी
सुवर्णाचे घेई मणिजडित हे आसन झणी ।
सुचिन्हांचे देवा शुभ पद जलाने तव धुतो
तुवा दूर्वा-अर्घ्या, फल जल सवे भेट करतो ॥ ०२


त्वमाचामोपेन्द्र त्रिदशसरिदम्भोऽतिशिशिरं
भजस्वेमं पञ्चामृतरचितमाप्लावमघहन् ।
द्युनद्याः कालिन्द्या अपि कनककुम्भस्थितमिदं
जलं तेन स्नानं कुरु कुरु कुरुष्वाचमनकम् ॥ ३॥

मराठी- हे उपेन्द्रा, तू स्वर्गलोकीच्या नदीच्या अत्यंत थंड जलाने आचमन कर. हे अघासुरास ठार मारणा-या (कृष्णा), या तयार केलेल्या पंचामृताचा तू स्नानासाठी उपयोग कर. तसेच स्वर्गंगा आणि यमुनेचे जे पाणी या सुवर्ण कुंभात आहे त्याने तू स्नान कर आणि आचमनही कर.

अपोष्णीला पाणी सुर-नदितले शीतल, हरे
जलासंगे पंचामृतही करण्या स्नान तुज रे ।
सिता वृंदेचेही जल कनक पात्री भरुनिया
अपोष्णी स्नाना ये सुजल उपयोगात तुझिया ।। ०३

टीप- या श्लोकात दुस-या ओळीत ‘भजस्वेमं पञ्चामृतफलरसाप्लावमघहन् ’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास ‘स्नानासाठी पंचामृत व फळांच्या रसांचा उपयोग कर’ असा अर्थ होईल.


तडिद्वर्णे वस्त्रे भज विजयकान्ताधिहरण
प्रलम्बारिभ्रातर्मृदुलमुपवीतं कुरु गले ।
ललाटे पाटीरं मृगमदयुतं धारय हरे
गृहाणेदं माल्यं शतदलतुलस्यादिरचितम् ॥ ४ ॥

मराठी- हे (दुष्टांवर) विजय मिळवणा-या, आपल्या भार्ये (रुक्मिणी) चे हरण करणा-या (श्रीकृष्णा), (मी तुझ्यासाठी आणलेली) ही विजेसारखी तेजस्वी दोन वस्त्रे परिधान कर. हे प्रलंबाच्या शत्रू (बलरामा) चा भाऊ (श्रीकृष्णा), मऊ तलम जानवे (उपवस्त्र) गळ्यात घाल. कपाळावर कस्तूरीमिश्रित चंदन लाव. या कमळ, तुळशी आदींच्या हाराचा स्वीकार कर.

विजे जेवी वस्त्रे वकल-हरणा धारण करी     (वकल- पत्नी)
गळ्या माजी घाली तलम उपवस्त्रा झडकरी ।
कपाळी कस्तूरी सहित सजवी चंदन टिळा
गळा माळा माळा कमळ तुळशी साज सगळा ॥ ०४


दशाङ्गं धूपं सद्वरदचरणाग्रेऽर्पितमिदं
मुखं दीपेनेन्दुप्रभविरजसं देव कलये ।
इमौ पाणी वाणीपतिनुत सकर्पूररजसा
विशोध्याग्रे दत्तं सलिलमिदमाचाम नृहरे ॥ ५ ॥

मराठी- सज्जनांवर प्रसन्न होणा-या (तुझ्या) पावलांसमोर मी हा दहा विभिन्न घटकांचा धूप अर्पण केला आहे. हे देवा, (तुझे) चंद्रासमान तेजस्वी मुख दीप ओवाळून मी निरखत आहे. ब्रह्म्याने ज्याची स्तुती केली आहे अशा श्रीकृष्णा, या दोन्ही हातांना कापराच्या चूर्णाने शुद्ध करून मी हे पाणी तुजसमोर ठेवत आहे. हे श्रीहरी तू त्याने आचमन कर.

धुपा पायी अर्पूं सुजन हितकारी सतत तो
दिवा ओवाळूनी शशि मुख प्रभा मी निरखितो ।
करां कापूराने विमल करुनी ठेवित जला,
अपोष्णी घे, ब्रह्मा नमन करतो नित्य तुजला ॥ ०५

टीप- येथे दुस-या चरणात रजसं ऐवजी रजसा असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास चंद्राप्रमाणे तेजस्वी दीप असा अर्थ होईल.


सदा तृप्तान्नं षड्रसवदखिलव्यञ्जनयुतं
सुवर्णामत्रे गोघृतचषकयुक्ते स्थितमिदम् ।
यशोदासूनो तत्परमदययाऽशान सखिभिः
प्रसादं वांछद्भिः सह तदनु नीरं पिब विभो ॥ ६॥

मराठी- हे नेहेमी समाधानी असणा-या (कृष्णा), सर्व सहा रसांनी युक्त विविध अन्नपदार्थ सोन्याच्या भांड्यात गायीच्या तुपासह येथे ठेवले आहेत. हे यशोदेच्या कुमरा, प्रसादाची इच्छा करणा-या तुझ्या सखींच्या बरोबर ते अतीव कनवाळूपणे भक्षण कर आणि त्यानंतर पाणी (ही) पी.

सुवर्णाच्या ताटी सकल रस खाद्यान्न सगळे
पुढे वाटी धेनू तुप तुजप्रती सर्व सजले ।
प्रसादाच्या आशे सखिगण जमे त्यासह हरे
पहा चाखूनीया, सदय, मग प्राशी जल बरे ॥ ०६


सचन्द्रं ताम्बूलं मुखरुचिकरं भक्षय हरे
फलं स्वादु प्रीत्या परिमलवदास्वादय चिरम् ।
सपर्यापर्याप्त्यै कनकमणिजातं स्थितमिदं
प्रदीपैरारात्रिं जलधितनयाऽऽश्लिष्ट रचये ॥ ७॥

मराठी- हे हरी, कापराचा रुचकर विडा खा. सुगंधित गोड फळ सावकाश पण प्रेमाने खा. रमेच्या मिठीत असणा-या (कृष्णा), पूजेच्या समाप्तीसाठी मी हे तेवत्या दिव्यांचे रत्नजडित सोन्याचे तबक संपूर्ण रात्रभर तुझ्यासमोर मांडत आहे.

विडा कापूराचा रुचकर करी सेवन हरे
सुगंधी, प्रेमाने, फळ हळुहळू खा मधु बरे ।
अखेरी पूजेच्या कनक तबकी रत्नजडल्या
रमेसंगे रात्री हरि तुजसवे मंद दिवल्या ॥ ०७

टीप- काही अभ्यासकांनी ‘सचंद्र’ चा अर्थ ‘ज्याच्यावर चंद्रासमान गोल ठिपका आहे’ असा घेतला आहे. विड्यावर त्या काळीही चांदीचा वर्ख लावण्याची प्रथा होती असे मान्य केल्यास हाही अर्थ सयुक्तिक वाटू शकेल. येथे ‘सचूर्णम्’ असाही पाठभेद आढळतो. त्यानुसार विडा रुचकर बनवण्यासाठी घातलेले विविध मसाले असा अर्थ घ्यावा लागेल.


विजातीयैः पुष्पैरभिसुरभिभिर्बिल्वतुलसी-
युतैश्चेमं पुष्पाञ्जलिमजित ते मूर्ध्नि निदधे ।
तव प्रादक्षिण्यक्रमणमघविध्वंसिरचितं
चतुर्वारं विष्णो जनिपथगतिश्रान्तविदुषा ॥ ८॥

मराठी- हे अजिंक्य विष्णो, अत्यंत सुगंधी विविध फुले व तुळशी बेलाच्या पानांची ही ओंजळ मी तुझ्या मस्तकी वाहतो. जीवनाच्या वाटेवर चालताना थकलेला सज्जन (मी) पातकांचा नाश करणा-या तुझ्या चार प्रदक्षिणा करीत आहे.

अजिंक्या विष्णो ही विविध सुमने गंधित बरी
शिरी वाहू बेलासह तुळसही ओंजळभरी ।
जगाच्या वाटांनी क्रमण करिता मी थकतसे
तुझ्या फे-या चारी दुरित शमना मी करितसे ॥ ०८


नमस्कारोऽष्टाङ्गः सकलदुरितध्वंसनपटुः
कृतं नृत्यं गीतं स्तुतिरपि रमाकान्त त इयम् ।
तव प्रीत्यै भूयादहमपि च दासस्तव विभो
कृतं छिद्रं पूर्णं कुरु कुरु नमस्तेऽस्तु भगवन् ॥ ९॥

मराठी- हे रमेच्या नाथा, सर्व पापांचा नाश करण्यात सराईत असा अष्टांग नमस्कार तसेच तुझी स्तुती, गायन आणि नाचही मी तुझ्या सेवेत केला आहे. तसेच हे परमेश्वरा तुझ्या प्रेमाला  पात्र व्हावे यासाठी मी तुझे सेवकत्व ही पत्करले आहे. (माझ्या सेवेत) जे न्यून असेल ते तू पुरे कर, करच. हे देवा तुला मी प्रणाम करतो.

तुवा आठी अंगी नमन करि जे पातक हरी
रमानाथा गाणे स्तवन करुनी नाच हि करी ।
गुलामी मी प्रेमास्तव तव करी, न्यूनहि जरी
कुठे राही, पूर्ती कर तुजसि मी वंदन करी ॥ ०९


सदा सेव्यः कृष्णः सजलघननीलः करतले
दधानो दध्यन्नं तदनु नवनीतं मुरलिकाम् ।
कदाचित्कान्तानां कुचकलशपत्रालिरचना-
समासक्तं स्निग्धैः सह शिशुविहारं विरचयन् ॥ १०॥

मराठी- पाऊस भरलेल्या ढगासमान सावळा असलेल्या, हातावर दहीभात,लोणी व दुस-या हातात पावा घेतलेल्या, कधीतरी आपल्या पत्नींच्या स्तनघटांवर चिन्हे काढण्यात मग्न असणा-या आपल्या सवंगड्यांबरोबर लहानपणीचे खेळ खेळणा-या कृष्णाचे नेहेमी ध्यान करावे.

कधी एका हाती अलगुज, दही भात दुसरा
कधी लोणी, स्नेही शिशु सह कधी खेळत बरा ।
निळा वर्षा मेघासम, वकल वक्षावर बरी
खुणा चित्रे रेखी, नित वसत चित्ती मम हरी ॥ १०


मणिकर्णीच्छया जातमिदं मानसपूजनम् ।
यः कुर्वीतोषसि प्राज्ञस्तस्य कृष्णः प्रसीदति ॥ ११॥

मराठी- मणिकर्णिका देवीच्या इच्छेने ही मानस पूजा रचली गेली आहे. जो बुद्धिमान पहाटे उठून ती करील त्याच्यावर श्रीकृष्ण प्रसन्न होतो.

इच्छेने मणिकर्णीच्या सार्थ मानसपूजना
पहाटे करिता ज्ञानी आनंद हरिच्या मना ॥ ११

इति श्री शङ्कराचार्यविरचितं भगवन्मानसपूजनम् ॥

*******************

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on भगवन्मानसपूजा – मराठी अर्थासह

  1. गृहस्थाश्रमात श्री धनंजय मुकुंद बोरकर यांनी भौतिक विषयात कार्य केले
    (येथे मी तांत्रिक हा शब्द टाळला आहे हे सूज्ञ वाचकांनी हेरले असेलच.
    तसे का केले? — कारण त्या शब्दाचा वेगळा अर्थ होऊ शकतो,
    की जो येथे अजिबात लागू होत नाही.).
    त्यामुळे त्यांच्यात एक जिज्ञासा जागरूक झाली असणार.
    सेवानिवृत्तीनंतर त्यांचे लक्ष भक्तीमार्गाकडे गेलेले दिसते आहे.
    तरीसुद्धा त्यांच्यातील जिज्ञासा अजून जागरूक आहे
    हे त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट दिसते आहे.
    वा:! काय सुरेख संगम आहे हा!! —
    भक्तीमार्गाचे ओघळते कृष्णप्रेम;
    आणि ज्ञान व कर्ममार्गातील लांब वास्तव्यामुळे जिवंत झालेली जिज्ञासा.
    तहानलेल्या वचकांसाठी आलेली ही सुवर्णसंधी नव्हे काय?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..