तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान.
सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर .
तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट.
…आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद नाही , उत्तमपणे साडी नेसलेली..थोड्याशा उंच हिल च्या चपला .
खूपच सुंदर होती, नजर सतत खाली , जास्त बोलणे नाही ….
एकदोनदा माझी तिची नजरानजर झाली परंतु निर्विकार चेहरा…अर्थात ते ‘ निर्विकार ‘ सौदर्य होते का ?
हाच प्रश्न मी मला स्वतःला विचारला होता.
खरे पाहिले तर ते माझ्या दृष्टीने विजोड जोडपे होते…परंतु तो तिला नियमितपणे बस स्टँडवर सोडण्यास येत असे.
एकंदरीत मला त्या दोघांचे आयुष्य गूढ वाटत होते.
त्या स्पॉटला आलो की आजही मला ती आठवते..अर्थात त्यावेळी.
तेथे असणारा प्रत्येक बस स्टॉपवरचा माणूस , स्त्री तिच्याकडे बघायचा आणि मग त्याच्याकडे.
ते नवराबायको होते इतके मात्र निश्चित.
किती गम्मत असते , कोण ते , ना ओळख ना पाळख पण मनात विचार येत होता तो तिच्या सुंदर दिसण्याचा आणि त्याच्या सामान्य असण्याचा. ह्यांचे लग्न कसे जमले असेल , असा विचार माझ्या नाही अनेकांच्या मनात तिला बघितल्यावर येत असे
….तसा तो प्रश्न अनेक जणांच्या नजरेत मला दिसत असेल.
खरेच त्याला ‘ लॉटरीच ‘ लागली असेल.
अर्थात हे माझे मत आहे….अर्धवट दिसण्याच्या माहितीवर.
त्यांचे खाजगी आयुष्य कसे आले…ते जास्त बोलताना तर दिसत नव्हते ….तो तिला बसमध्ये बसवत असे आणि मग निघून जात असे.
मला एरवी तो माणूस शहरात दिसत नसे , कुठे फिरताना म्हणा किंवा बाजारात किंवा कुठेही नाही….
दिसायचा तो फक्त बस स्टॉपवर . त्यामुळे माझे कुतूहल सतत वाढत असे. पण तितकेच शांत होत असे कारण मी माझ्या कामात परत गुंतून जात असे.
हल्ली परत तो दिसू लागला पण एकटाच त्या बस स्टॉपवर ..
पूर्ण विस्कटलेला दिसत होता मध्येच काही पुटपुटत असे…
बस येत असत …जात असत हा…
असाच अर्धापाऊण तास तसाच स्टॉपवर …
काहीतरी पुटपुटत असे आणि निघून जात असे.
त्याचा तो विस्कटलेला चेहरा पहिला की काही तरी जाणवत असे….
समथिंग काहीतरी घडले हे निश्चित असणार ……
अलीकडे तो दरोरोज दिसत असे ..
मी माझी बस आली की निघून जात असे…
मला त्याच्याशी खरे तर बोलायचे होते पण कसे बोलणार , नाही ओळख , पाळख…
दिवस जात होते, मुंबईला वरळीला काही कामानिमित्त टॅक्सीने एके दिवशी जात असताना, टॅक्सी सिग्नलवर थांबली…
बाजूला एक गाडी थांबली ..ड्राइव्हर सीटवर एक मध्यम वयाचा माणूस होता , गाडी जास्त भारी नव्हती आणि त्याच्या बाजूला बसलेल्या बाईकडे नजर गेली , तिनेही माझ्याकडे गॉगलमधून बघीतले ..
ती तीच होती ….पण आता साडी नव्हती उत्तम ड्रेस होता…हेअर स्टाईल बदलेली होती ..
आणि
ह्यावेळी तिच्या ओठाची लिपस्टिक मात्र मला खूपच गडद वाटली…
सिग्नल सुरु आला ,
तिने माझ्याकडे बघीतले…मला वाटते तिने मला सॉफ्ट स्माईल केले बहुतेक ….
तिची गाडी निघून गेली
परंतु
मात्र माझ्या डोळ्यासमोर ..
त्याचा विस्कटलेला चेहरा सतत येत होता…..
काय झाले असेल त्यांचे…
त्यानंतर तो मला कधीच स्टेशनवर दिसला नाही.
एक दिवशी आमच्या शेजारच्या वृध्द माणसाचे निधन झाले.
मी स्मशानात गेलो…
आधीच गर्दी होती, एका कट्ट्यावर एक डेड बॉडी होती.
ती पाहताच मी हबकलो..
तर तोच होता तो…
स्टेशनवरील चष्मेवाला…
त्याला सरणावर ठेवले , अग्नी दिला गेला..
मी एका माणसाला विचारले , काय झाले
तो म्हणाला ,आत्महत्या केली, विष घेतले.
थोड्या वेळाने फटकन कवटी फुटल्याचा आवाज आला , सगळे निघून गेले.
इथे आमच्या शेजाऱ्यांची तयारी चालू होती.
सर्व काही झाले , चिता धडाडली.
आम्ही जाऊ लागलो.
तितक्यात त्या माणसाच्या चष्मेवाल्या
माणसाच्या चितेसमोर एक स्त्री उभी होती.
मी नीट पहिले तर ती तीच होती, सोडून गेलेली त्याची बायको होती.
अचानक तिने माझ्याकडे पाहिले , बघतच बसली.
मी तिला लांबूनच नमस्कार केला…
तिनेही मला नमस्कार केला..
मी निघालो….
विचारांचा कधीही न गुंतणारा गुंता घेऊन.
— सतीश चाफेकर
Leave a Reply