विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवतगीता : अध्याय २ : श्लोक १२.
परमात्मा, आत्मा, मानवी शरीर, पुनर्जन्म वगैरे संबंधी बरेच तत्वज्ञान, भगवत् गीतेच्या अनेक अध्यायातील अनेक श्लोकात आढळते. असाच एक श्लोक, दुसर्या अध्यायात आढळला….
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले ……
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः |न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् || अध्याय २ : श्लोक १२ ||
शब्दांचे अर्थ : न-कधीच नाही, तु-परंतू, एव-निश्चितपणे, अहं-मी, जातु-कोणताही काळ, न-नाही, आसं-अस्तित्व, न-नाही, इमे-हे सर्व, जनाधिपा:-राजे, न-कधीच नाही, च-सुध्दा, एव-निश्चित, न-नाही, भविष्याम:-अस्तित्वात राहू, सर्वे वयम्-आपण सर्वजण, अत: परम् – या पुढे.
मी, तू आणि हे सर्व राजेमहाराजे वगैरे निश्चितपणे अस्तित्वात नव्हते असा कोणताही काळ कधीही नव्हता आणि यापुढे आपण सर्व अस्तित्वात असणार नाहीत असा काळ भविष्यात कधीही असणार नाही.
याचा सरळ सरळ अर्थ असा की आपण सर्व माणसे भूतकाळातही सदैव अस्तित्वात होतो आणि भविष्यकाळातही सदैव अस्तित्वातच राहू.
मला असे वाटते की, या श्लोकाचा अर्थ फक्त रुशीमुनींना आणि तत्वज्ञांनाच समजणे शक्य आहे. आपण सर्व माणसे, भूतकाळातही अस्तित्वात होतो आणि पृथ्वीवर माणसे जन्म घेत आहेत आणि या पृथ्वीवर सजीव जिवंत राहू शकतात तोपर्यंत आपण सर्व अस्तित्वात राहणारच आहोत या विधानाचा खरा अर्थ सामान्य माणसांना समजणे केवळ अशक्य आहे. या विधानाचा अर्थ असाही होऊ शकतो की आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजेत्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते.
गीतेच्या एका अधिकृत पुस्तकात, या श्लोकासंबंधी, पुढे दिल्याप्रमाणे निरूपण आढळले :: वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलांनुसार, विविध
अवस्थांमध्ये असणार्या असंख्य जीवांचे पालनकर्ता, पुरूषोत्तम श्रीभगवान आहेत. तेच पुरूषोत्तम पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या ह्रदयामध्ये स्थित आहेत. भगवान स्पष्टपणे सांगतात की, ते स्वत:, अर्जुन आणि युध्दभूमीवर असलेले राजे, या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते. हे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही. त्यांचे व्यक्तीत्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्यकाळातही अखंडपणे चालू राहीलच. म्हणून कोणाबद्दलही शोक करण्याचे कारण नाही.
माझ्या, आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरिअल हाच सजीवांचा आत्मा असतो आणि तोच वास्तव शरीर धारण करतो. या सिध्दांताच्या आधारे, गीतेतल्या वरील श्लोकाचा अन्वयार्थ लावता येतो असा माझा विश्वास आहे.
महर्षि व्यासांनी हा श्लोक रचला आहे त्यामुळे, मी असे खात्रीपूर्वक अनुमान काढू इच्छितो की, त्यांना आणि त्यावेळच्या रुशीमुनींना, या पृथ्वीनामक ग्रहावरील सजीवांच्या आनुवंशिक तत्वाविषयी आणि सजीवांच्या उत्क्रांतींची जाणीव होती. तोच विचार त्यांनी या श्लोकात सांगितलेला आहे.
या श्लोकाचा विज्ञानीय अर्थ असा :
आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरिअल हाच सजीवांचा आत्मा असतो आणि तोच वास्तव शरीर धारण करतो. या सिध्दांताच्या आधारे, गीतेतल्या वरील श्लोकाचा अन्वयार्थ लावता येतो असा माझा विश्वास आहे.
आता, शास्त्रज्ञांनी, खात्रीलायक पुराव्यानिशी सिध्द केले आहे की, या पृथ्वीनामक ग्रहावर, अगदी प्राथमिक स्वरूपात, सजीवांचे आगमन, सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वी झाले असावे. त्या सजीवात, डीएनए, जनुके आणि गुणसूत्रही असावीत. कारण ते, आपला आहार मिळवू शकले, त्याचे, त्यांना, हालचाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या जैवउर्जेत रुपांतर करू शकले, त्यांच्या शरीराची वाढ झाली, त्यांना ज्ञानेंद्रिये आणि जननेंद्रिये होती, ते आपल्या प्रजातींची पुनर्निमितीही करू शकले, आपल्यातले आनुवंशिक तत्व, ते पुढील पिढ्यात संक्रमित करू शकले. म्हणजे आनुवंशिक तत्व संक्रमित करण्याची आनुवंशिक आज्ञावलीही त्यांच्यात होती.
त्या वेळी त्या सजीवात, आनुवंशिक तत्व होते. त्यामुळेच ते सजीव जगू शकले, त्यांची वृद्धी झाली, ते आपले वंशज निर्माण करू शकले. या सृजनशील तत्वामुळेच, म्हणजे जेनेटिक मटेरिअल मुळेच, त्यांची संख्या वाढली. पुढे या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होतहोत निरनिराळे प्राणी अस्तित्वात आले आणि शेवटी सुमारे ७० लाख वर्षापूर्वी कपिपासून माणूस उत्क्रांत झाला.
प्राथमिक स्वरूपात अवतरलेल्या या सजीवाचा जीवनक्रम, अबाधितपणे, लाखो पृथ्वीपर्षे चालू राहिला.हे, त्यांच्यातील आनुवंशिक तत्वामुळेच आणि त्यांच्यातील आनुवंशिक आज्ञावलीमुळेच शक्य झाले. इतकेच नव्हे तर, त्यांच्यात उत्क्रांती होऊन, सजीवांच्या अनेक प्रजाती कशा निर्माण झाल्या याची माहिती अनेक पुस्तकात मिळते.
हे प्राथमिक अवस्थेतील सजीव या पृथ्वीवर कुठून? कसे? आणि का? आले हे गूढ अजून कायमच आहे. आनुवंशिक तत्वामुळे त्यांच्या उत्क्रांती कशी झाली हे मात्र थोडेबहुत कळले आहे.
आनुवंशिक तत्व, साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आले, ते पुन्हा पृथ्वीबाहेर गेले नाही. हे अविनाशी आनुवंशिक तत्वच, सजीवांचे नाशवंत शरीर धारण करते.
आनुवंशिक तत्व म्हणजेच पुरूष, शिव आणि त्याने धारण केलेले शरीर म्हणजेच प्रकृती, शक्ती. अविनाशी आनुवंशिक तत्व म्हणजेच सजीवांचा आत्मा.,
महर्षी व्यासांनी लिहील्याप्रमाणे, आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे….मी, तू आणि हे सर्व राजेमहाराजे, आणि सर्व सजीव, आनुवंशिक तत्वाच्या स्वरूपात भूतकाळात अस्तित्वात होते आणि त्याच स्वरूपात ते, पृथ्वीवर सजीव, जोपर्यंत जगू शकतात तोपर्यंत, अस्तित्वात राहणार आहेत. नंतर मात्र हे आनुवंशिक तत्व कुठे आणि कसे जाणार आहे…कसा तर्क करणार? आनुवंशिक तत्वाचे गुणन होते, त्यांची संख्या वाढू शकते, म्हणुनच आज, पृथ्वीवर मानवांची संख्या ७ अब्जापेक्षाही जास्त झाली आहे. रोज लाखो सजीवांची हत्या होते आहे तरी सजीवांची संख्या वाढतेच आहे.
रामायण महाभारत काळातील राजेमहाराजे आणि प्रजा ही देखील या आनुवंशिक तत्वाच्या उत्क्रांतीमुळेच जन्मली.
जीवोत्पत्तीच्या काळापासून हे आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे आणि ही वसुंधरा जोपर्यंत सजीवांना पोसू शकते तोपर्यंत हे आनुवंशिक तत्व, उत्क्रांत स्वरूपात का होईना, अस्तित्वात राहणार आहे.
भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे …..मी, तू, आणि हे सर्व राजेमहाराजे यांत असलेले आनुवंशिक तत्व, पृथ्वीवर सजीव निर्माण झाले तेंव्हापासून अस्तित्वात आहे आणि ते पृथ्वीवर सजीव निर्माण होऊ शकतात तोपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. याचा अर्थ असा की पृथ्वीवरील सजीव, आनुवंशिक तत्वाच्या स्वरूपात सदैव अस्तित्वात राहणार आहेत.
नंतर मात्र हे आनुवंशिक तत्व कुठे आणि कसे जाणार आहे…कसा तर्क करणार? आनुवंशिक तत्वाचे गुणन होते, त्यांची संख्या वाढू शकते, म्हणूनच आज, पृथ्वीवर मानवांची संख्या ७ अब्जापेक्षाही जास्त झाली आहे. रोज लाखो सजीवांची हत्या होते आहे तरी सजीवांची संख्या वाढतेच आहे.
— गजानन वामनाचार्य
शनिवार १७ डिसेंबर २०१६
शनिवारचा सत्संग : ४
मूळ लेख मराठीसृष्टीवर रविवार २६ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाला.
Leave a Reply