नवीन लेखन...

भज गोविन्दम् – भाग १ – द्वादशमंजरिका – मराठी अर्थासह

‘भज गोविंदम्’ हे जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले काव्य आहे. लौकिक अर्थाने हे कोण्या  देवतेचे स्तोत्र नसून ही एक छोटीशी रचना आहे. ताला सुरावर भजन म्हणून ते गायले गेले असले तरी त्यात वेदांताचे सार आहे आणि त्यात मनुष्याला एक विनवणी केली आहे की, विचार कर…. मी इथे या जीवनात का आहे? मी संपत्ती, कुटूंब एकत्र करीत आहे, परंतु मनाला शांतता का लाभत नाही? सत्य काय आहे? जीवनाचा हेतू काय आहे? अशा प्रकारे विचार जागृत केलेली व्यक्ती दैवी तत्त्वाकडे परत वळते. आचार्यांचे शब्द खूपच भेदक व कठोर वाटतात आणि त्यात मुक्ती प्राप्त करण्याचे एक निश्चित तत्वज्ञान आहे.

या रचनेच्या मुळाशी एक घटना आहे. आदि शंकराचार्यांच्या काशी मुक्कामात त्यांना गंगातीरी पाणिनीय संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करणारा एक वृद्ध दिसला. त्याची केवळ बौद्धिक कसरतीची चाललेली दुर्दशा पाहून आचार्यांना कीव वाटली की, आयुष्याच्या या वळणावर व्याकरणापेक्षा प्रार्थना आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ घालवणे हे अधिक चांगले. जगातील बहुसंख्य लोक ईश्वरी चिंतनाऐवजी केवळ बौद्धिक, इंद्रिय सुखात व्यग्र आहेत. हे पाहून त्यांना ‘भज गोविंद’ हे उपदेशपर काव्य स्फुरले. ३१ श्लोकांमध्ये ते आपल्या चुकीच्या गोष्टी, जीवनाबद्दल आपला चुकीचा दृष्टीकोन स्पष्ट करतात आणि आपले अज्ञान आणि भ्रम दूर करतात.

‘भज गोविंदम्’ मूलतः ‘मोहम्-उद्गार’ – भ्रम दूर करणारे (काव्य) म्हणून ओळखले जात असे. या काव्यात आचार्यांनी चांगलीच कान उघाडणी केली आहे की, संपत्ती गोळा करणे, वासनापूर्ती यासारख्या गोष्टी निरुपयोगी व क्षुल्लक आहेत. त्यामध्ये आपला वेळ घालवण्याऐवजी वास्तव आणि अवास्तव, अचल-चल, स्थिर-चंचल, सार्वकालिक -क्षणिक यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी ज्ञान जोपास. आत्म-ज्ञाना व्यतिरिक्त इतर सर्व ज्ञान निरुपयोगी आहे. आपल्या सांसारिक अस्तित्वाचा हेतू गोविंदाचा शोध घेणे आणि त्याला प्राप्त करणे हाच असला पाहिजे. आचार्यांचे हे मार्गदर्शन मानवी त्रासांच्या स्वरूपाविषयी जागरूकता, या त्रासांची कारणे, त्यांच्या निराकरणाचे मार्ग व चिरंतन आनंदाची अवस्था असे आहे.

‘भज गोविंदम्’ चे  द्वादशमंजरिका स्तोत्रम आणि चतुर्दशमंजरिका स्तोत्रम असे दोन भाग पडतात. असे म्हणतात की, पहिला श्लोक रचल्यानंतर ‘भज गोविंदम्’ चे पुढील १२ श्लोक आचार्यांना स्फुरले. म्हणून श्लोक २-१३ यांना द्वादशमंजरिका स्तोत्रम् म्हणतात. आचार्यांच्या उत्स्फूर्त पठणातून प्रेरित होऊन, त्यांच्या १४ शिष्यांपैकी प्रत्येकाने एक श्लोक रचला. या संकलनाला चतुर्दशमंजरिका स्तोत्रम् असे म्हणतात. परंतु या श्लोककर्त्यांसाठी सांगोवांगी कथांखेरीज दुसरा आधार नाही. शेवटी आचार्यांनी स्वतःचे पाच श्लोक जोडून श्लोकांची एकूण संख्या ३१ केली. या ३१ श्लोकांना ‘मोहम्-उद्गारः’ असेही म्हटले जाते. त्यालाच द्वादशमंजरिका आणि चतुर्दशमंजरिका असेही नाव आहे. भजन या स्वरूपात असल्याने त्याची रचना कोणा एका वृत्तात केलेली नाही.


भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते ।
संप्राप्ते सन्निहिते काले, न हि न हि रक्षति डुकृञ् करणे ॥ ०१॥

मराठी- गोविंदाचे भजन कर, गोविंदाचे पूजन कर, गोविंदाचे स्मरण कर. अरे मूर्खा, (तुझा) मृत्यू जवळ येऊन ठेपलेला असताना कृ धातू चालवणे (व्याकरण) तुझे रक्षण करणार नाही.

हरिनामा घे, हरिनामा घे, घे हरिनामा मूर्खगणा ।
जवळी ठेपलिया मरणा, तारण ना तुज व्याकरणा ॥ ०१


मूढ़ जहीहि धनागमतृष्णाम्, कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम्  ।
यत् लभसे निजकर्मोपात्तम्, वित्तं तेन विनोदय चित्तं  ॥ ०२॥

मराठी- अरे वेड्या, संपत्ती गोळा करण्याच्या लालसेला दूर सार. आपल्या मनात चांगले विचार करून इच्छेपासून मुक्तता मिळव. तुझ्या कार्यानुसार जे धन तुला मिळते त्याने आपल्या मनाचे समाधान मान.

सोड अडाण्या संपत्तीचा साठा हेतु, समाधान तू मान कसा  ।
कर्माने तव योग्य मिळे धन, समाधान तू मान कसा  ॥ ०२


नारीस्तनभरनाभीदेशम् दृष्ट्वा मा गा मोहावेशम्  ।
एतन्मांसवसादिविकारम्, मनसि विचिन्तय वारं वारम्  ॥ ०३॥

मराठी- स्त्रीचे घाटदार वक्ष आणि नाभीचा खळगा पाहून तू मोहात पडू नकोस. ती मांस चरबी यांचीच वेगवेगळी रूपे आहेत याचा तू मनात वारंवार विचार ठेव.

नको पडू तू मोही स्त्रीचे नाभी स्तन घट बघुनी ।
विभिन्न आकृति मांस नि चरबी जाण नित्य ही ठेव मनी ॥ ०३


नलिनीदलगतजलमतितरलम्, तद्वज्जीवितमतिशयचपलम्  ।
विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं, लोकं शोकहतं च समस्तम्  ॥ ०४॥

मराठी- कमळाच्या पानावर पाणी जसे अत्यंत प्रवाही असते त्याप्रमाणे हे जीवनही अत्यंत अस्थिर आहे. हे सर्व (विश्व) रोगराई अहंकार आणि दुःखात बुडालेले आहे हे तू समजून घे.

कमळ लतेच्या पर्णी पाणी धावे तेवी अतिशय चंचल जीवन रे ।
मीपण ताठा गर्व रोग दुःखाने भरले जग सारे  ॥ ०४


यावद्वित्तोपार्जनसक्त:  तावन्निजपरिवारो रक्तः  ।
पश्चाज्जीवति जर्जरदेहे, वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे  ॥ ०५॥

मराठी- जोवर तो पैसा मिळवण्यात सक्षम आहे तोवर (त्याला) आपल्या कुटुंबाकडून प्रेम मिळते. त्यानंतर (मात्र) तो वृद्ध जगतो, पण घरात त्याची नाव गोष्टही कोणी विचारत नाही.

सक्षम जेव्हा पैसा मिळण्या, प्रेम लाड कुटुंबी नाना |
नंतर वृद्ध घरी जै राही नावगाव कोणी पुसती ना ॥ ०५


यावत्पवनो निवसति देहे,  तावत् पृच्छति कुशलं गेहे ।
गतवति वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन्काये  ॥ ०६॥

मराठी- जोवर शरीरात वायु (प्राण) रहातो, तोवर घरात हालहवाल विचारतात. (परंतु) वायू तनूला सोडून गेला असता, त्या देहाला पत्नीसुद्धा घाबरते.

जोवर वायू शरिरी वाहे तोवर हालहवाल पुसे ती  ।
तनुतुन वायू निसटे तेव्हा भार्याचित्ता वाटे भीती  ॥ ०६


बालस्तावत् क्रीडासक्तः, तरुणस्तावत् तरुणीसक्तः  ।
वृद्धस्तावच्चिन्तासक्तः, परे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः  ॥ ०७॥

मराठी- लहानपणी (माणूस) खेळात रमतो, तरुणपणी तो तरुणीत रमतो, म्हातारपणात तो काळज्यांनी ग्रासतो, परंतु श्रेष्ठ अशा परब्रह्मात कोणीच रमत नाही.

बाल्य सरे खेळात, रमे रमणीतच तरुणाई |
वार्धक्यी नाना चिंतांनी, ब्रह्मचिंतना समयो नाही ॥ ०७


का ते कांता कस्ते पुत्रः, संसारोऽयमतीव विचित्रः  ।
कस्य त्वं वा कुत अयातः, तत्त्वं चिन्तय तदिह भ्रातः  ॥ ०८॥

मराठी-  अरे, हा संसार फार विचित्र आहे. तुझी बायको कोण आहे, तुझा मुलगा कोण आहे, तू स्वतः कोण आहेस, किंवा कुठून आलास ? बन्धो, याचा पुनःपुनः विचार कर.

कोण तुझा सुत, दारा, हा संसार निरर्थक भारी  ।
कुठला कोण खरा तू बंधो, याचा नित्य विचार करी  ॥ ०८


सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं  ।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः  ॥ ०९॥

मराठी- सज्जनांच्या सहवासातून वैराग्याकडे, वैराग्यातून विवेकाकडे, विवेकातून (मनाच्या) स्थिरतेकडे आणि स्थिरतेकडून मोक्षाची गती मिळते.

संतसंगे विरक्ती ये, वैराग्यांती विवेक ये ।
विवेकी स्थैर्य बुद्धीचे, मुक्ति त्यातून लाभते ॥ ०९


वयसि गते कः कामविकारः, शुष्के नीरे कः कासारः  ।
क्षीणे वित्ते कः परिवारः, ज्ञाते तत्त्वे कः संसारः  ॥१०॥

मराठी- वय उलटून गेल्यानंतर कामवासना कोठे रहाते ? पाणी आटून गेल्यावर तलाव कुठे रहातो ? जवळचा पैसा संपल्यावर कुटुंब (तरी) कुठे रहाते ? (जीवनाचे) अंतिम तत्त्व समजल्यावर संसार तरी कुठे रहातो ?

गेले वय कामही संपला, पाणी सरता तलाव कोठे ।
पैसा गेला कुटुंब कैचे, तत्त्व जाणता जग खोटे ॥ १०


मा कुरु धनजनयौवनगर्वं, हरति निमेषात्कालः सर्वं  ।
मायामयमिदमखिलम् हित्वा, ब्रह्मपदम् त्वं प्रविश विदित्वा  ॥ ११॥

मराठी- संपत्ती, सगेसोयरे, तारुण्य यांचा अभिमान धरू नकोस. क्षणभरात काळ हे सर्व हरण करणार आहे. या सर्व आभासी जगाकडे दुर्लक्ष करून तू जाणता होऊन ब्रह्मपदी प्रवेश कर.

नको गर्व तारुण्य, पैसा, सग्यांचा, झणी काळ सर्वांस नाशी ।
आभास हे सर्व सोडून देई, हो जाणता, ब्रह्मपदी प्रवेशी ॥ ११


दिनयामिन्यौ सायं प्रातः, शिशिरवसन्तौ पुनरायातः  ।
कालः क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुन्च्त्याशावायुः  ॥ १२॥

मराठी- दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, शिशिर वसंत ऋतू पुनःपुनः येतात. समयाचा खेळ चालतच रहातो, आयुष्य जाते पण तरीही इच्छांच्या प्रवाहाला काही (हा) सोडत नाही.(इच्छांचा अंत होत नाही).

निशी-दिन, शिशिर-वसंत, नि संध्या-सकाळ, वारंवार  ।
खेळे काळ, नि जिणे संपले, खळत न आशा-धार ॥ १२


द्वादशमंजरिकाभिरशेषः कथितो वैयाकरणस्यैषः  ।
उपदेशोऽभूद्विद्यानिपुणैः, श्रीमच्छंकरभगवच्चरणैः  ॥ १३॥

मराठी- सर्वज्ञ श्रीमत् प्रभुपाद शंकराचार्यांनी या बारा श्लोकांचा उपदेश (तुर्‍यांचा गुच्छ) एका व्याकरणकाराला कथन केला.

सर्वज्ञ प्रभुपादांनी आचार्यांनी सांगितले उपदेशा  ।
बारा श्लोकी गुच्छा, गंगातीरी व्याकरणी पुरुषा  ॥ १३

। श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले भज गोविंदम् – द्वादशमंजरिका स्तोत्र समाप्त ।

***************

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

3 Comments on भज गोविन्दम् – भाग १ – द्वादशमंजरिका – मराठी अर्थासह

  1. भज गोविंदम् भज गोपालम् या स्तोत्राचा अर्थ हे आपल्या मानवी संपूर्ण जीवनाचे सार , नैतिक मूल्य अंत्यत सुलभ भाषेत समजले खूप छान

  2. खूप छान मराठी भाषा समृद्ध होत आहे ह्याचा आनंद आहे.

  3. खूप सुंदर. मी चर्पट पंजरी बद्दल ऐकून होतो. काही श्लोकांचे विश्लेषण पण ऐकले होते. आज मात्र पद्य स्वरूपात एक नवीन अनुभव (कदाचित आस्वाद हा शब्द येथे योग्य ठरेल) मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..