एक राजा हौसेने दोन गरुड आणतो. त्याला त्या गरुडांची आकाशातली भव्य भरारी पहायची असते. एका गरुडाला हातावर घेऊन तो आकाशाकडे उडवतो. क्षणार्धात तो गरुड आकाशात झेप घेतो. राजा अगदी हरखून जातो. दुसऱ्या गरुडालाही तसेच झेप घेण्यासाठी तो हातावर घेतो. मात्र हा गरुड न उड़ता झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. राजा हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. गरुड काही केल्या उडत नाही.
शेवटी कंटाळून राजा दवंडी पिटतो की जो कोणी या गरुडाला उडवून दाखवेल त्याला भरघोस बिदागी देण्यात येईल. पुष्कळ लोक येतात आणि प्रयत्न करतात. गरुड कोणालाच बधत नाही. अखेर एक दिवस एक शेतकरी राजाला भेटतो. तो म्हणतो “मी फार लहान माणूस आहे. पण तुमच्या गरुडाला उडवायचा प्रयत्न करतो.” राजा त्याला संमती देतो.
काही वेळाने तो शेतकरी राजाकडे परततो आणि म्हणतो “बघा महाराज, तुमचा गरुड कसा अस्मानात भरारी घेतो आहे. राजा अविश्वासाने बघतो ते काय! खरोखरीच तो गरुड ऊंच भरारी घेत असतो. राजा चकीत होतो.
त्या शेतकऱ्याला विचारतो “तू असे नेमके काय केलेस ज्यामुळे हा गरुड त्याची फांदी सोडून उडू लागला? ”
शेतकरी म्हणतो “काही नाही महाराज, मी फक्त ज्या फांदीवर तो बसला होता ती फांदी तोडून टाकली.” राजा हसतो. त्याला लक्षात येते की शेतकऱ्याने गरुडाची मानसिकता ओळखून योग्य उपाय केला आहे. राजा त्याला भरपूर बिदागी देतो.
आपणही त्या गरुडासारखेच असतो. गरुड व त्याची आकाशाला गवसणी घालण्याची ताकद दोन्ही आपल्यामध्ये असतातच परंतु आपण त्याकडे लक्षच देत नाही. फांदीवर बसून जेवढे जमेल तेवढे आणि तसेच आपण जगतो. ऊंच भरारी मारण्यासाठी थोडेसे धाडस करावे लागते. आपली त्याची तयारी नसते.
आपल्याच गावात, आपल्याच घराजवळ काम मिळाले तर ते करावे. घराची ऊब सोडू नये असेच आपले विचार असतात. परंतु आपल्यामधे काहीतरी नवीन करुन दाखविण्याची धमकही असते त्याचा आपण विचारच करत नाही. थोडक्यात म्हणजे कूपमंडूक वृत्ती धारण करुन आपण आपले जीवन जगत रहातो. मग ते कसे निरस आहे याचा विचार करत दुःखी होतो. शेतकऱ्याने गरुडाची फांदी तोडून टाकली. आपल्या जीवनात असा कोणी शेतकरी येईलच असे नाही. ही फांदी आपणच सोडायची असते आणि आकाशात भरारी घ्यायची असते.
ज्या लोकांनी आयुष्यात काहीतरी विशेष मिळविले आहे त्यांनी अशीच तर भरारी घेतली होती. आपल्या रोजच्या ऊबदार जीवनाला त्यागून त्यांनी एका अज्ञातात भरारी घेतली होती आणि त्यांना आकाश गवसले होते. चंद्र तारे सापडले होते. आपल्यालाही हे सगळे मिळणे सहज शक्य आहे. पण आपण त्या गरुडासारखे फांदीलाच चिकटून राहिलो तर आपण आकाशात उडणार कसे?
ही गोष्ट प्रतिकात्मक आहे. चला तर, आपणही ऊंच भरारीला सज्ज होऊया.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply