नवीन लेखन...

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस

६ एप्रिल १९८० हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस.

भारतीय जनता पक्षाचा स्थापने पूर्वी हा पक्ष भारतीय जनसंघ म्हणून ओळखला जात होता. स्व. पंडित दिनदयाळ उपाध्याय या नेत्यांच्या आदर्श विचारप्रणालीनुसार जनसंघाची वाटचाल सुरू होती. विचारांना राष्ट्रहिताचे अधिष्ठान असेल तर राजकीय भूमिका कधीच चुकणार नाही, या प. दिनदयाळ उपाध्याय यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यावेळी जनसंघाची वाटचाल प्रखर राष्ट्रवादाच्या मुदयावर सुरू होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी हा एक पक्ष. भारतीय जनता पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी मानली जातात.

सध्याच्या घडीला संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या कडून पाकिस्तानचे होणारे लांगुलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरूण नेत्यांनी जनसंघाची सुत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.

जनता पार्टीच्या विघटनानंतर ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. पक्षाच्या घटनेनुसार सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजीनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात ‘सर्व धर्म समभाव’ आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनीच जनसंघ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचा शाखाविस्तार राष्ट्रीय विचारसरणीच्या महाराष्ट्रात होणे स्वाभाविकच होते. स्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले.

आजही योग्य विचारसरणी घेऊन काही लोक, कार्यकर्ते भाजपात येत आहेत. तथापि सत्ता मिळविणे व योग्य राबविणे हे जरी पक्षांचे अंतिम लक्ष्य असले तरी पक्षाची ध्येय-धोरणे पायदळी तुडवीली जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे काम पक्ष वाढत असताना अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांनी प्रकर्षाने घ्यावी लागली गेल्या ३७ वर्षात भाजपचा प्रवास गावपातळीपासून तर थेट देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत झाला. या काळात पक्षात सत्तसंपादनाच्या हेतूने अनेक पक्षांचे नेते व कार्यकर्ते आले. ज्यांना पक्षाची विचारधारा, ध्येय धोरणे आवडली, रुचली, पटली ते थांबले व जे फक्त सत्तासुंदरीकडे पाहून पक्षात आले ते परत बाहेर गेले. देशाचे पंतप्रधानपद मिळाल्यानंतर अटलजींनी योग्य धोरणे राबवून देशाला गौरव प्राप्त करून दिला. अणुस्फोट चाचणी, कारगिल युध्दात विजय प्राप्त करून भारत स्वयंसिद्ध असल्याचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दाखवून दिले. या काळात इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये फाटाफूट होऊन अनेक वेगवेगळे पक्ष तयार झाले. थोड्या फार प्रमाणात त्यांना राज्य व केंद्र स्तरावर त्यांना यश आले, तथापि या काळात भाजपातून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर एकही पक्ष यशस्वी होऊ शकला नाही. हेच पक्षाच्या यशाचे गमक आहे.

महाराष्ट्रात वसंतराव भागवत, उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, बाळासाहेब कानेटकर,झमटमल वाधवाणी, बबनराव देशपांडे, मधुकरराव महाजन, राम कापसे, वसंत पटवर्धन, जयवंतीबेन मेहता, हशू आडवाणी या सारख्या कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीतून पक्ष वाढीस लागला. महाराष्ट्रात पक्षाची प्रतिमा निर्माण झाली, आपुलकी वाढली. भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजू लागली, तशी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धरमचंद चोरडीया, नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, विश्वास गांगुर्डे, प्रकाश जावडेकर, रामदास नायक, या नव्या दमाच्या शिलेदारांची जोड मिळाली. पक्षाची घोडदौड आता सुरु झाली. त्यांच्यामुळेच १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पाडाव करून भाजपा शिवसेनेसह सत्तेत आली. याच काळात, पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री होते. त्यांनी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई महानगरातील अनेकविध उड्डाणपूल बांधून राज्यातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा दिली.

आज सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, किरीट सोमैय्या, पंकजा मुंडे, आदी पुढच्या पिढीतील नेते पक्षाची धुरा पुढे वाहत आहेत. पक्षाचा इतिहास, वाटचाल, शिस्त, विचारधारा, या सर्व कार्यकर्त्यांमध्ये यावी, जेणेकरून चांगल्या कार्यकर्त्यांचा शिस्तबध्द पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा यापुढेही उजळत राहील, हीच या वाढदिवसानिमित निमित्त अपेक्षा.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..