व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला शशिकांत घासकडवी यांचा लेख
फारच बरी निरव गति परवशता शतगुणे करी जाच पंडित विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमाला साप्ताहिकात ‘ आमच्या देशाची स्थिती ‘ या निबंधात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी वरील काव्यपंक्तीचा उल्लेख करून परकीयांची सत्ता ही नेहमीच जाचक असते हे ठामपणे पटवून दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी ही लेखमाला सुरू केली असली तरी विष्णुशास्त्रींच्या एकूण लिखाणात स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा सार्थ अभिमान आढळून येतो. किंबहुना हीच त्यांच्या लेखनामागील मूलप्रेरणा होती. ह्या तिन्ही संदर्भात सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा ह्यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतावणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. हा काळ १८७२ ते १८८६ पर्यंतचा होता. कोणत्याही राजकीय वा सामाजिक चळवळीत विष्णुशास्त्री प्रत्यक्ष पडले नाहीत, परंतु त्यांनी आपल्या लेखनातून परंपराभिमानी राष्ट्रवाद जोपासला. तत्कालीन प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, आंग्लशिक्षित सुधारक मंडळी, ख्रिस्ती धर्मोपदेशक ह्यांच्यावर त्यांनी परखड शब्दात टीका केली. परंतु या लेखनातून केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यालाच नव्हे तर स्वदेशी विचारांनाही त्यांनी चालना दिली. इ.स. १८५० ते १९५० या शतकात स्वदेशी चळवळ व भारतीय स्वातंत्र्यलढा ही दोन्हीही आंदोलने हातात हात घालून पुढे सरकत होती. ब्रिटिश साम्राज्यवादाचा विरोध हा त्यांचा पाया होता.
स्वातंत्र्याचा लढा व स्वदेशी चळवळ हा विषय समजून घेताना इ.स. १८५० च्या पूर्वी देखील जे स्थानिक उठाव झाले त्याचीही पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. यात शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केल्याचे दिसून येते. कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला. इ.स. १७६३ ते १८५६ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उठाव केले. असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले.
छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केले. बिहारमध्ये संथाळांनी तर फार मोठ्या प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी अनेक ठिकाणच्या कारभारात ईस्ट इंडिया कंपनीने हस्तक्षेप केलेला खूपशा संस्थानिकांना आवडला नव्हता. त्यातून वदेशी व संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी अधिक तीव्र होऊ लागली.
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
इ.स. १८५७ च्या या उठावाच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यात यश मिळविले असले तरी प्रारंभीच्या काळापासूनच कंपनीला भारतीयाचा विरोध सहन करावा लागत होता. इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणामुळे व भारतीयाचे आर्थिक शोषण करण्याच्या त्यांच्या नीतीमुळे ब्रिटिशांविरुद्ध भारतीय समाजात असंतोष खदखदत झाला होता. या असंतोषातूनच ठिकठिकाणी बंड व उठाव घडून आले होते. तथापि, या उठावांना स्थानिक स्वरूप असल्याने हे उठाव इंग्रजी सत्तेपुढे फार मोठे आव्हान उभे करू शकले नाहीत. इ.स. १८५७ च्या उठावाचे स्वरूप मात्र वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण होते. या उठावाची व्याप्ती मोठी असल्याने ब्रिटिशांपुढे हा उठाव एक आव्हान ठरले. भारतातील इंग्रजी सत्ता नष्ट करण्याचा भारतीय जनतेने केलेला हा मोठ्या प्रमाणावरील एक प्रयत्न होता. या उठावाच्या रूपाने भारतीय समाजाच्या मनात इंग्रज सत्तेविषयी असलेला असंतोष उफाळून आला. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी भारतीय समाजमनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेल्या असंतोषाचे प्रगट झालेले ते एक रौद्र स्वरूप होते.
भारतात ब्रिटिश राजवटीत भारतीय उत्पादनांचा तो भाग जो सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध नव्हता आणि राजकीय कारणांमुळे इंग्लंडकडे जात होता, त्या बदल्यात भारताला काहीही मिळाले नाही. त्याला ‘इकॉनॉमिक एक्झीट’ किंवा ‘ड्रेन ऑफ वेल्थ’ म्हटले जायचे. व्यापारी विचारांच्या इंग्रजांनी क्रमाने पैसे काढण्याची संकल्पना विकसित केली. त्या काळातील अनेक आर्थिक इतिहासकारांनी पैशाची हद्दपारी करण्याच्या तत्त्वावर आपले मत व्यक्त केले. यात, दादाभाई नवरोजी यांनी सर्वप्रथम त्यांच्या ‘पोव्हर्टी अँड ब्रिटीश रुल इन इंडिया’ या पुस्तकात आर्थिकदृष्ट्या बाहेर पडणाऱ्या पैशाची संकल्पना मांडली. यालाच ‘धननिष्कासन सिद्धांत’ असे म्हटले जाते. ते म्हणतात की, देशाची संपत्ती बाहेर जाणे हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे आणि भारतीय गरिबीचे मूळ आहे. त्यानंतर रमेशचंद्र दत्त, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या राष्ट्रवादी विचारवंतांनी संपत्ती हद्दपार करण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. एकार्थाने स्वदेशी चळवळीची दिशा या विचारातून प्रकट झाली.
या सर्वांच्या मते सिंचन योजनांवर खर्च करण्याऐवजी सरकार अशा वस्तूंवर खर्च करते जी थेट साम्राज्यवादी सरकारच्या हिताशी संबंधित असते. ब्रिटिश प्रशासकीय व सैन्य अधिकाऱ्यांचे पगार व भत्ते, भारताबाहेर परदेशातून घेतलेल्या कर्जावरील व्याज, नागरी व लष्करी विभागांसाठी यूके स्टोअरमधून खरेदी केलेला माल, शिपिंग कंपन्या व परदेशी बँकांना दिलेली देयके हे आर्थिक संपत्ती देशाच्या पलीकडे जाण्याचे मुख्य घटक होते.
इंग्लंडला भारतीय पैसे सोडल्यामुळे भांडवल भारतात उभे राहिले नाही तसेच ते गोळा होऊ शकले नाही, तर इंग्लंडमधील औद्योगिक विकासाची साधने व गती मोठ्या प्रमाणात वाढली. या पैशातून ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मिळालेला लाभांश नंतर भांडवलाच्या रूपात भारतात परत करण्यात आला नाही आणि अशा प्रकारे भारताचे शोषण वाढतच गेले. या पैशांची परतफेड न केल्याने भारतातील रोजगार आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊन संपत्तीची अफाट हद्दपारी भारताला कमकुवत करू लागली. यातूनच स्वदेशीची संकल्पना मूळ धरू लागली.
स्वदेशी संकल्पना
स्वदेशी तत्त्वज्ञानाची संकल्पना म्हणजे आत्म जागृती करणे स्वदेशी तत्त्वज्ञान म्हणजे आपल्या शाश्वत जीवन मूल्यांच्या प्रकाशात, आपला देश आणि समाजातील नैसर्गिक आणि सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात मुख्यत्वेकरून आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानुसार देशाच्या संसाधनांवर आणि देशाच्या कौशल्यांच्या आधारावर शक्ती आणि ऊर्जा जागृत करून संतुलित आणि सर्वांगीण विकास करणे होय. स्वदेशी संकल्पना एक बहुआयामी, सर्वव्यापी, वैश्विक संकल्पना आहे. या मूलभूत अशा स्वदेशी चिंतनातूनच भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती प्राप्त झाली असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
भारतीय स्वातंत्र्य व स्वदेशीचा इतिहास
स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणाकेंद्र देशी – स्वदेशी भावना आणि निर्मिती यासाठी विविध प्रयत्नांनी संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीला गती आणि ऊर्जा दिली. दादाभाई नवरोजी यांनी त्यांच्या आर्थिक माघार तत्त्वाच्या आधारे स्वातंत्र्य चळवळीची व्याख्या केली. भारतातील आर्थिक राष्ट्रवादाची खरी अभिव्यक्ती म्हणजे ‘स्वदेशी’ असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचा ट्रेंड निर्माण होऊन पुण्यातून प्रकाशित झालेल्या भास्कर या पत्रामध्ये स्वदेशीचा सर्वप्रथम उल्लेख करण्यात आला. या वृत्तपत्रात, परदेशातून आयात केलेल्या उत्पादनांच्या जागी भारतीयांना भारतीय उत्पादनांचा वापर करण्यास सांगितले गेले होते.
१८५७ मध्ये पंजाबमध्ये कोका चळवळीची सुरुवात सद्गुरु रामसिंहजींच्या योजनेतून आणि स्वदेशी सिस्टिमच्या उद्घाटनानंतर नामधारी ग्रंथाच्या प्रेरणास्रोतातून सुरू झाली. नवगोपाल मित्र आणि राजनारायण घोष यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये हिंदू (स्वदेशी) जत्रा आयोजित करण्यास प्रारंभ केला. महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात आर्थिक विषयावर जाहीर भाषण आयोजित केले. ज्यामध्ये स्वदेशीचे जोरदार समर्थन केले. याच काळात स्वामी दयानंद सरस्वती, महर्षी योगी अरविंद, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, महात्मा गांधी, बाबू गेनु इत्यादींनी या स्वदेशी चळवळीला विशेष बळ दिले त्यामुळे या सर्वांनाच स्वदेशी चळवळीचे आधारस्तंभ मानले जाते.
इ.स. १९०५ मध्ये वंगभंग-विरोधी चळवळीस सुरुवात झाल्याने ‘लाल, बाल, पाल’ या तीन प्रमुख नेत्यांनी गती मिळविली. अरविंद घोष यांनीही बंगालच्या फाळण्याच्या निषेधार्थ मुख्य स्वदेशी चळवळ सुरू केली. ऑगस्ट १९०१ रोजी कलकत्ताच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत ही चळवळ औपचारिकरित्या सुरू झाली. कृष्णाकुमार मित्रांच्या पत्रिकेत यांचा प्रथम विचार मांडला गेला. या आंदोलनात स्वदेशी नेत्यांनी भारतीयांना सरकारी सेवा, शाळा, न्यायालये आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आणि स्थानिक कॉलेज व शाळा स्थापन करून देशी वस्तूंना प्रोत्साहन व राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. ही केवळ आर्थिक चळवळच नव्हती तर यामुळे स्वदेशी चळवळीला प्रचंड यश मिळाले. बंगालमधील जमीनदारही या चळवळीत सहभागी झाले होते. महिला व विद्यार्थी देखील या चळवळीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी परदेशी कागदावरुन तयार केलेल्या पुस्तकांवर बहिष्कार घातला. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष अशा अनेक नेत्यांना यावेळी तुरुंगात डांबले गेले. बऱ्याच भारतीयांनी नोकऱ्या गमावल्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी या चळवळीत भाग घेतला त्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. या चळवळीदरम्यान वंदे मातरम् गाणे म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आला. देशात प्रथमच उत्पादित वस्तूंचा वापर विचारात घेण्यात आला.
स्वदेशी चळवळीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आत्मविश्वास किंवा आत्म-शक्तीवर जोर देणे. या दरम्यान बंगाल केमिकल, स्वदेशी स्टोअर्सची स्थापना आचार्य पी.सी. राय यांनी केली, लक्ष्मी कॉटन मिल, मोहिनी मिल आणि नॅशनल टॅनरी असे अनेक उद्योग यावेळी सुरू करण्यात आले.
अर्थव्यवस्थेची देशी रचना
स्वदेशी पद्धतीनुसार भांडवलशाही आणि समाजवादी रचनेचा एकमेव पर्याय विकेंद्रित अर्थव्यवस्था असू शकतो. गांधीजींच्या स्वराज कल्पनेतही स्वदेशी अर्थव्यवस्था प्रमुखपणे मांडण्यात आली होती. स्वदेशी म्हणजे – ब्रिटनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालणे आणि भारतामध्ये बनविलेल्या मालाचा अधिकाधिक वापर करून साम्राज्यवादी ब्रिटनचे आर्थिक नुकसान करणे आणि भारतातील लोकांना रोजगार निर्मिती ही या धोरणाची उद्दिष्टे होती. ब्रिटिश राजवटीचा पाडाव करण्यासाठी आणि भारताच्या एकूणच आर्थिक व्यवस्थेच्या विकासासाठी हे अंगभूत साधन होते. भारतात स्वदेशीचा पहिला नारा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी विज्ञान सभेचा प्रस्ताव देऊन दिला होता. ते म्हणाले होते- जर आपण स्वदेशी असता तर आपले गुलाम असणारे विज्ञान परदेशी असल्याने आपले मालक बनले आहे, आपण दिवसेंदिवस गरीब होत चाललो आहोत. शंभुचंद्र मुखोपाध्याय यांनी प्रमोट केलेल्या मुखर्जीच्या मासिकामध्ये भोलानाथ चंद्र यांनीही स्वदेशीचा नारा दिला.
स्वदेशी चळवळीत टिळकांचे योगदान
टिळक हे एखादा आर्थिक सिद्धांत मांडणारे अर्थशास्त्री नव्हते. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी अर्थशास्त्र हा विषय तज्ज्ञांवर सोडला होता. टिळकांनी मात्र तसे केले नाही. राजकीय अर्थकारणाच्या खाचाखोचा पूर्णपणे जाणून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी जनमत तयार केले. ‘हिंदी स्वराज्य हा केवळ वरिष्ठ वर्गाच्या स्वाभिमानाचा किंवा संस्कृतिरक्षणाचा अथवा वैभवाचा प्रश्न नसून, तो सामान्य जनतेतील कोट्यवधी जीवांच्या पोटाचा, प्राणधारणेचा आणि क्लेशरहित व रोगरहित जीवनाचा प्रश्न आहे. याची राजकीय जाणीव लोकमान्यांनी जनमानसात रुजवली.
हिंदू-मुस्लिम दंगे आणि त्यातील ब्रिटिशांचं पक्षपाती धोरण, वंगभंग, क्रॉफर्ड प्रकरण, दारूबंदी इत्यादी राजकीय – प्रशासकीय, तसेच सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून लोकमान्य, ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध जनमत तयार करत होते. तसंच ते आर्थिक प्रश्नांच्या माध्यमातूनही राजकीय असंतोष निर्माण करत होते. परतंत्र देशातील लोकांचे नेते, या नात्याने होत असलेल्या आर्थिक अन्यायाला वाचा फोडणे, त्यावर तत्कालीन उपाय शोधून लोकांचा त्रास कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणे, भारतीयांचे आर्थिक हितसंबंध जपणे, या कार्यातून त्यांनी भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात केली. त्याचा राजकीय दृष्ट्या वापर करून घेतला. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार वगैरे माध्यमातून लोकांची मोठ्या दीर्घकालीन लढ्याची तयारी पक्की करून घेतली. त्यांनी त्या पायावर स्वराज्याची लढाई उभी केली. एवढेच नाही तर अनेक स्वदेशी उद्योग सुरू करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक काकांच्या मदतीने प्रयत्न केले.
साधारणतः सन १९९० च्या सुमारास लोकमान्य टिळक यांनी आपल्या ‘केसरी’तून स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला. भारतातील कच्चा माल इंग्लंडमध्ये नेऊन तेथून पक्का माल भारतात आणून विकण्याचे ब्रिटिशांचे धोरणच होते. विशेषतः वस्त्रोद्योगात त्यांनी हे धोरण प्रकर्षाने राबविले. स्थानिक कुशल कारागिरांच्या हाताचे कामच या धोरणाने काढून घेतले त्यामुळे बारा बलुतेदारी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर गेली. शिवाय, मातीमोल खर्चाने खरेदी केलेल्या कच्च्या मालावरील प्रक्रियेतून तयार झालेल्या कापडावर ब्रिटिश भरघोस नफा मिळवतात, हे वास्तव होते. ब्रिटिशांचा हा आर्थिक कणा खिळखिळा करणे आणि त्यातूनच भारतीयांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणे हे टिळकांचे हेतू. याच हेतूतून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पुण्यात परदेशी वस्त्रांची होळी पेटविली. त्यांच्या या आंदोलनातून अनेकांनी स्फूर्ती घेतली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा पाया परकीय वस्त्रांच्या होळीचाच होता.
गांधीजींनी भारतात पदार्पण करण्यापूर्वी स्वदेशी ही सर्वात यशस्वी चळवळ होती. अरविंद घोष, रवींद्रनाथ ठाकूर, वीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लाला लजपत राय हे स्वदेशी चळवळीचे मुख्य उद्गाते होते. नंतर ही स्वदेशी चळवळ महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू ठरली. त्यांनी स्वदेशीला स्वराज्याचा आत्मा असे संबोधले होते.
काँग्रेसच्या जन्मापूर्वीही ‘स्वदेशी’ ही कल्पना दिली गेली होती. १९०५ मध्ये जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा स्वदेशीची घोषणा जोरदारपणे स्वीकारली गेली. त्याच वर्षी काँग्रेसनेही स्वदेशीच्या बाजूने मतदान केले. स्थानिक स्वदेशी भांडवलदार त्यावेळी गिरण्या उघडत होते, त्यामुळे स्वदेशी चळवळ त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरली. परदेशी वस्तूंच्या बहिष्कार चळवळीलाही वेग आला.
‘वंदे मातरम्’ हा या काळाचा महान मंत्र झाला. १४ आणि १५ एप्रिल १९०६ रोजी स्वदेशी चळवळीचा गड असलेल्या वारीसाळ येथे बांग्लादेशी प्रादेशिक परिषद घेण्याचे ठरले. यावेळी वारीसाळमध्ये बराच दुष्काळ पडला असला तरी जनतेने त्यांचे नेते अश्विनीकुमार दत्त आदींनी तन, मन, धनाने या परिषदेसाठी पाठिंबा दर्शविला. त्या दिवसांत सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम् हा नारा लावणे बेकायदेशीर होते आणि अनेक तरुणांना त्यासाठी शिक्षाही मिळाली. जिल्हा प्रशासनाने स्वागत समितीवर अशी अट घातली की प्रतिनिधींचे स्वागत करताना वंदे मातरम हा नारा दिला जाणार नाही. स्वागत समितीने ते मान्य केले. पण ज्वलंत पक्षाने ते स्वीकारले नाही. यावेळी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना अटक झाली व २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. परंतु स्वदेशी चळवळ थांबली नाही तर याचेच पुढे स्वातंत्र्य चळवळीत रूपांतर झाले असल्याचे आपणास दिसून येते.
राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी वस्तूचा बहिष्कार, असहकार आंदोलन या चतु:सूत्रीच्या आधारे १९०५ ते १९२० नंतरही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशी विचार केंद्रस्थानी होता असे आपल्या लक्षात येईल.
गांधी युगातील स्वदेशी आंदोलन
त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा होता तो महात्मा गांधींच्या ‘खादी’चा. चरखा आणि खादी ही प्रतीके वापरून गांधीजींनी भारतीयांच्या मनात स्वदेशीचे बीज रुजविण्याचा प्रयत्न नव्याने केला. ‘चरखा चला चला के, लेंगे स्वराज लेंगे’ हे गीतही त्यावेळी बरेच गाजलेले होते. टिळकांनी सुचविलेल्या परदेशी मालावरील बहिष्कारामुळे किंवा गांधीजींच्या चरखा, खादी आणि स्वतःचे वस्त्र स्वतः विणण्याच्या संकल्पनेतून भारताला स्वातंत्र्य मिळेल, ही कल्पना निश्चितच वेगडळपणाची म्हणता आली असती. पण याच संकल्पनेतून समाजमन निश्चितपणे प्रभावित झाले. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ही ऊर्मी निर्माण करणे व ती कायम ठेवण्याची किमया स्वदेशीच्या मंत्रातूनच घडत राहिली. यातूनच पुढे मिठाचा सत्याग्रह, असहकार आंदोलन यांसारख्या राष्ट्रव्यापी स्वातंत्र्य चळवळी उभ्या राहिल्या.
अशाप्रकारे १८५० ते १९५० या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ काळात भारतीय स्वातंत्र्य व स्वदेशी चळवळ ही दोन्ही आंदोलने भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० ला भारतीय गणराज्य अस्तित्वात आले. स्वातंत्र्य मिळाले, स्वराज्य प्राप्त झाले असले तरी ७२ वर्षांनंतरही आम्हाला स्वदेशीचा नारा बुलंद करावा लागेल. कारण आपला देश महासत्ता होण्यासाठी प्रथम आत्मनिर्भर बनवावा लागेल.
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वनैः ।
विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ।।
या संस्कृत श्लोकातून आत्मनिर्भरतेचं महत्त्व लक्षात येते. आजच्या व्यावहारिक जगात अशी आत्मनिर्भरता शक्य नाही. परंतु
सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।
एतद्विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः ।।
दुसऱ्यावर अवलंबून सर्व कार्य दुःखदायक असतात पण आपल्यावर अवलंबून असलेली सर्व कार्य सुखदायक असतात हा मुख्य संदेश प्रस्तुत लेखातून घ्यावा एवढीच अपेक्षा आहे.
( एम. ए. राज्यशास्त्र, १८ वर्षापासून पत्रकारिता, सध्या स्वतंत्र पत्रकारिता करत आहेत. सा. विवेक, दै. तरुण भारत – मुंबई, सोलापूर, नागपूर, जळगांव, दै. देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती, गांवकरी मध्ये विपुल लेखन केले. बाइट्स ऑफ इंडिया पुणे या वेब पोर्टलच्या माध्यमातून लेखन, ब्लॉगलेखन नियमित सुरू असते. सामाजिक क्षेत्रात अभाविप, वनवासी कल्याण आश्रमात २० वर्ष विविध पदांवर कार्यरत.)
Leave a Reply