एखाद्या व्यक्तीला कधी कळतं की ती काहीतरी विशेष आहे, तिचे कार्य, तिच्या जन्माचे प्रयोजन इतरांपेक्षा वेगळे आहे?…बऱ्याचदा आयुष्यभर कळत नाही, पण आजपासून २९३ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या राणी वेलु नाचियार ला हे बहुदा जन्मापासूनच माहिती असावे.
वेलु नाचियार हिचा जन्म ३ जानेवारी १७३० सालचा. रामनाथपुरम (तमिळनाडू) इथल्या राजा चेलामुथु विजयरघुनाथ आणि राणी स्कंधीमुथल ह्यांची एककुलती एक कन्या. तिचे लहानपण कधी बाहुलीच्या अवतिभवती बागडलेच नाही तर लहानपणा पासूनच तिला युद्ध निती, घोडेस्वारी, तलवारबाजी, वलरी (मार्शल आर्ट), सिलंबम (काठी युद्ध) चे विधिवत शिक्षण दिले गेले. त्यांना विविध भाषा अवगत होत्या जसे की फ्रँच, इंग्लिश, उर्दू इत्यादी. ती रामनाथपुरम चा राजकुमार होती, तशीच ती वाढली, राहिली आणि आपल्या लेकीलाही तिने तसेच वाढवले.
आपल्या विवाह पश्चात ती शिवगंगा च्या राजा मुथुवदुंगनाथपेरिया ची राणी झाली. तिला एक मुलगी झाली. इंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले. इंग्रजी सरकार विरुद्ध पहिला स्वातंत्र्य संग्राम लढणारी ही वीरांगना बऱ्याच बाबतीत पहिली ठरली, तिने पहिला मानवी बॉम्ब बनवला. इंग्रजांच्या दारुगोळा कुठे असतो ह्याचा ठावठिकाणा कळताच तिचे आपल्या अत्यंत विश्वस्त सेविका कुयिली हिला त्याला नष्ट करण्यासाठी पाठविले. कुयिलीने स्वतःवर तेल ओतून घेतले आणि दारूगोळ्याच्या ठिकाणी जाऊन स्वतःला जाळून घेतले व संपूर्ण दारुगोळा नष्ट केला.
राणी वेलु नाचियार ने आपल्या दत्तक पुत्रीच्या नावाने पाहिली सशस्त्र महिला तुकडी तयार केली उदईयाल. आपलं राज्य परत मिळवून १० वर्ष राज्य कारभार सांभाळला. शासनकर्ते कसे असावे ह्याचे उदाहरण जणू तिने सगळ्यांपुढे ठेवले. वेळप्रसंगी मागे-पुढे न बघता, येईल त्या परिस्थितीला तोंड देत तिने आपले राज्य परत मिळवले, आणि ते सुशासन पुढे १० वर्ष सांभाळले. पुढे आपल्या मुलीला राज्य कारभार सोपवून २५ डिसेंम्बर १७९६ मध्ये तिने आपले इहलोकीची यात्रा संपवली. तमिळनाडू मधील लोकांची विरमंगाई म्हणजे धाडसी महिला संपूर्ण भारतासाठी वंदनीय आहे. भारतमातेच्या ह्या वीरांगनेला माझा नमस्कार.
— सोनाली तेलंग.
संदर्भ: wikipedia.com, Rohini Ramakrishnan (10 August 2010) Women who made a difference. The Hindu. Sivganga.nic.in
०५/०६/२०२२.
Leave a Reply