स्वातंत्र्य ही प्रत्येक जीवाला प्रिय गोष्ट आहे. माणूस इतर प्राण्यांपेक्षा एवढ्याच साठी वेगळा आहे कारण त्याला बुद्धी आहे, जी विचार करायला शिकवते, चांगलं-वाईट ठरवायला शिकवते, आपलं कर्तव्य आपल्याला उलगडून सांगते. तसं पाहायला गेलं तर त्या स्वतः जन्मतः ब्रिटिश नागरिक होत्या पण त्यांनी काम भारतमातेच्या मुक्ततेसाठी केलं. भारतमातेच्या वीरांगना नेली सेनगुप्ता.
१२ जानेवारी १८८४ साली त्यांचा जन्म काब्रिज इंग्लंड येथे श्री फेड्रिक आणि ईडिथ हेन्रीएट्ट ग्रे ह्यांच्या कडे झाला. कॉलेज वयात बंगाली भारतीय यतींद्रा मोहन सेनगुप्ता ह्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपल्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी लग्न केलं. एक ब्रिटिश मुलगी आपल्या सासरी भारतात आली आणि इकडचीच होऊन गेली.
यतींद्र ह्यांचे भारतात परतल्यावर उज्वल असे कार्यक्षेत्र होते. ते पेश्याने वकील होते तर राजकीय दृष्ट्या महापौर म्हणून काम बघत होते. भारतीय मूळ नसूनही भारतीय संस्कृती पुरेपूर जगणाऱ्या नेली आपल्या पती बरोबर स्वातंत्र्य संग्रामात काम करू लागल्या. यतींद्रजींना गांधीजींचा बंगाल मधील उजवा हात मानले जात. १९२१ सालच्या असहकार आंदोलनामध्ये दोघे सेनगुप्ता दांपत्याने जीव ओतून काम केले. पुढे आसाम-बंगाल रेल्वे धरणाच्या दरम्यान श्री सेनगुप्ता ह्यांना अटक करण्यात आली. नेली आता लोकांमध्ये जाऊन असहकार आंदोलन बद्दल जागृती करू लागल्या, शहरातील शासनकर्त्यांविरुद्ध मोर्चे काढू लागल्या. त्या दारोदारी जाऊन खादी विकत असत, त्या निमित्ताने लोकांशी संपर्क वाढवू लागल्या. परिणामी त्यांच्याच देशवासियांनी अर्थात ब्रिटिश सरकारने त्यांना कारागृहात बंद केले. पण त्यांचे विचार आणि काम बंद करू शकले नाही. दरम्यान च्या काळात श्री सेनगुप्तांचा मृत्यू झाला. नेली ह्यांनी भारतातच राहायचे ठरवले.
१९३३ सालच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अधक्ष्या होत्या. ब्रिटिश त्यावेळी एकही अधिवेशन पूर्णत्वास जाऊ नये असे बघत असे, जे अध्यक्ष नियुक्त होतील त्यांना अटक करणे, जी जागा निश्चित होईल तिथे निर्बंध लावणे, त्यातच श्रीमती नेली ह्यांच्याकडे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षता आली कारण पूर्व नियोजित अध्यक्ष श्री मदन मोहन मालवीय ह्यांना अटक करण्यात आली. श्रीमती नेलीं च्या अध्यक्षीय भाषणा नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. ह्या अटक सत्राला त्या घाबरल्या नाहीत तर प्रत्येकवेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले सामाजिक जीवन तसेच चालू ठेवले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्यांनी श्री सेनगुप्ता ह्याचा पिढीजात घरी चिटगांग येथे राहण्याचा निर्णय घेतला. पूर्व बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्यक होते. त्या अल्पसंख्यकांच्या साठी काम करत राहिल्या.
त्या एक आदर्श पत्नी होत्या, दोन मुलांच्या आई होत्या, उत्तम नेतृत्वगुण त्यांच्यात होते, श्री सेनगुप्ता ह्यांच्या खऱ्या अर्थाने अर्धांगिनी होत्या, त्यांच्या व्यवहारावर खुश होऊन त्यांच्या सासऱ्यांनी श्रीमती नेलींच्या आईंना पत्र लिहून, नेली त्यांच्या परिवाराचा हिस्सा आहेत म्हणून आनंद व्यक्त केला.
१९७३ साली एका अपघातात त्यांचे खुब्याचे हाड मोडले, पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी मदतीने भारतात आणले गेले, पण त्या आजारपणातच त्यांची जीवनज्योत मालवली. त्याच वर्षी त्यांना भारत सरकार कडून पद्म विभूषण ने सन्मानित करण्यात आले. आपली कर्मभूमी पारतंत्र्यात असतांना तिच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करून जगणाऱ्या ह्या तेजस्वी शलाकेच्या ऋणात आम्ही भारतीय आजन्म राहू हीच आमची त्यांना मानवंदना.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
२९/०७/२०२२.
संदर्भ:
http://xn--e4b.bharatdiscovery.org/
२.amritmahotsav.nic.in
http://xn--g4b.thebetterindia.com/
http://xn--h4b.inuth.com/
५.Wikipedia.org
Leave a Reply