कैथरीन मेरी हेइलमैन अर्थात आपल्या भारतमातेच्या सरला बेन. तो काळच असा होता, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता, त्याचबरोबर सामाजिक स्तिथी, पर्यावरण, शिक्षण अशा अनेक पातळ्यांवर एकाच वेळी काम सुरू होते. प्रत्येक ठिकाणी कामाची रचना लावली जात होती, कामे पुढे वाढत होती, एकातून दुसऱ्या कामाची निर्मिती होत होती तर काही काम अगदी सहज घडून जात होती. अशाचवेळी भारतात आल्या कैथरीन मेरी हेइलमैन.
१९०१ साली लंडन येथे हेइलमैन परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिलांचे मूळ जर्मन स्विस होते तर आई ब्रिटिश. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्याच्या वडिलांना पहिल्या महायुद्धाच्या वेळी बंदी बनवले गेले तर कैथरीन ह्यांना शिष्यवृत्ती नाकारली गेली, त्यांनी शाळा लवकर सोडली. काही दिवस आपल्या परिवरापासून दूर राहून त्यांनी मदतनीसाची नौकरी केली. पुढे महाविद्यालयात शिक्षण घेतांना, त्यांचा परिचय काही भारतीय विद्यार्थ्यांशी झाला. त्यांना भारतातल्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी कळले, गांधीजींच्या विचारांनी त्या प्रेरित झाल्या आणि इंग्लड ला कधीही वापस येणार नाही या निर्णयाबरोबर त्यांनी भारतात यायचा निर्णय घेतला.
१९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता.
१९४४ साली त्यांनी कुमाऔ जिल्ह्यात महिलांसाठी ‘लक्ष्मी आश्रमाची’ स्थापना केली. सुरवातीला फक्त ३ विध्यार्थीनी बरोबर सुरू झालेला हा आश्रम पुढे विकसित होत गेला आणि ह्या आश्रमामुळे अनेक समाज सुधारक आपल्या समाजाला लाभले.
त्यांनी मोठे काम केले ते पर्यावरण वाचविण्यात. चिपको चळवळ, भूदान चळवळ ह्या सगळ्यात त्या पूर्णवेळ काम करीत राहिल्या. १९७० साली जयप्रकाश नारायण, प्रभावती देवी ह्यांच्या बरोबर चम्बल च्या घाटातील डाकूंच्या पूर्नवसनासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली.
त्या एक चांगल्या लेखिका सुद्धा होत्या. त्यांनी जवळपास २२ पुस्तकं लिहिलीत. त्यात पर्यावरण, महिला सक्षमीकरण, जंगल वाचविणे हे सगळे विषय प्रामुख्याने होते.
१९८२ साली वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर लक्ष्मी आश्रमात हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना जमनालाल बजाज सन्मानाने सन्मानित करण्यात आले. उत्तराखंडात त्यांना हिमालयाची पुत्री आणि सामाजिक कार्याची जननी म्हणून संबोधित केले जाते. अश्या ह्या तेजस्वी शलकेचे चिंतन ह्या स्वातंत्र्य ७५ च्या निमित्ताने आम्ही सगळे भारतीय नतमस्तक होऊन करतो.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
३०/०७/२०२२
संदर्भ:
http://xn--e4b.shaktialmora.com/
http://xn--f4b.inuth.com/
Wikipedia.org
Leave a Reply