सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तिव्र इच्छाशक्तीची. सातत्याने प्रयत्न, अॅकेडेमिक पातळीवर अभ्यास आणि रियाझ केला तर आपली कला किंवा आवड कायमस्वरुपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि नवनिर्मिती हा नृत्यकलेचा आत्मा आहे. नटराज हे या नृत्यशैलीचे दैवत मानले जाते.
भरतनाट्यम ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे. या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. भरतनाट्यम ही नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या प्राचीन ग्रंथावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. अलरिपु, वर्णम, पदम, तिल्लाणा ही भरतनाट्यमची विविध अंगे आहेत.
भाव – राग – ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल आणि नाट्यम म्हणजे अभिनय करुन सादर केलेले नृत्य. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते. या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर या नावानेही ओळखले जाई.
भरतनाट्यम चे विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला आरंगेत्रम असे नाव आहे. आरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.
चिदंबरम येथील प्राचीन मंदिरातील मूर्ती हे भरतनाट्यम या नृत्यप्रकाराचे मूळ प्रेरणास्त्रोत. या नृत्यप्रकाराचा प्रसार व विकास तमिळनाडू येथील देवदास्यांनी केला. पूर्वीच्या काळी हा नृत्यप्रकार देवदास्यांनी प्रसारित व विकसित केल्यामुळे त्याला मान दिला जात नसे. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला कृष्ण अय्यर आणि रुक्मिणी देवी यांच्या प्रयत्नाने या नृत्यप्रकाराला पुन्हा प्रस्थापित केले गेले.
नाट्य, नृत आणि नृत्य हे सुध्दा भरतनाट्यमचे तीन भाग आहेत.
नाट्य : नाट्याद्वारे कलाकार एखादी कथा सादर करतो.
नृत : यात तालाचा वापर केला जातो.
नृत्य : नाट्य व नृत याचे मिश्रण म्हणजे नृत्य.
— पूजा प्रधान
Leave a Reply