व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला डॉ. नागेश टेकाळे यांचा लेख
मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच. ताईशी बोलताना त्यांनी पारंपरिक बियाणांच्या जपलेल्या, संरक्षित करून संवर्धित केलेल्या पन्नासच्या वर पिकांच्या जाती प्रत्यक्ष पाहता आल्या. मी म्हटले, ‘या सर्वांना पाणी?’ बाईंनी त्यांच्या शेतात निर्माण केलेल्या आणि नंतर शाश्वत झालेला जलस्रोत दाखविला.
‘प्रत्येक जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्या अन्नपाण्याची सोय करत असतो, त्यांचे उद्गार त्या पारंपरिक बियाणांच्या समृद्धीकडे पाहून खात्री देत होते आणि माझ्या सारख्या कृषी वैज्ञानिकाच्या देशी पारंपरिक शेती भूगर्भातील जल स्रोत शाश्वत करते या विधानास पुन्हा एकदा पुष्टी मिळाली. त्यांचे घर सुद्धा साधे झोपडीवजाच म्हणावे असे. गाडगे, मडक्यात, टोपल्यात गायीच्या शेणाने व्यवस्थित लिंपून साठवलेले बियाणे. कुठे, काय, कधी, केव्हा पेरावयाचे याची सर्व गाथा त्यांना पाठ होती. आयुष्यात धूळपाटीला स्पर्शही न केलेली ही माय मला वंदनीय झाली ती याचमुळे. थोरले बाजीराव म्हणजे, अपयशाची चव एकदाही न चाखलेला इतिहासामधील एकमेव राजा. त्यांच्या आवडत्या घोड्याचा आहार होता घेवड्याचा वेल तोसुद्धा शेंगांसह. पेशवाईच्या इतिहासात ‘बाजीराव घेवडा’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही वनस्पती पेशवाई बरोबरच इतिहासजमा झाली. राहीबाईंनी तिला शोधून काढले. तिला जगवले, वाढवले आणि पुन्हा प्रवाहात आणले. कुणाचीही कसलीही मदत न घेता किणकिण वाजणाऱ्या बांगड्यांच्या आवाजाने त्या बियाणातील निद्रिस्त अंकुराला जाग आली. आज हा ‘श्रावण घेवडा’ कळसुबाई परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसतो. राहीबाईंना भारतीय कृषी संस्कृतीचे जतन केल्याबद्दल २०२० सालचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला आहे. त्या म्हणतात, ‘हा पुरस्कार माझा थोडाच आहे, हा आहे माझ्या या पाच-पन्नास लेकरांचा.’ शेताकडे हात दाखवत त्यांनी म्हटलेले हे उद्गार आज त्यांच्या सारख्याच हजारो स्त्री पुरुष, ज्यांनी एवढ्या अवघड परिस्थितीत रासायनिक खतांचा धुरळा, संकरित बियाणे, कीटकनाशकांचा उग्र वास आणि झाडांना लटकलेले आत्महत्याचे मजबूत दोर आणि त्यांच्या यातना पाहत पारंपरिक शेतीचे जतन, संवर्धन आणि संरक्षण केले यांच्यासाठी होते. ‘माझे लहानपण सेंद्रिय शेतीच्या सुवासातच गेले.
माझी आई सतत माजघरात लहान मोठ्या मातीच्या भांड्यात शेतातील विविध बियाणे साठवत असे. अनेक शेतकरी ते तिला आणून देत आणि पुन्हा खरीप, रब्बीला घेऊन जात. याच खोलीत छताला अडकवलेली विविध प्रकारची कणसे, लोंब्या पाहून मला अनेक वेळा भीती वाटत असे, पण आमच्या घरातील ती खरी कृषी संस्कृतीची ठेव आहे हे मला समजल्यावर ती भीती कायमची पळून गेली आणि नंतर ती माझ्या अभ्यासाची जागाच झाली. दररोज गाईच्या शेणाने सारवलेले ते माझं घर म्हणजे माझे खरे देवघर होते. गौरी पूजनाला आई देवीसमोर धान्यांच्या सोळा राशी मांडत असे ते याच बियाणांच्या आणि अनेक शेतकरी तो प्रसाद म्हणून त्यांच्या शेतात त्याची पेरणी करत. ‘
१९६०-७० दशकात देशात हरितक्रांती आली, त्यावेळी ती गरज होती मात्र नंतर गरजेचे रूपांतर हव्यासात झाले आणि पुढील तीस-चाळीस वर्षात पारंपरिक शेती संपूर्णपणे लयाला गेली. परिस्थिती अशी निर्माण झाली की, पूर्वीचे ते वैभव परत आपल्या देशाला मिळणार का? आणि यातूनच निर्माण झाला तो आत्मनिर्भर भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश. रासायनिक शेती, विदेशी बियाणे, संकरित बीज उत्पादन, भूगर्भातील पाण्याचा उपसा आणि राष्ट्राचे बहुमोल परकीय चलन, रासायनिक खतांच्या आयातीवर खर्च होत असलेले विदारक चित्र मनाला वेदना देत होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, धवलक्रांतीच्या नावाने दुभत्या जनावरांची पिळवणूक हे भारतीय शेतीचे क्लेशदायक रूप अधिक स्पष्ट दिसत असताना, आता कुठे तरी हरवलेल्या कृषी संस्कृतीला पुन्हा जगविण्याचे, उभे करण्याचे आशेचे किरण दिसू लागले आहेत.
शेती ही नेहमी पशुपालनास जोडली गेली पाहिजे. मात्र आम्ही ती ट्रॅक्टरला जोडून टाकली. बांधावर भरपूर वृक्ष असावेत, त्यांच्यावर विविध पक्ष्यांचा किलबिलाट असावा असे असताना आम्ही आधुनिकीकरणाची अशी कास पकडली की, तेथे एकही वृक्ष आणि पक्षी असता कामा नये. विदेशीची नक्कल करत असताना आम्ही आमच्या स्वदेशीला पूर्णपणे विसरून गेलो, वास्तविक स्वदेशी हा आपला खरा धर्म संस्कार असावयास हवा, तो आपला जीवनप्रवाह हवा, जे माझ्या भूमीचे, ते माझ्या देशाचे. या भूमीवर येथील पिकांचा, गोधनाचा, पक्ष्यांचा आणि बारा बलुतेदारांचाच खरा अधिकार आहे, आणि हे समजून याचे अवलंबन केले तर आत्मनिर्भर भारत तुमच्या जवळ तुम्हाला खेटून उभा आहे असे चित्र दिसेल. मग त्याला हाक देण्याची गरज ती काय? आपल्या देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जवळपास ८० टक्के आहे. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे सर्वात प्रथम हा वर्ग उद्ध्वस्त होतो. म्हणूनच भारतीय कृषी संस्कृतीला पुन्हा जिवंत करावयाचे असेल तर या वर्गाला केंद्रस्थानी ठेवून स्वदेशीचा जागर करावयास हवा. पारंपरिक पिकांचा कल पाणी पिण्यापेक्षा ते धरून ठेवण्याकडे जास्त असतो आणि याचाच फायदा भूजल पातळी वाढवण्यासाठी होतो.
हजारो कोटी रुपयांचे अनुदान वाटप करून शेतकऱ्यांना परावलंबी आणि लाचार करण्यापेक्षा कृषी संस्कृतीची पायाभरणी करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकर क्षेत्राला १०० टक्के अनुदान देऊन पुढील पाच वर्ष प्रतिवर्षी २० टक्के परतावा घेत त्याला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थाने या क्षेत्रात स्वदेशीचा जागर म्हणता येईल. सिक्किम, अरुणाचल, मणिपूर, मेघालय या उत्तरेकडील राज्यांनी या पद्धतीने पारंपरिक पिकांची सेंद्रिय शेती करून आज भारतीय कृषी संस्कृतीची तेथे खऱ्या अर्थाने जोपासना केली आहे. भूतान या भारताच्या शेजारी राष्ट्रांनी या कल्पनेचा एक दशकापूर्वी स्वीकार करून चिनी रासायनिक खतांच्या धुराला हद्दपार केले. या देशाची निसर्गाला जोडून असलेली कृषी संस्कृती पाहण्यासाठी लाखो परदेशी पर्यटन येथे भेट देतात. पर्यटनामधील काही आर्थिक हिस्सा या शेतकऱ्यांना शासनातर्फे पुरस्काराच्या रूपाने नियमित दिलाही जातो.
भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरा आहे म्हणूनच आज अस्तगत होण्याच्या वाटेवरून वेगाने प्रवास करणाऱ्यांना या पारंपरिक वाणांना परतीची हाक देण्यासाठी राहीबाई पोपेरे यांच्या आवाजात लाखो आवाज मिसळणे गरजेचे आहे यासाठीच शेतीकडे पाहण्याची आपली मानसिक पातळी बदलणे ही काळाची गरज आहे. बदल झाला तरच हाकेचा आवाज सुस्पष्ट होतो अन्यथा प्रतिध्वनीच मोठे वाटू लागतात.
(लेखक वनस्पती क्षेत्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक असून मूलभूत विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात ४० वर्षेपासून कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अदिवासी क्षेत्र आणि बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू, कारणे आणि उपाय यावर १९९६ पासून देश विदेशामध्ये संशोधनाच्या माध्यमातून योगदान. कृषी संस्कृतीचे अभ्यासक)
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply