व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला वैद्य प्रज्ञा आपटीकर यांचा लेख
कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीच्या साथीच्या निमित्ताने ‘व्याधिक्षमत्व’ हा विषय ऐरणीवर आला. जो-तो रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काय काय करता येईल? यासाठी इंटरनेटवर माहिती शोधू लागला. जवळच्या डॉक्टरांनाही सल्ले विचारू लागला. या निमित्ताने, भारतीय स्त्रियांच्या रोगप्रतिकारक क्षमतेबद्दल काही लिहावे असे ठरविले. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.
‘व्याधिक्षमत्व’ म्हणजे रोगाविरुद्ध लढण्याची शरीराची असणारी शक्ती म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती. ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. ही रोगप्रतिकारशक्ती अचानक निर्माण होत नाही व अचानक नष्टही होत नाही. एखादे औषध घेऊन उपयोग नाही. तर अनेक वर्षांच्या आहार, विहार व योग्य औषधांच्या उपयोगाने ही निर्माण होते. यामध्ये या तिन्हीचे सातत्य असणे क्रमप्राप्त आहे.
‘सहज’ म्हणजे जन्मजात मिळालेली, ‘कालज’ म्हणजे ऋतुप्रमाणे मिळणारी ( उदा. उन्हाळ्यात कमी तर थंडीत जास्त ) (तरुणवयात जास्त तर बाल/ वृद्धावस्थेत कमी) व ‘युक्तिकृत्त’ म्हणजे सातत्याने योग्य आहार, विहार व औषधांच्या सेवनाने प्राप्त झालेली व टिकवलेली, वाढविलेली रोगप्रतिकारक्षमता. यातील युक्तिकृत्त व्याधिक्षमत्वाविषयी आपण जाणून घेणार आहोत. सहज व कालज व्याधिक्षमत्वामध्ये आपल्याला फारसे बदल करता येत नाहीत. परंतु युक्तिकृत व्याधिक्षमत्व वाढविण्याच्या उपायांनी थोडेफार बदल घडविता येतात.
भारतीय स्त्रिया या इतर देशांतील स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत का? तर रचनात्मक दृष्टिकोनातून थोड्याफार प्रमाणात फरक आढळतात. परंतु क्रियात्मक दृष्टिकोनातून आनुवंशिक दृष्टिकोनातून खूपच फरक आढळतो. हजारो वर्षे हिंदू संस्कृतीमध्ये आचरणात येणाऱ्या विविध रूढी, परंपरा, खाण्याचे नियम इत्यादि अनेक गोष्टी भारतीय स्त्रियांमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत आहेत. विविध मसाल्यांचा वापर, विकसित पाकशास्त्र ही भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. विविध ऋतू व सणांनुसार आहारात होत जाणारे बदल, हे सर्वांच्याच व्याधिक्षमत्वाचे मूळ आहे. तरीसुद्धा भारतीय स्त्रियांमध्ये आरोग्याची कोणती वैशिष्ट्यपूर्ण रहस्ये आहेत, हे जाणून घेऊयात.
ऐतिहासिक दाखल्यांमध्ये, बऱ्याचदा पूर्वीचे राजे राजयक्ष्मा/ क्षयरोग होऊन मृत्यू पावलेले आढळतात; परंतु स्त्रियांबद्दल असे उल्लेख आढळत नाहीत. बऱ्याचदा स्त्रियांच्या मृत्यूचे उल्लेख हे प्रसवकालीन आपत्कालप्रसंगी झालेले दिसतात. यावरून असे लक्षात येते की, भारतीय स्त्रियांमध्ये संसर्गजन्य रोगापेक्षा प्रसवकालीन अथवा सूतिका अपचाराने मृत्यूचे प्रमाण अधिक असावे. तसेच सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाची आकडेवारी (stastics) लक्षात घेतल्यास पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कोरोनाने मृत्यू होण्याचे अथवा उपद्रव (complications) होण्याचे प्रमाण कमी आहे. हा फरक का बरे असावा?
स्त्री व पुरुष यांमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक जो आहे तो आहे प्रजननसंस्थेचा. स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशय हे अवयव अधिक आहेत. ‘स्त्री’ या शब्दाची निरुक्ती आहे. ‘स्यायते प्रसवते अस्याम् इति स्त्री’ म्हणजेच जी प्रसवते तिला स्त्री म्हणावे. म्हणजेच निसर्गाने स्त्रीची शारीररचना व शारीरक्रिया ‘प्रजोत्पादन’ या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी तयार केलेली आहे. सृजनशक्ती अबाधित राहिली तर स्त्रियांची रोगप्रतिकारक्षमताही चांगली रहाते. ज्या स्त्रियांची मासिक पाळी नियमित व कष्टविरहित असते. त्यांचे आरोग्य बहुधा उत्तम असते. स्त्रियांचे आरोग्य प्राधान्याने मासिक पाळीच्या चक्राशी संबंधित असते. दर महिन्याला होणाऱ्या योनिगत रक्तस्रावातून अनेक दोष शरीरातून बाहेर पडत असल्याने स्त्रीचे आरोग्य अबाधित रहाण्यासाठी मदत मिळते. परंतु ह्याच मासिक चक्रामध्ये विकृति आल्यास आरोग्याला बाधा निर्माण होते. हे मासिक चक्र स्त्रीच्या अंतःस्रावी ग्रंथींच्या (Endocrine glands) आरोग्यावर अवलंबून असते. अंत: स्रावी ग्रंथींचे कार्य व आरोग्य योग्य आहार, विहार, मानसिक स्वास्थ्य, नियमित झोप व व्यायाम इत्यादि अनेक घटकांवर अवलंबून असते. बऱ्याचदा पुरुषांच्या मानाने स्त्रियांना अंतःस्रावी ग्रंथीच्या विकृती जास्त आढळतात. (उदाहरणार्थ मधुमेह, थॉयरॉईड इत्यादि) अशा Autoimmune व्याधींचे प्रमाण स्त्रियांमधे जास्त दिसते. संसर्गजन्य रोगप्रतिकारक्षमता त्यामानाने स्त्रियांमध्ये नैसर्गिकत: जास्त दिसते. त्यामुळे Autoimmune रोगांबद्दलचे व्याधिक्षमत्व स्त्रियांमध्ये वाढविणे गरजेचे आहे.
रज:काल, गर्भिणीकाल, प्रसवकाल व सूतिकाकाल अशा स्त्रीविशिष्ट अवस्थांमधे स्त्रियांनी योग्य ती काळजी न घेतल्यास बऱ्याचदा स्त्रियांना स्थानिक व सार्वदेहिक विकार उत्पन्न होताना दिसतात. उदाहरणार्थ पाळीच्या आजारांमध्ये अनियमित मासिक पाळी (PCOD इत्यादि) मध्ये स्थौल्य, मधुमेह अशा व्याधी निर्माण होताना दिसतात; तर पाळीच्या वेळेस अतिरिक्त गाठीयुक्त योनिगत रक्तस्राव झाल्यास पांडुता (Anemia) दिसतो. तसेच योग्य पोषणमूल्ये असणारा आहार नसल्यानेही स्थौल्य, पांडुता असे आजार भारतीय स्त्रियांमध्ये दिसतात.
स्थानिक आजार:
- स्तनांचे विकार, स्तनांमध्ये गाठी, स्तनांचा कर्करोग इत्यादि.
- योनीचे विकार, गर्भाशयात गाठी (fibroids) गर्भाशयमुखाचा कर्करोग (cervical cancer) इत्यादि.
सार्वदेहिक व्याधी:
पांडुता (रक्ताची कमतरता)
थॉयराईड समस्या
स्थौल्य
मधुमेह
अस्थिक्षय (osteoporosis)
संधिवात
कर्करोग इत्यादि.
स्त्रियांची स्थानिक व सार्वदेहिक अशी दोन्ही प्रकारे रोगप्रतिकारक्षमता वाढविणे गरजेचे आहे. स्त्रिया या नैसर्गिकत: ‘सुकुमार’ प्रवृत्तीच्या असतात. त्याचे ‘मन ही ‘हळवे’ अशा स्वरूपाचे असते. त्यामुळे त्यांच्या मनाचे सामर्थ्य वाढविणे हा सर्वात पहिला उपाय असला पाहिजे.
विषादो रोगवर्धनानाम् ।
चरकसंहिता आयुर्वेदानुसार, वि स्वत:बद्दल नकारात्मक विचार असलेल्या व्यक्तींचे व्याधिक्षमत्व कमी असते व सतत त्या रोगांना बळी पडतात. स्त्रिया सामाजिक, कौटुंबिक संघर्षाला लवकर बळी पडतात. काही अपवाद वगळता, सुशिक्षित असल्या तरीही अनेक स्त्रिया असे संर्घष योग्यरीतीने हाताळू शकत नाहीत, व त्यांच्यामध्ये अनेक Autoimmune व्याधी निर्माण होतात. त्यामुळे स्त्रियांचे मानसिक सामर्थ्य वाढविणे गरजेचे आहे; त्यासाठी प्राणायाम, योगाभ्यास, ध्यानसाधना इत्यादि उपचाराबद्दल तज्ज्ञांची मदत घ्यावी.
स्त्रियांना मिळालेल्या सृजनशक्तीच्या वरदानामुळे, स्त्रियांना लहानपणापासूनच रजोनिवृत्तिकालापर्यंतच्या प्रजोत्पादनाच्या काळात (Reproductive age group 12 to 50 years ) अनेक शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. या काळात अनेक ‘स्त्री विशिष्ट’ अवस्थांतून स्त्रियांना जावे लागते. या प्रत्येक अवस्थेमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात, त्यानुसार विशिष्ट आहार व विहारातही बदल करावे लागतात. त्या त्या अवस्थेतील आरोग्यावर तिच्या पुढील अवस्थेतील आरोग्य अवलंबून असते.
स्त्रीविशिष्ट अवस्था –
बाल्यावस्था
पौगंडावस्था
विवाहोत्तर काळ
गर्भावस्थेचा काळ
प्रसवकाळ
सूतिकाकाळ
रजोनिवृत्तीचा काळ
रजोनिवृत्तिपश्चातचा काळ
बाल्यावस्थेपासूनच जर योग्य आहार, निद्रा व व्यायाम असेल तर त्या मुलीला मासिक पाळीचे आजार निर्माण होत नाहीत व एकंदरीतच व्याधिक्षमत्व उत्तम असते. मासिक पाळी नियमित असेल तर सगर्भावस्थाही प्राय: उपद्रवरहित असते. सगर्भावस्था ही जर उपद्रवरहित असेल तर प्रसवकाळही बऱ्याचदा संकट – आपत्कालविरहीत असतो. अनेक प्रसव अथवा अनेक गर्भपात झाले असतील तर स्त्रीच्या शरीराची झीज ही मोठ्या प्रमाणात झालेली असते. त्यामुळे गर्भपात व प्रसवोत्तर काळात, प्रत्येक वेळी स्त्रीची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास रजोनिवृत्ती काळात अनेक विकार उत्पन्न होताना दिसतात. उदा. osteoporosis, cervical cancer इत्यादि.
अशाप्रकारे, स्त्रीविशिष्ट अवस्थेच्या आरोग्यावर, आयुष्यातील पुढील अवस्थेचे आरोग्य अवलंबून असते. म्हणूनच भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये ह्या प्रत्येक अवस्थेची परिचर्या अतिशय सविस्तरपणे वर्णन केलेली आहे. भारतीय स्त्रियांची स्थानिक व सार्वदेहिक रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी भारतीय स्त्रियांनी प्रत्येक स्त्रीविशिष्ट अवस्थेमधील परिचर्येचा अवलंब करावा. याची माहिती थोडक्यात बघूयात.
बाल्यावस्थेपासूनच योग्य आहाराचा अवलंब करावा. विशेषतः वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मुलीच्या प्रजोत्पादक अवयवांच्या वाढीला सुरूवात झालेली असते. सर्व अवयव पूर्ण अभिव्यक्त होण्यासाठी ५ ते ६ वर्षे लागतात. हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात अनियमित जेवणाच्या वेळा टाळाव्यात. जंक फुडस्, फास्ट फुडस् विशेषतः चीझ व चीझयुक्त पदार्थ पास्ता, पिझ्झा असे पदार्थ टाळावेत. या काळात मुलीची झोप व व्यायाम पुरेसा असावा. रात्रीचे जागरण, मोबाईल इत्यादी स्क्रीन टाळावेत. म्हणजे अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य सुरळीत चालू रहाते. व्यायामामध्ये मैदानी खेळांचा अंतर्भाव केल्यास उंची वाढण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.
पौगंडावस्था व मासिक पाळी सुरू होतानाचा काळ (Menarche) पाहिला तर साधारणतः दहाव्या वर्षानंतर मुलींची मासिक पाळी चालू होताना दिसते आहे. त्यावेळेसच शैक्षणिक अभ्यासक्रम वाढल्याने व सांप्रतच्या या स्पर्धात्मक युगात टिकून रहाण्यासाठी होणारा मानसिक ताण व बैठे आयुष्य यामुळे मुलींच्या शरीराची ठेवण बदलते. व्यायामाचा अभाव, अभ्यासाचा ताण, अपुरी किंवा अयोग्य रीतीने घेतलेली झोप (रात्री जागरण/ दिवसा झोपणे), सतत पिझ्झा, ब्रेड आदी मैद्याचे पदार्थ सेवन करणे यांमुळे अंत: स्रावी ग्रंथींचे कार्य बिघडते. त्यामुळे लहान वयापासूनच स्थौल्य, थॉयराईडच्या समस्या, मधुमेह, PCOD अशा अनेक autoimmune व्याधी निर्माण होतात. याचा उपद्रवात्मक परिणाम म्हणून व्याधिक्षमत्व कमी होताना दिसते. म्हणून या काळात वैद्यांच्या सल्ल्याने आहार, विहार व मानसिक तणावाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
पूर्वीच्या काळी ‘बाजूला बसणे’ हा व्यवहार प्रचलित होता. यामागे मुलींना/ स्त्रियांना शारीरिक व मानसिक ताणामधून विश्रांती मिळावी असा अपेक्षित हेतू होता. परंतु या रूढींचा अपप्रचार व दुर्व्यवहार झाल्याने ही प्रथा बाजूला पडली व आता मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अनेक शारीरिक व मानसिक ताणांना सामोरे जाण्याची वेळ आली. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या रक्तस्रावामुळे स्त्रीला शारीरिक व मानसिक थकवा असतो, व त्या काळात योनिभागाचे व्याधिक्षमत्व नैसर्गिकत:च कमी असते. त्यावेळी विविध प्रकारचे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. अशा वेळेस स्त्रियांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे/ योग्य जागा उपलब्ध न झाल्याने सॅनिटरी पॅड योग्य वेळेत न बदलणे/ शौचालय जवळ नसल्याने मलमूत्रवेगांचा अवरोध करणे इत्यादि कारणांनी स्त्रियांना योनीचे स्थानिक आजार निर्माण होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान स्तनांमध्येही बदल होत असतात. त्यामुळे योनी व स्तनांचे व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी स्त्रियांनी जवळच्या वैद्यांकडून मासिक पाळीच्या काळात आचरणात आणायचे नियम नक्की समजावून घ्यावेत. या काळात अतिआंबट, खारट, (chinese/ chat) शिळे पदार्थ, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. पचायला हलका आहार घ्यावा. दगदग व जागरणे टाळावीत.
विवाहानंतर स्त्रियांना शारीरिक संबंधाविषयीचे ज्ञान शास्त्रीय पद्धतीने समजावून द्यायला हवे. शारीरिक संबंधातून अनेक प्रकारचे जंतुसंसर्ग होत असतात. (sexually transmitted disease HIV, HPV etc) विशेषत: HPV – Human Papilloma Virus मुळे स्त्रियांना गर्भाशयमुखाचा कर्करोग (Ca Cervix) होताना दिसतो. त्यामुळे योनिमार्ग व गर्भाशयमुखाचे व्याधिक्षमत्व वाढविणे गरजेचे आहे.
गर्भधारणेचा काळ (गरोदर अवस्था) व सूतिकाकाळ ( बाळंतपण ) ह्या दोन्हीही काळात स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक ( रचनात्मक व क्रियात्मक ) तसेच मानसिक बदल होत असतात. नैसर्गिकतः पचनाची क्षमता कमी असते. शरीरातील चयापचय क्रियांमध्ये बदल झालेला असतो. स्तनांमध्ये व योनिमार्गातील स्रावांमध्येही बदल घडलेले असतात. यामुळे अशा अवस्थेत स्थानिक व सार्वदेहिक रोगप्रतिकारशक्ती कमी असते. यामुळे आयुर्वेदशास्त्र अशा अवस्थेत विशिष्ट आहार, विहार व औषधांची योजना सांगते. त्यामुळे जवळच्या वैद्यांकडून गर्भिणी व सूतिका परिचर्ये-चे नियम समजावून घ्यावेत. स्त्रियांची व बालकाची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. बालकाचे नैसर्गिक व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी मातेने जास्तीत जास्त काळ स्तनपान करवावे.
प्रसूती कशाप्रकारे होते? नॉर्मल की सिझेरियन? त्यावेळी रक्तदाब वाढला होता का? रक्तस्राव किती प्रमाणात झाला होता? स्तन्यपान किती काळ केले होते? इत्यादि अनेक घटनांवरून स्त्रियांची प्रसवोत्तर रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या घरगुती नियमांना झुगारून न देता जवळच्या वैद्यांकडून त्यांचे शास्त्रीयत्व समजावून घेऊन स्त्रियांनी या गोष्टींचे पालन करावे.
रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांच्या आयुष्यात खूप मोठे शारीरिक व मानसिक परिवर्तन घेऊन येतो. जवळ-जवळ ४० वर्षे सतत येणाऱ्या ऋतुचक्रांमुळे स्त्रियांना जे व्याधिक्षमत्वाचे नैसर्गिक कवच मिळालेले असते, ते हळूहळू समाप्त होते. या ४० वर्षांमध्ये स्त्रियांनी त्यांच्या शरीराची योग्य ती काळजी घेतली असेल तर रजोनिवृत्तिपश्चातचे आयुष्यही आरोग्यपूर्ण जाऊ शकते.
अन्यथा वारंवार प्रसव होणे, वारंवार गर्भस्राव/ गर्भपात करणे, वारंवार मासिक पाळी पुढे/ मागे करण्याच्या गोळ्या घेणे. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेणे (Emergency Contraceptive Pills-I-Pills etc), स्त्रीविशिष्ट अवस्थांमध्ये आहार विहाराच्या नियमांचे पालन न करणे इत्यादि अनेक कारणांमुळे स्त्रियांचे व्याधिक्षमत्व कमी होते.
त्यामुळे स्त्रियांनी, त्यांना मिळालेल्या सृजनशक्तीचा आदर बाळगून जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने आहार, विहार व औषधांचा वापर करून सृजनशक्तीचे संरक्षण केल्यास व्याधिक्षमत्व नक्कीच वृद्धिंगत होईल.
शुभं भवतु ।
वैद्य. प्रज्ञा नितीन आपटीकर
आर्य क्लिनिक,
नौपाडा, ठाणे (प)
०२२२५३४७५२२, ९८२०४९२९०२
pradnyaaptikar@gmail.com
(व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply