नवीन लेखन...

भाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा

२० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत आली. ( एक स्पष्टीकरण : सई परांजपे यांची चर्चात्मक मुलाखात मी प्रत्यक्ष पाहिलेली-ऐकलेली नाहीं. त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातमीचाच संदर्भ मी येथें देऊं शकतो).

सई परांजपे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्याचें मत व इतरांनी मांडलेलें मत मूलत: योग्यच आहे. त्यावर वाद नाहीं. तसेंच, २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या कांहीं दशकांच्या काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर व माधव ज्यूलियन यांचें भाषाशुद्धीविषयक कार्य मोठेंच आहे. सावरकरांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याबद्दल परमादर व्यक्त करावासा वाटतो. सुयोग्य प्रतिशब्द निर्माण करून त्यांनी भाषाशुद्धीच्या क्षेत्रात दिलेलें योगदान अतुलनीय आहे. तेंच भाषाशुद्धीचें कार्य त्याआधीच, म्हणजे १९व्या शतकाच्या मध्यावर हिंदीत हिंदीत भारतेन्दु हरिश्चंद्र व बंगालीत राजा राममोहन राय यांनी व त्यांच्या समकालीनांनी केलेले आहे. पण भाषाशुद्धीचे मुकुटमणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातच ‘राज्यव्यवहारकोशा’चें निर्माण करविलें होतें.

हें सर्व म्हटल्यानंतर, आणि त्याचें महत्वही मान्य करून, प्रथमत: मला ही गोष्ट मांडावीशी वाटतें की भाषा ही शुद्ध तर हवीच, पण शुद्धतेचा अत्याग्रह धरला तर, १९व्या शतकानंतर हिंदी-उर्दूचें काय झालें तें ध्यानांत ठेवणें गरजेचे आहे. आधी ‘खडी-बोली-हिदी’ व रेख़्ता ( उर्दू) या दोन्ही एकच (भाषा) होत्या. पण शुद्धतेच्या अत्याग्रहामुळे त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या, आणि(भारताततरी) उर्दूचें क्षेत्र सीमित झाले.

नंतर मला असा महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की, भाषा ही प्रवाही असते, आणि अन्य भाषांशी संपर्क आल्यावर आपसात देवाणघेवाण होणें अपरिहार्यच आहे. भाषेत बदल घडलेच नाहींत, तर तिची स्थिती सांचलेल्या डबक्यासारखी होते, व हळूंहळूं तिचा ह्रास होऊं लगतो, हें सत्य आपल्याला स्वीकारावेंच लागेल. हें भाषाशास्त्रज्ञ सांगतात.

अरबीतून व खासकरून फारसीमधून मराठीत आयात झालेल्या शब्दांची एक लहान यादी मासावकर यांनी दिली आहे. त्याव्यतिरिक्त , विविध क्षेत्रांमधले शब्द, मी मुद्दा स्पष्ट करण्यांपुरते देतो – खुर्द, बुद्रुक, रिकीब, खरीप, रबी, अवजार, अवलाद, वारस, समई, पायजमा, मशागत, मेजवानी, मुलाखत, मजकूर, दप्तर, बस्ता (लग्नाच्या संदर्भात हा खास वापरला जाणारा शब्द आहे ), रुखवत, जंजीरा, नाखवा, फडणवीस, चिटणीस, पागनीस , पोतनीस, डबीर , पेशवा, किल्ला, जिल्हा, इब्लिस, बर्फ, इत्यादी. फारसीवर आधारित , व व्यवसायावरून पडलेली , लोकांची आडनांवें आपण बदलणार काय ? ( मग आपल्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘फडणवीस’ या आडनांवाचें काय ? )

मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईचें फार महत्व आहे, त्या काळाला आपण मग काय म्हणणार ? तसेंच, आपण नेहमी ‘लोकशाही’, ‘घराणेशाही’ असे शब्द वापरतो (खास करून राजकारणात). हिंदी-हिदुस्तानी-उर्दूवर फारसीचा फार प्रभाव असला तरी, हिंदीत ‘लोकशाही’ यासारखा शब्द वापरला जात नाहीं , तर ‘लोकतंत्र’ हा शब्द रूढ झालेला आहे, आणि तो ‘लोकशाही’पेक्षा अधिक योग्य आहे. मराठीत ही ‘शाही’ आली कुठून ? तर, आधी बहामनी राज्य व नंतर त्याचे तुकडे पडलेल्या ५ ‘शाह्यां’मधून. या शिया राजवटी होत्या, आणि त्यांच्यावर इराणी प्रभाव होता, त्यामुळे तेथें ‘शाही’ शब्दाचा उपयोग सर्रास होत असे., शिवाजी महाराजांवर वाचतांना आपली सारखीच आदिलशाही, कुतुबशाही अशा शब्दांची भेट होत असते.

‘व’ हें अव्यय मूळ अरबी आहे, हें कितीतरी लोकांना माहीतच नसतें. तें फारसीद्वारें आलेलें नसून, दोनएक हजार वर्षांपूर्वी समुद्री मार्गानें येणार्‍या अरब व्यापार्‍यांकडून आलें आहे, हें देवीसिंह चौहान यांनी दाखवून दिलेलें आहे.
आपली सकाळ रोज चहानें सुरूं होते. चहा ही हें पीक व पेय जसें चीनमधून इंग्रजांनी आणलें, तसेंच त्यांच्याबरोबरच ‘चहा’ हें नांवही आले ( मूळ : ‘चा’). तसेंच ‘उदबत्ती / अगरबत्ती’चें. असे इतर शब्द पूर्वेकडूनही आपण घेतलेले आहेत. ते परकीय शब्द आपल्याला कसे चालले ? त्याचें ‘संकर’ वाटलें नहीं का ?

महाराष्ट्रातील कालगणना ‘शालिवाहन शका’नें होते. त्यातील ‘शक’ हा शब्द परकीयच की ! गौतम बुद्धाला ‘शाक्यमुनी’ म्हटलें जातें, आणि शाक्य हा शब्द ‘शक’पासूनच आलेला आहे. ( पण भगवान बुद्ध यांना कोणीही बाहेरचे, अभारतीय मानलें नाहीं ; जुन्या काळींही नाहीं, व आजही नाहीं. जगातल्या कुठल्याही देशात त्यांना भारतीयच मानलें जातें) .एवढेंच काय, ‘हिंदू’ हा शब्दही खरें तर भारतीय नाहीं ; ‘सिंधु’ शब्दाचे अवेस्ताकालीन इराणमध्ये (त्यांच्या भाषिक नियमांनुसार) झालें ‘हिंदु’, आणि तो शब्द तिकडून तत्कालीन इराणी लोकांनी व ग्रीकांनी भारतात आणला. मग आतां, संकर हटवण्यांसाठी ‘हिंदूं’ना ‘सिंधू’ म्हणायचें कां? त्यानें तर भलताच घोळ होईल ! म्हणजेच, काय अंतर्गत आणि काय बाहेरील, या बाबीबद्दल गंभीर विचार करूनच बोलावें लागतें.

प्रतिशब्दांचें म्हणाल तर, ‘जादू’ यासारख्या शब्दासाठी ‘माया’ (आठवावा सिनेमा – ‘मायाबाजार’) तसेंच ‘गारुड’ यांसारखें शब्द अस्तित्वात होते व आजही आहेत. प्राचीन काळीं ‘यातु’ हा शब्द प्रचलित होता, तो आतां फारसा वापरला जात नाहीं. पण ‘जादू’ हा शब्द रूढ झाला, व आज तो अधिक चालतो. ‘बाग’ यासाठी उपवन, वाटिका, असे जुने शब्द आहेत की, पण ‘बाग’ हा शब्द रूढ झाला.

मराठी व इतर बर्‍याच आधुनिक भारतीय भाषा या संस्कृतोद्भव आहेत. या भाषांमध्ये संस्कृतच्या आधारें तत्सम व तद्भव शब्द बहुसंख्य आहेत. ते ‘बाहेरून’ (अन्य भाषेमधून) आले म्हणून त्यांना संकर म्हणायचें कां ? आणि, त्यांना ‘संकर’ न म्हणतां,भाषेचें मूळ रूपच म्हणायचें जर असेल, तर मग या भाषांमधील देश्य अथवा देशज शब्दांना संकर म्हणायचें कां ? याचें उत्तर सोपें नाहीं.

बरें, संस्कृत तरी संकरविहीन आहे कां ? ज्योतिषातील ‘होरा’ हा शब्द ग्रीक ‘होरोस्’ या शब्दावरून आलेला आहे असें म्हणतात. (अर्थात् , ज्योतिषी तें मान्य करीत नाहींत, ही गोष्ट अलाहिदा. ते म्हणतात की अहोरात्र या शब्दामधून होरा शब्द आलेला आहे). अगदी वैदिक-संस्कृत, जिला ‘देववाणी’ व ‘छांदस’ म्हणत, तिनेंही द्रविड व मुंडा भाषांमधून शब्द घेतलेले आहेत, जसें की ‘लांगल’ मुंडा भाषेतून. आणि, आतां ते शब्द , किंवा त्यांचे अपभ्रंश जे मराठीत वा अन्य आधुनिक भाषांमध्ये आले, जसें की, ‘लांगल’ पासून ‘नांगर’, त्यांना तत्सम / तद्भव म्हणायचें की संकर ? म्हणजे, ही एक भानगडच झाली !

इंग्रजीशी संबंध आल्यामुळे मराठीनें अनेक शब्द तिच्यातून घेतले आहेत. ( तिथेंच तर सध्याचा हा सारा वाद आहे. फारसीचे शब्द मराठीत कांहीं शतकांपूर्वीच रुळले, त्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष कोणी हरकत घेत नाहीं ). पण, ज्या गोष्टी आधी अस्तित्वातच नव्हत्या, तिथें इंग्रजी शब्दांचा वापर होणारच. उदा. रेल्वे, स्टेशन, सिग्नल, इस्पितळ (हॉस्पिटल), डॉक्टर, वगैरे. स्वातंत्र्यवीर सावरकर भाषाप्रभू होते, म्हणून त्यांनी अनेक प्रतिशब्द निर्माण केले व ते रूढही झाले. मात्र, अनेक शब्दांना आजही पर्यायी शब्द उपलब्ध नाहींत. कांहीं प्रतिशब्द तयार केले गेलेले असले तरी, त्यांत प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) झालेलें नाहीं. कित्येकदा असें होतें की कुणी तसा एखादा निर्मित प्रतिशब्द वापरला, तर मूळ इंग्रजी शब्द कंसात दिला जातो, म्हणजे अर्थाचा गोंधळ होऊं नये. कांहीं उदाहरणें – समाजविज्ञानातील ‘मोरे’ ( स्पेलिंग – more’ ) याला प्रमाणित मराठी प्रतिशब्द नाहीं , आणि असलाच, तर त्या विषयाच्या शब्दकोशाबाहेर वा त्या विषयातील ज्ञानी (एक्सपर्ट) मंडळींव्यतिरिक्त कितीशा लोकांना तो माहीत असतो ? तसेच, ‘मिथक’ हा शब्द घ्या. हा शब्द ‘Myth’ या शब्दापासून बनवला गेलेला आहे. त्यासाठी क्वचित् ‘मिथ्यकथा’ हा शब्दही वापरला जातो. तर मग ‘मिथ्यकथा’ हा शब्दच कां बरें ‘प्रमानित’ म्हणून रूढ झाला नाहीं ? याचें कारण कदाचित असें असावें की, ‘मिथ्या’ या शब्दाला संस्कृतमध्ये व तत्सम शब्द वापरणार्‍या आधुनिक भाषांमध्ये एक विशिष्ट अर्थ आहे, व तो, ‘फोल’, ‘खोटें’, ‘अशाश्वत’ असा प्रकारचा अर्थ आहे. (आठवावें आदिशंकराचार्यांचें वचन – ‘ब्रह्म सत्य जगत् मिथ्या’). आज मेडिकल विज्ञान, स्पेऽस टेकनॉलॉजी, इनफर्मेशन टेकनॉलॉजी, वगैरे ज्ञानाची अशी अनेकानेक क्षेत्रें आहेत जिथें दररोज नवनवीन शब्द निर्माण होत आहेत. त्यांचे प्रतिशब्द निर्माण करायचें म्हटलें तरी, तसे ते निर्माण करायला व ते रोजच्या व्यवहारात रूढ व्हायला बराच वेळ लागेल, अनेक दशकें लागतील. तत्पूर्वी , इंग्रजी शब्दच वापरले जाणार हें उघड आहे. जसें की, ‘संगणक-आज्ञावली’ हा प्रतिशब्द तयार झालेला असला तरी ‘सॉफ्टवेअर’ हा शब्दच रूढ झालेला आहे. हा सॉफ्टवेअर शब्द तरी कसा आला, तर कंप्यूटर(संगणक) मधील जे इलेक्ट्रॉनिक पार्टस् असतात, त्यांना ‘हार्डवेअर’ म्हटलें जातें, आणि त्या अनुषंगानें या आज्ञावलीला ‘सॉफ्टवेअर’ म्हटलें जातें. मग आतां ‘हार्डवेअर’ ला काय प्रतिशब्द ? अन्, तोही बनवला तर मग, या हार्डवेअरमधील ‘प्रिंटेड सर्किट बोर्ड (तेंही मल्टी-लेयर), ट्रांझिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट, अशा कितीतरी शब्दांचे काय करायचें ? तसेंच, आय.टी. क्षेत्रातील ‘यू.एस्.बी. पोर्ट’, इंटरनेट, वेबसाईट, ब्लॉग, वगैरे शब्दांचें काय करायचें ? कॅन्सरला ‘कर्करोग’ हा शब्द रूढ आहे. पण मग, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, सी टी स्कॅन, पी टी स्कॅन, केमोथेरापी, हिस्टोपॅथॉलॉजी वगैरेंचे काय ? आणखी कांहीं पहा – ‘ऑटिझम’साठी ‘स्वमग्न’ किंवा ‘आत्ममग्न’ असा शब्द वापरला जातो. पण घोळ असा आहे की, साधारण (नॉर्मल) लोकसुद्धा आत्ममग्न असूं शकतात, असतात. त्यामुळें, स्वमग्न किंवा आत्ममग्न म्हटलें की ऑटिझमचा उल्लेख होतो आहे की नॉर्मल माणसाच्या आत्ममग्नतेबद्दल बोललें जात आहे, हें स्पष्ट होण्यासाठी संदर्भावरच अवलंबून रहावें लागतें. [ऑटिझम हा शब्द ज्या लॅटिन शब्दावरून निर्माण केला गेला आहे, त्याचा अर्थ स्वमग्नतेशी संबंधित असला तरी, ऑटिझम या शब्दाला एक विशिष्ट अर्थ (connotation) प्राप्त झालेला आहे, हें ध्यानात घेणें आवश्यक आहे ] . हँडिकॅप्ड’ यासाठी ‘दिव्यांग’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला गेलेला आहे व तो रूढही होतो आहे, पण मग, ‘मेंटली चॅलेंज्ड’, ‘डिफरंटली एबल्ड’, ‘डिस्लेक्सिया’, ‘डिस्कॅल्क्युलिया’ यांचें काय ?

ही यादी बरीच लांबेल, पण वरील उदाहरणें पुरेशी आहेत.

आपण मराठीत होणार्‍या इंग्रजीच्या संकराबद्दल बोलतो. पण इंग्रजीनेंही अनेक शब्द बाहेरून घेतले आहेत. सुरुवातीच्या कालात , म्हणजे हजारएक वर्षांपूर्वी, तिनें स्कँडिनेव्हियन भाषांमधून शब्द घेतलेले आहेत. मध्ययुगात तर दोनएकशे वर्षें इंग्लंडमधील राजभाषा व उच्चभ्रूंची भाषा फ्रेंच होती. त्याचा परिणाम म्हणून इंग्रजीत अनेक फ्रेंच शब्द स्थिरावलेले आहेत. खानपान (खाणेपिणें) , मेजवानी वगैरेंच्या क्षेत्रातील ‘वरच्या’ दर्जाचे (साहित्यिक पातळी नव्हे, तर तत्कालीन सामाजिक वरची पातळी) शब्द फ्रेंच आहेत, व ते आजही तसेच वापरले जातात. इंग्रजीनें अन्य भाषांकडून पण शब्द घेतलेले आहेत. मध्ययुगात क्रूसेडस् मुळे इंग्लिश लोकांचा मध्यपूर्व-आशियाशी संबंध आला व तिकडून इंग्रजीनें शब्द घेतले. अरब ‘मूरस्’नी स्पेनादि भागात राज्य केलें , त्यामुळे युरोपीय भाषांमध्ये, आणि त्यांच्याद्वारें इंग्रजीत त्यांचे शब्द शिरले, स्थिरावले. कॉलनियल काळातही इंग्रजीनें बाहेरील शब्द घेतले. अमेरिकन नेटिव्ह ‘इंडियन्स’ (रेड इंडियन्स) कडून पण अमेरिकन-इंग्लिशनें शब्द घेतले, जसें की ‘मेसा’. अमेरिकेतील अनेक नद्यांची नांवें मूळ ‘नेटिव्ह इंडियन्स’नी दिलेलीच रूढ झाली. त्यांना ‘परकीय’ म्हणायचें कां ? ‘जंगल’, ‘खाकी’, असे शब्द, ‘पक्का साहिब’ यासारखे वाक्प्रचारही भारतामधून इंग्रजीत सामावले. ( खाकी – मूळ शब्द फारसी ‘खाक’ ). वेस्ट इंडीज् , साउथ आफ्रिका वगैरे भूभागांमधूनही इंग्रजीनें शब्द घेतलेले आहेत. ( त्या त्या भूभागांमध्ये तर लोक तेथील ‘लोकल इंग्रजी’त तेथील आणखीही बरेच शब्द वापरत असतातच). एवढेंच नव्हे, तर , (राजकारणादि तशी अन्य कांहींच कारणें नसतांनाही ) , केवळ, इंग्रजीत योग्य-तो चपखल (apt) प्रतिशब्द उपलब्ध नाहीं, म्हणून, त्या भाषेनें ‘देजा व्हू’ सारखे वाक्प्रचारही परभाषेतून आपलेसे केले . अगदी हल्ली हल्ली इंग्रजीनें ‘prepone’ सारख्या, भारतात तयार झालेल्या शब्दाला सामावून घेतलें ( मी शिकत असतांना हा शब्द तर भारतातही प्रचारात नव्हता . तो गेल्या कांहीं दशकांमध्ये भारतात निर्माण झालेला आहे).

या समावेशक वृत्तीमुळे काय झालें, तर इंग्रजी भाषा समृद्धच झाली. आजही ऑक्सफर्ड डिक्शनरीची संपादक मंडळी दरवर्षीं, इंग्रजीत सामावल्या जाणार्‍या नवनवीन शब्दांची यादी प्रमाणित (स्टँडर्डाइझ) करत असतात. ( ‘प्रीपोन’ शब्द त्यांनी अशा प्रकारेंच स्वीकारला आहे) . आतां बोला !

*****

मला असें वाटतें की, सई परांजपे काय किंवा हे अन्य दोन सद्गृहस्थ काय, त्यांची हरकत बहुतेककरून, अशा वरील प्रकारच्या ( मी जी उदाहरणें दिली आहेत, त्या व तशा तर्‍हेच्या ) शब्दांच्या वापराबद्दल नसावी. सई परांजपे यांनी नाटकांना (नाहक) दिल्या जाणार्‍या इंग्रजी नांवांबद्दल (शीर्षकांबद्दल) उल्लेख केला आहे, श्रीनिवास जोशी हे, मम्मी, डॅडी वगैरे शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप घेतात, तर मासावकरांचें म्हणणें आहे की आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतांना अन्य भाषेतील शब्द कां वापरावेत ? [ इथें मला एक गोष्ट मासावकारांच्या वाक्याला (स्टेटमेंटला) जोडावीशी वाटते, अन् ती ही की आपल्या भाषेत शब्द नुसते उपलब्ध असून चालत नाहीं, तर ते वापरात रूढही असावे लागतात. मासावकरांना कदाचित हेंच अभिप्रेत असावें ] .

या सर्व चर्चेनंतर , आणि शब्दसंकर भाषेला समृद्ध करतो समृद्ध करतो , ही गोष्ट मांडल्यानंतर शुद्धीच्या आणखी एका मुद्द्याकडे वळणें अपरिहार्य आहे. अंतत: हेंही कबूल करावें लागेल की मराठी भाषा अशुद्ध होत चालली आहे. त्याबद्दल माझा स्वत:चा संदर्भ मम्मी-डॅडी अशा शब्दांच्या वापराबद्दल नाहीं , कारण तसा वापर हा संकर आहे, मूलत: अशुद्धी नाहीं. पण, शब्दांचें लिंग चुकीचें वापरणें ( उदा. ‘व्यक्ती’ शब्द पुल्लिंगी वापरणें, ‘ऑफिस’ हा स्त्रीलिंगी, वगैरे ), अर्थबदल होत असला तरीही र्‍हस्व-दीर्घाची काळजी न घेणें ( खरें तर, पर्वा न करणें) , वाक्यरचनेतील गफलती, अशा मूलभूत बाबींमुळे भाषेत जी अशुद्धी व , कांहीं वेळा गडबडही, निर्माण होते, त्याबद्दल मला स्वत:ला जास्त काळजी वाटते. किरकोळ चुकांकडे कदाचित दुर्लक्ष करतां येईलही; महत्वाचें म्हणजे, आपल्या चुकांना ‘चुका’च न मानणें , ‘काय फरक पडतो ?’ असा प्रतिप्रश्न करणें , अशा तर्‍हेचा दृष्टिकोन (attitude) , आणि बेपर्वा ( callous) वृत्ती, ही अधिक-काळजीची कारणें आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपली शुद्धाशुद्ध भाषा संख्येच्या निकषावर योग्यायोग्य ठरविण्याचा ठाम आग्रह धरणें , ही. ( उदा. ‘तीन टक्के लोकांची भाषा’ असा उल्लेख ). बोलींमध्ये वैविध्य तर असणारच, पण ‘प्रमाणित’ भाषेसाठी, संख्याबळ हें शुद्धत्व ठरवण्यांचा निकष कसा असूं शकेल ? . एक वेगळ्या क्षेत्रातील उदाहरण द्यायचें तर, ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’ ही सरकारी संस्था, ‘प्रमाण’ (स्टँडर्ड) ठरवतांना, ‘किती लोकांना काय बरोबर वाटतें’ असा विचार करत नाहीं, तर, त्याचे निकष वैज्ञानिक, वेगळे असतात. तसेंच, ऑक्सफर्ड डिक्शनरीचें संपादक मंडळही ‘ब्रेक्झिट’सारख्या सार्वत्रिक मतदानातून आपले निर्णय घेत नाहीं. आज जनसाधारणांचा शुद्धाशुद्धतेचा विचार करण्यांकडे कल दिसत नाहीं ( की, आतां आपल्याला ‘प्रमाणित’– स्टँडर्ड — भाषाच नको आहे ?, अशी शंका यावी ) . एवढेंच नव्हे, तर प्रिंट-मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याही, अशुद्ध भाषेला हातभारच लावत आहेत!

अशा परिस्थितीत, एक नि:श्वास टाकून म्हणावें लागतें की, एक म्हणजे, सई परांजपे म्हणतात त्याप्रमाणें, आपण अशा अशुद्ध भाषा वापरणार्‍या गोष्टींवर , जसें की नाटक, टीव्ही सीरीयल वगैरेंवर, आपल्यापुरता बहिष्कार टाकायचा , त्यातील वैफल्य जाणूनही असा बहिष्कार टाकून मनाला स्वत:पुरतें समाधान मिळवायचा प्रयत्न करायचा ; किंवा, दुसरें म्हणजे, आपलें कथन हें अरण्यरुदन आहे हें जाणूनही सुधारणा करण्यांचा विफल प्रयत्न करायचा ; एवढेच विकल्प आपल्या हातात उरतात.

— सुभाष स. नाईक.
भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६ , ९०२९०५५६०३.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..