वरण भाताच्या मुदिवर तुपाची धार,
पिळायचं लिंबू मग येते बहार.
तोंडी लावायला बटाट्याची गोल कचरी,
यापुढे पक्वांनांची काय सांगा मातब्बरी?.
दहिबुत्ती म्हणजे सांगतो तोंडाला पाणी,
भातावर दही, वर जिऱ्या तुपाची फोडणी.
ताकातली मिरची तळून कुस्करायची वर,
पोह्याचा पापड असेल तर नुसता कहर.
नारळी भाताचा स्वाद, दरवळ संपूर्ण घरात,
पावलं वळतात अलवार स्वयंपाकघरात.
आंबेमोहोर तांदूळ, त्यात नारळ,गूळ तूप,
पोट डोळे होतात जड, डुलकी आणतात खूप.
वाफाळलेला भात सोबत तळलेली सुरमई,
उडदामेथी बांगड्यांची, भूक असह्य होई.
सोलकढीची भैरवी शेवटच्या भाताला व्हावी,
मघई पानाची पुडी, अलगद मुखी शिरावी.
केळीचं पान, त्यावर भाताची रास,
भाताच्या राशीला लागते सांबाराची आस.
लालचुटुक सांबार, न्हाऊ घालतं भाताला,
युती होते दोघांची, तडस लागते पोटाला.
अशी ही भाताची करणी, सांगितली मी तुम्हाला,
त्याच्याविना पूर्णत्व नाही, येत कधी जेवणाला.
डाएट बिएट सोडा सारं, मारा आडवा हात,
देईल साथ जिंदगीके बाद भी पिंडाच्या रुपात
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply