दहा अकरा वर्षाची एक मुलगी आपल्या भावंडांबरोबर सुटीच्या दिवशी घराच्या मागे भातुकलीचा खेळ मांडायची. बाहुला-बाहुलीचं लुटूपुटीचं लग्न लावलं जायचं. त्या मुलीनं बाहुला-बाहुलीला रंगीत कपड्यांनी इतकं छान नटवलेलं असायचं की, लहानच काय मोठी मंडळीही त्यांना बघतच रहायची. ती मुलगी होती, आपल्या भारत देशाला वेशभूषेतलं पहिलं ‘ऑस्कर ॲवाॅर्ड’ मिळवून देणारी भानू अथैया!!
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला, राज्याला जे पहिले बहुमान मिळवून दिलेत ते कोल्हापूरनेच! ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक…खाशाबा जाधव! मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार…वि. स. खांडेकर! देशातील पहिला कलात्मक चित्रपट ‘सावकारी पाश’ बाबूराव पेंटर! डाॅ. जयंत नारळीकर व डाॅ. वसंत गोवारीकर हे शास्त्रज्ञ, सर्व कलांना व विद्वानांना राजाश्रय देणारे राजर्षी शाहू महाराजही कोल्हापूरचेच!
२८ एप्रिल १९२९ रोजी शांताबाई व अण्णासाहेब राजोपाध्येंच्या कुटुंबात भानूचा जन्म झाला. अण्णासाहेबांच्या सात आपल्यातील तिसरी सुकन्या म्हणजे भानू! वडिलांची चित्रकलेची आवड भानूमध्ये वारशाने आली होती. आई-वडिलांनी तिच्या कलेला प्रोत्साहन देऊन तिला मुंबईला जे.जे. मध्ये पाठवलं. आपल्या हुशारीने सुवर्ण पदक मिळवूनच ती शिक्षण घेऊन बाहेर पडली.
सुरुवातीला तिनं ‘ईव्हज विकली’ मध्ये फॅशन सल्लागार म्हणून काम केले. नंतर स्वतःचं ब्युटीक सुरू केले.
१९५६ मध्ये गुरुदत्त यांनी भानूला ‘सीआयडी’ चित्रपटाच्या कामाची ‘पहिली संधी’ दिली. या पहिल्याच कामगिरीने चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी भानूला अनेक उत्तम चित्रपट दिले. पन्नास वर्षांत तिने शंभरहून अधिक चित्रपटांसाठी काम केले.
राज कपूर, देव आनंद, यश चोप्रा, आशुतोष गोवारीकर, रिचर्ड ॲटेनबरो, काॅनरेड रुक्स, इ. नामवंत दिग्दर्शकांबरोबर तिने काम केले.
१९९१ च्या ‘लेकीन’ व २००२ च्या ‘लगान’ साठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
‘गांधी’ चित्रपटासाठी तिने खूप परिश्रम घेतले. साऊथ आफ्रिकेमधील सुटाबुटातील बॅरीस्टर गांधींपासून फक्त धोतर व उपरण्यातील गांधी उभे करणे हे सोपे काम नव्हते. त्यासाठी तिने अनेक पुस्तकं वाचून काढली.
मिळालेलं ‘ऑस्कर’ ॲवाॅर्ड आपल्या माघारी व्यवस्थित सांभाळलं जावं, म्हणून तिनं ते ‘अमेरिकन ॲकडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस ॲण्ड सायन्स’ या संस्थेकडे दिलं. आपल्या देशातही अशा संस्थेची आवश्यकता आहे. कारण आपल्याकडे कोणी नामवंत व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या सन्मान चिन्हांना कोणीही वाली नसतो.
भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा तो सुवर्णकाळ होता. वहीदा रहमान, वैजयंतीमाला, साधना, आशा पारेख, मुमताज यांच्या साड्या व इतर कपड्यांच्या डिझाईनसाठी भानूने प्रचंड मेहनत घेतलेली जाणवते. ‘लव्ह इन टोकियो’ मधील आशा पारेख ही ‘सायोनारा’ गाण्यामध्ये जपानी बाहुलीच वाटते, त्याचे सर्व श्रेय भानूलाच जाते. ‘गाईड’ चित्रपट हा लक्षात राहतो, देव आनंद व वहीदाच्या वेशभूषेमुळेच! त्यातील प्रत्येक गाण्यांमधे वहीदाला जे ड्रेस डिझाईन केलेले आहे त्याला तोड नाही.
२००९ मध्ये तिला ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-१०-२०.
Leave a Reply