कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने घरी पत्नीच्या हातचे भोजन घेऊ नये. त्याने बहिणीच्या घरी जावे तिचा योग्य तो सत्कार करुन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहिण नसल्यास कोणत्याही बहिणीकडे किंवा कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे भोजन घ्यावे, ज्यांना भाऊ नसतो त्या स्त्रिया चंद्राला ओवाळतात.
यमद्वितीया हे एक व्रतसुद्धा आहे. या व्रतात यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांची पूजा केली जाते.
उत्तर प्रदेशात स्त्रिया या दिवशी दारावर कावेने भाऊ-भावजयींचे चित्र काढतात आणि त्यांची पूजा करतात. पूजा करणारी स्त्री मुसळ जमिनीवर आपटून म्हणते – जो कोणी माझ्या भावाचा द्वेष करेल त्याचे तोंड मुसळाने फोडेन.
भगिनी हा शब्द भग म्हणजे धन, यश, श्री यावरुन झाला आहे. भाऊ-बहिणींचे प्रेम हिंदू कुटुंबात प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. या प्रेमाचे प्रतीक असणारे दोन सण म्हणजे रक्षाबंधन, भाऊबीज होय.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply