चितळे कुटुंबीय मूळचे भिलवडी (जि. सांगली) येथील. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९२० रोजी झाला. भास्कर चितळे यांनी १९२० मध्ये सातारा जिल्ह्य़ातील लिंबगोवे या छोटय़ाश्या खेडय़ात दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सात भाऊ आणि पाच बहिणी अशा चितळे यांच्या कुटुंबातील भाऊसाहेब हे ज्येष्ठ असल्याने वडिलांच्यापश्चात तेच आधारस्तंभ झाले. वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांसोबत दुग्धव्यवसायात पदार्पण केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुंबई हे ब्रिटिश सैन्याच्या हालचालीचे केंद्र होते. इतर वस्तूंबरोबरच सैन्याला मोठय़ा प्रमाणावर दुधाची आवश्यकता भासेल हे ओळखून भास्कररावांनी मुंबईतील तांबे अँड सन्सबरोबर भागीदारी करार केला. तेथील व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी रघुनाथराव यांना मुंबईला पाठविले. युद्ध संपल्यावर ही भागीदारी संपली आणि सांगली-मुंबई अशा वारंवार चकरा मारणाऱ्या तेव्हाच्या तरुण रघुनाथराव यांनी व्यवसायासाठी पुण्याची निवड केली. दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली. यातील बंधू या शब्दाला महत्त्व आहे. गेली ६५ हून अधिक वर्षे चितळे बंधू हा व्यवसाय बघत आहेत. दुधाच्या घरगुती व्यवसायाचे मोठय़ा व्यवसायामध्ये रुपांतर करण्यामध्ये मा.रघुनाथरावांचे योगदान आहे. पुण्यामध्ये तीन लाख लिटर म्हशीच्या आणि एक लाख लिटर गाईच्या दुधाच्या पिशव्या विकल्या जातात. त्याचप्रमाणे पाच हजार लिटर सुटं दूध विकले जाते.
बाकरवडी हा पदार्थ खरतर विदर्भ आणि गुजरातमधील. विदर्भात ही तयार करुन लगेच खाण्यासाठी बनते तर गुजराथी बाकरवडी आठ दिवस टिकते. ज्यांच्या बाकरवडीनं जगभरातील खवय्यांना बोटं तोंडात घालायला लावली, त्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे संस्थापक भाऊसाहेब चितळे यांनी सुरत शहरात हा पदार्थ बघितला. १९७६ साली गुजराथी आच्याऱ्याने चितळे बंधुंकडे पहिली बाकरवडी तयार केली. त्यात मराठी माणसाच्या चवीला आवडेल असे बदल करुन सध्याची बाकरवडी बनली आणि बघता बघता ती हातोहात खपू लागली. ५० कामगार दिवसरात्र खपून ५०० किलो बाकरवडी हाताने बनवीत असत. हॉलंडमधील एका कंपनीने तयार केलेल्या मशीनवर सन १९९२ ते १९९६ या काळात अनेक प्रयोग करुन बाकर वडी यशस्वीपणे तयार झाली. तमाम पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या इतकेच नव्हे तर जगातील सर्व बाकरवडीच्या चाहत्यांना हा पदार्थ मिळावा यासाठी भाऊसाहेब आणि राजाभाऊ चितळे या दोघा बंधुंचे प्रयत्न कामी आले. सध्या पुणे व शिवापूर अशा दोन ठिकाणी प्रतिदिन ३.५ ते ४ टन बाकरवडीचे ऊत्पादन होते. महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर अशा विविध देशांमध्ये देखील बाकरवडी सहजपणे उपलब्ध होते. ज्या चवीचं वेड जगाच्या कानाकोपर्यात पसरलेल्या पुणेकरांनी टिकवलं, वाढवलं आणि प्रसिध्द केली ती ही चितळ्यांची बाकरवडी…अस्सल मेड इन पुणे! पूर्वी खास पुणेरी पद्धतीने “आमची अन्यत्र शाखा नाही” म्हणणारे चितळे बदलले. मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचे धोरण त्यांनी स्विकारले.
बाकरवडीबरोबरच पेढे, गुलाबजाम यांनाही मोठी मागणी असून, आज देशातच नव्हे तर परदेशातही त्यांचे पदार्थ चवीने खाल्ले जातात. समाजाला परत काहीतरी देणे, हा चितळे बंधूंचा गुणधर्मच होता. त्यामुळेच त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यातूनच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, जोशी हॉस्पिटल आपत्तीतही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. गुजरात येथील भूकंप तसेच त्सुनामीच्या संकटाच्या वेळीही त्यांनी मोठी मदत केली होती. रोटरी फाऊंडेशनची स्थापना करुनही अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. आपल्या व्यवसायात त्यांनी नेहमीच शिस्तबध्दता बाळगली. त्यामुळेच अनेक कंपन्यांशी स्पर्धा करुनही त्यांनी आपला पहिला नंबर कायम टिकवून ठेवला. सर्वात अधिक इनकम टॅक्स भरणारे म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आला होता. पदार्थांची गुणवत्ता आणि चव यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या दुकानाला टाइम्स ग्रुपतर्फे सलग तीन वेळ बेस्ट मिठाई शॉप ऍवॉर्ड मिळाला. उत्तम निर्मिती करुन भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी वेगळे पॅकेजिंग हवे आणि वेगळे वितरण हवे, हेही भाऊसाहेब चितळे यांनी जाणले. त्यासाठी त्यांनी चितळेची उत्पादने महाराष्ट्रभर मिळतील, अशी यंत्रणा उभी केली. रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे २० मार्च २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply