बसमधून प्रवास करताना रहदारीमुळे बस काही काळ रस्त्यावर थांबली असता मी सहज खिडकीतून बाहेर रस्त्याच्या कडेला पाहीलं तर एक दारू प्यायलेला बिगारी काम करणारा कामाठी आपल्या बायकोला बेदम मारहान करत होता. आणि ती निमुटपणे त्याचा प्रतिकार न करता त्याचा मार खात होती. मला तर वाटत होत बसमधून खाली उतरून त्याच्या कानाखाली दोन आवाज काढावेत.पण ते शक्य नव्हतं कारण मुळात मला कितीही वाटलं तरी कोणाच्या कानाखाली आवाज काढण्याचं धाडस माझ्याच्यानं कधीही होणार नव्हतं. कारण मी अशा माणसांच प्रतिनिधीत्व करत होतो जे जन्मालाच सशाचं काळीज घेऊन आलेले असतात. तस जर नसतं तर आमच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या गृहस्थाला मी प्रथम बदडवून काढायला हवं होतं. तो त्याच्या बायकोवर करीत आलेला अन्याय मी तर लहानपणापासून पहात आलो होतो. त्याच लग्न झालं तेव्हा मी असेन जेमतेम सात-आठ वर्षाचा आणि तो बावीस – तेवीस वर्षांचा ! नुकतीच वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या एका श्रीमंत घरातील जिने दुःख काय असत ? ते कधीच न पाहीलेल्या देखण्या, सुंदर, सोज्वळ आणि सर्वगुणसंपन्न तरूणीशी त्याचा थाटामाटात विवाह झाला. तेव्हा तो कोणत्यातरी रंग बनविण-या कंपनीत कामाला होता. स्वतःचं घर होत, डोक्यावर इतर कोणाचीही जबाबदारी नव्हती. त्यामुळे लग्नापूर्वीच त्याला दारू पिणं आणि जुगार खेळणं अशा वाईट सवयी लागल्या होत्या. किंवा तो अशा व्यसनांच्या अहारी गेला होता असही म्हणता येईल. त्यात त्याच्या घरात त्याला ओरडणारं वडीलधारी कोणीही नव्हतं त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. आई ज्या बंगल्यात घरकाम करायची तेथेच रहायची. त्याच्या मोठया बहीणीचं लग्न झालं होतं. त्याचा लहान भाऊ त्याच्या आत्याकडे गावी रहात होता. पुर्वीच्या काळीच नव्हे ! तर आजही काही प्रमाणात नवऱ्यामुलाची व्यसने लग्न ठरविताना सोयिस्करपणे लपविली जातात. तशी त्याचीही लपविली गेली होती. लग्नानंतर सुरूवातीला वर्शभर सार काही व्यवस्थित होत त्याच्या लग्नानंतर त्याच्या बायकोने बालवाडी शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून ती बालवाडी शिक्षिका म्हणून काम करू लागली. तिचा पगार आणि तिच्या घरच्यांकडून वरचेवर होणारी आर्थिक मदत यामुळे त्यांना पैशाची टंचाई कधीच भासत नव्हती. लग्नानंतर चार-पाच वर्षातच त्यांना दोन मुले झाली एक मुलगा एक मुलगी ! या दरम्यान त्याच दारूच आणि जुगाराच व्यासन पून्हा बळावलं होत तो त्याची चालू नोकरी सोडून घरी बसला. मित्रांबरोबर फुकटची दारू ढोसू लागला आणि ओळखीच्या माणसांकडून खोटे बोलून पैसे घेऊन तो ते जुगारात हारू लागला. नंतर – नंतर जेव्हा मित्रांनी दारू पाजायची बंद केली आणि नातेवाईकांनी पैसे द्यायचे तेव्हा तो बायकोला मारहान करून तिच्याकडून पैसे घेऊ लागला. लोक लज्जेखातर त्याची बायको हे सार सहन करत होती. बायकोच्या नात्यातील लोकांकडून तर त्याने तिचंच नाव सांगून पैसे घेतले. हे जेव्हा त्याच्या बायकोला कळलं तेव्हा तिनं स्वतःच्या अंगावरचे दागिने गहान ठेवून त्यांचे पैसे परत केले. त्यामुळे तर तो अधिकच शेफारला. लोकांकडून बायकोचे नाव सांगून व्याजाने पैसे घ्यायचे मनसोक्त दारू ढोसायची, उरलेले पैसे जुगारात हारायचे आणि रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आल्यावर बायकोला विनाकारण बदडवून काढायचे आणि तिनं सारं ब्र न काढता सहन करायचं ! हे ही कमी म्हणून की काय तो शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आई-बहीणी काढायचा. त्याला आम्ही ही अपवाद नव्हतो हे वेगळ सांगायला नव्हतो. त्यामुळे हळू-हळू त्यांच्याबरोबरचे शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तोडले. त्यामुळे तर तो अधिकच बिथरला. एक दोनदा तर त्यानं चक्क दिवाळावर डोक आपटून आणि धार-धार पात्यानं आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण सुदैवाने तो त्याच्यातून बचावला. या सगळया वातावरणात त्याची मुले मोठी होत होती. त्याच्यामुळे त्याच्या मुलाचं जीवनही निरस आणि बेचव झालं होतं. त्याची दोन्ही मुले अर्थात मुलगा आणि मुलगी दाघेही अभ्यासात कमालीचे हुशार होते पण तरीही ते फारसे कोणात मिसळत नव्हते. त्याच्या बायकोला आपलं घर चालवायला बालवाडी शिक्षिकेचा पगार कमी पडू लागला म्हणून तिने शिक्षिकेच काम सोडून घरकाम करायला सुरवात केली. त्यातही ती आनंदी होती. त्याच्या बायकोकडे पाहून निदान मी तरी म्हणायचो, ‘‘मला जर अशी बायको भेटली तर मी तिचे पाय धुवून पाणी पिईन ! अशा दारूडया नव-याला सोडून आपल्या मुलांना घेऊन तू कायमची माहेरी निघून ये ! असा आग्रह तिच्या माहेरच्या माणसांनी तिच्याकडे केला असता तिने स्पष्ट नकार दिला. इतकं सारं सहन करूनही आत्महत्या करण्याचा विचारही तिच्या मनाला कधीही शिवला नाही. पण तिलाच बदडवून तिचीच कमाई खाणा-याच्या मनात मात्र हा विचार अनेकदा आला होता. स्त्रिच्या सोशिकपणाच्या आणि सहनशिलतेच्या मर्यादा कोणीही ठरवू शकत नाही हे त्यामुळेच मी मान्य करतो. दारूडया नवऱ्याला सोडून आपल्या दोन्ही मुलांचं व्यवस्थित पालन-पोषण करत ती नक्कीच सुख समाधानानं जगू शकली असती. कितीही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तरीही आपला संसार मोडू द्यायचा नाही यावर ती ठाम राहिली. तिचा नवरा कोणत्या मातीचा बनला होता ? या प्रश्नाच उत्तर मला अजूनही सापडलं नाही. त्या माणसाचं हृदय पाषाणाचही नसावं कारण कधीतरी पाषाणालाही पाझर फुटतोच की ! आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्याबरोबरचे संबंध पराकोटीचे बिघडल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला दुसरीकडे म्हणजे मुंबईच्या बाहेर राहायला घेऊन गेली. तिला वाटत होतं थोडया वेगळया वातावरणात गेल्यावर तो सुधारेल पण तसं काहीच झालं नाही. तिथे गेल्यावरही पुन्हा एकदा त्याने दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याच्या सुदैवाने तो बचावला. मला तर वाटतं त्याची बायको खरी पतिव्रता आहे. तिच्या पतिव्रत्यामुळेच ईश्वर त्याचं रक्षण करीत असावा.त्याची पत्नी त्याच्यामुळे होणारा त्रास इतकी वर्षे सहन करत आली पण नुकत्याच पदवीधर झालेल्या तिच्या वीस-एकवीस वर्षाच्या मुलीला मात्र हे सार असह्य झालं. कारण सार काही समजत उमजत असतानाही ती काहीच करू शकत नव्हती, म्हणून इसेल कदाचित ! एक दिवस तिच्याही सहनशिलतेचा बांध फुटला आणि तिनंही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाला सर्वस्वी तो जबाबदार नव्हता पण जी परीस्थिती जबाबदार होती ती निर्माण करायला सर्वस्वी तोच जबाबदार होता. तिच्या व्याक्तीगत आणि तिच्या आईच्या पुण्याईनेच ती बचावली. आता तरी तो सुधारेल अशी आशा मला वाटत होती पण त्याच्या वागण्यात यत्किंचीतही सुधारणा झाली नाही. तेव्हा त्याच्या हृदयाची तुलना कशाशी करावी तेच मला कळत नाही. एकाच वेळी असंख्य माणसांच्या दुःखाला तो कारणीभूत ठरतोय पण ! स्वतः मात्र एखाद्या राजासारखं जीवन जगतोय. कदाचित ! हे त्याच्या गेल्या जन्माचे पुण्य असेल पण ! ते पुण्य जेव्हा संपेल तेव्हा त्याच्या वाटयाला जी परीस्थिती येईल तिचा विचार कदाचित त्याने स्वप्नातही केला नसेल. माझ्या आयुष्यात मी असंख्य माणसे पाहिली. पण ! ह्या गृहस्थासारखा भावनाशून्य माणूस मी कधीही पाहिला नाही. जेव्हा पाहीन तेव्हा कदाचित त्याच्याबद्दल माझ्या हृदयात असणारा तिरस्कार थोडा कमी होईल.
लेखक – निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए , गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
मो. 8692923310 / 8169282058
Leave a Reply