मन भिरभिरते, पाखरांसारखे भरारी मारते आणि आपल्याला आनंद देते. पण आनंद प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तींच्या भेटी-गाठींतून देखील अवचित प्राप्त होऊ शकतो.
मध्यंतरी नर्मदा परिक्रमा केलेल्या एक बाई भेटल्या. खूप उत्साही, आनंदी, फ्रेश आणि कुठल्याही जिम मध्ये न जाता बारीक वाटल्या ! चालून चालून ! मला म्हणाल्या, ‘काही लागत नाही गं विशेष जगायला. दोन जोडी कपडे, अगदी एकवेळ खाणं आणि पाणी मिळालं ना की काही नको. खूप हव्यास करतो आपण आणि पसारा वाढवतो.’ मी अंतर्मुख झाले. मनोमन पटलं मला. असो. तर हे मन माझा खरा मित्र, माझा सखा आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारा, अनेक चित्रविचित्र विचार आणून मला आनंद देणारा.
बघा ना आता लिहितानाच असा विचार मनात आला की अचानक एक परी आली आणि तिने सांगितलं की, ‘मी तुला परत १८ व्या वर्षात नेतेय.’ नुसत्या विचारांनी पण खूप छान वाटलं. असं वाटलं मी किती छान प्लॅन करीन. ज्या चुका आधी केल्या त्या आता करणार नाही. लहानपणी कधी अभ्यास केला नाही तो आता करेन. छान डॉक्टर, इंजिनियर बनेन, जे जे तेव्हा केलं नाही ते पुन्हा करीन. माझी गेलेली आई मला परत मिळेल. तेव्हा प्रेम वगैरे करायच्या फंदात पडले नाही आता तेही करून पाहीन. आता बघा हे वय मागे जाणार नाही, गेलेले क्षण परत कधीच येणार नाहीत, कोणतीही परी कधीही फिरकणार नाही हे सगळं माहितीये हो, पण नुसते असे बालिश विचार करूनसुद्धा मन हरखून जातं. क्षण दोन क्षण हवेत स्वप्नांचे हिंदोळे घेतं. उगाच परत त्या काळात गेल्यासारखं वाटतं.
मग नुसते असे विचार करूनही छान वाटत असेल, चेहऱ्यावर हसू येत असेल, कल्पनेतली गंमत आनंद देत I असेल, तर विचार करायला काय हरकत आहे हो? त्याला काही पैसे पडत नाहीत. हवं तेव्हा मन उघडता येतं, बंद करता येतं. मग अडचण कुठेय? तुम्हीही असे भन्नाट विचार करा आणि आनंद घ्या. असा आनंद घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. माझा हा सखा मला खूप आनंद देतो. म्हणून तो माझा खरा सखा !
कधी कधी आयुष्याच्या धावपळीत अचानक काही निवांत क्षण वाट्याला येतात, ते आपण प्लॅन केलेले नसतात. ते अवचित वाट्याला येतात. एखादे स्वप्न पडावे तसे. आणि आपण त्या जागेपणीच्या स्वप्नात अक्षरश: रंगून जातो. आपण आपली कामे, विवंचना, किंबहुना आपले वयही विसरतो. आपल्यासमोर उभा असतो एखादा निवांत–मोकळा आठवडा. आपण त्याची कधी कल्पना स्वप्नात देखील केलेली नसते.
मध्यंतरी असाच एक आठवडा माझ्याही वाट्याला आला. मी परगावी गेले आणि ज्या कामासाठी गेले होते ते काम काही तांत्रिक कारणाने पुढे ढकलले गेले. मी माझ्या खूप जुन्या मैत्रिणीकडे उतरले होते. कितीतरी वर्षांनी मी तिला भेटत होते. मग आम्ही त्या निवांत मोकळ्या आठवड्याचे जणू सोनेच केले. जुन्या गप्पांना ऊत आला. दरम्यानच्या काळात दोघींचेही आयुष्य वेगवेगळ्या गतीने आणि दिशांनी पुढे सरकले होते. त्यातले कितीतरी एकमेकांना माहीत नव्हते. पण सख्ख्या मैत्रीत त्याने फरक पडत नाही. जिथे आपण भेटतो त्या वळणावर पुन्हा नवा सहप्रवास सुरू करता येतो. कितीही काळाचे अंतर भेटीच्या या क्षणात ओलांडून टाकता येते. आम्ही खूप गप्पा केल्या. त्याला हितगुज म्हणतात. लौकिक आयुष्यात त्याला काही अर्थ नसेल कदाचित. पण मैत्रीच्या नात्यात तो आनंदाचा जणु उत्सव असतो. आम्ही सिनेमे पाहिले. नाटके पाहिलेली. ती कामावर गेली की मी तिच्यासाठी नवनवे जिन्नस करायची आणि तिची वाट बघत बसायची. दरम्यान मी निवांतपणे वाचत पडायची.
मग आपण ज्याला पेपर बॅक म्हणतो तशा कादंबरीत देखील मी रंगून जायची. वाटायचं किती बारीक-सारीक तपशील लिहितात हे लेखक. उदाहरणार्थ मी वाचत होते ती एका पंजाबी लग्नाची गोष्ट होती. त्यातला प्रत्येक विधी मी वाचताना प्रत्यक्ष अनुभवला. कादंबरीतल्या पात्रांसोबत मी देखील मनाने त्या लग्नात सामील झाले होते. मी मेकअप करून मुरडत होते, नाचत होते. जणु ते लग्न माझ्याच पंजाबी मैत्रिणीच्या मुलीचे होते. असे कल्पनेतले अनुभव मी मनाने घेत होते आणि समृद्ध होत होते.
कधी नव्हे ते आम्ही माझ्या मुलीसारखा चित्रपटगृहात जाऊन थ्री डी सिनेमा इंग्रजीत पाहिला. तो बघताना मी लहान मुलांसारखी घाबरले, आनंदाने टाळ्या वाजविल्या. सिनेमातली पात्रं थ्री डी परिणामामुळे हाताशी पोचली तेव्हा मोहरून गेले. सगळा आठवडा मी कलाविश्वात फेरफटका मारत होते. आणि जाणवले कला मैत्री सारखीच आनंद देणारी असते. मैत्रीत एका भावानुबंधाची पुनर्भेट असते. कलेत आस्वादकाची प्रतिसाद वृत्ती असते. दोन्हीकडे सारखाच ऊर भरून टाकणारा आनंद सामावलेले असतो. मैत्रीत आपण अनेक भावना अनुभवतो सुखाच्या, दुःखाच्या; तशाच कलेत देखील अनुभवता येतात आणि दोन्हीचे मिलन आनंदाच्या महासागराशीच होत असते. तुम्हीही हा विचार नक्की करून पहा, खूप आनंद मिळेल.
-अरुंधती भालेराव
व्यास – प्रतिभा – दिवाळी अंक २०२१ मधून
Leave a Reply