एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, “कां रे बाबा, तू चांगला हट्टाकट्टा आहेस असं दिसतंय पण मग तरीही तू भीक कां मागतोस?”
“काय करणार सर माझ्यापाशी अनेक महिन्यांपासून कसलंच काम नाहीये…
जर आपण मला नोकरी देणार असलात तर मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईन.”
श्रीमंत माणूस हसून म्हणाला, “मी तुला कांही नोकरी तर देऊ शकत नाही, पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा देखील अधिक चांगलं कांहीतरी आहे. तू माझा बिझिनेस पार्टनर कां होत नाहीस? म्हणजे बघ तू. तुला झेपणार असेल तर….”.
भिकाऱ्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो गडबडून म्हणाला, ” हे आपण कांय बोलताय सर, हे शक्य तरी आहे कां?”
“अरे खरंच बोलतोय मी. माझ्याकडे तांदुळाची एक गिरणी आहे, तू गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किंमतीला विकायचा आणि त्या विक्रीतून जो कांही नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा.”
भिकाऱ्याच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले. सद्गदित होऊन तो त्या श्रीमंताला म्हणाला, ” सर तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवले असावे, मी आपले आभार कसे मनू हेच कळत नाहीये.”
मग अचानक कांही तरी आठवल्यासारखं भिकाऱ्यानं विचारलं, ” पण आपण नफा कसा वाटून घेणार? मी २०% आणि तुम्ही ८०%, की मला १०% आणि तुम्हाला ९०% ? अर्थात तुम्ही जसं म्हणाल तास आपण नफा वाटून घेऊ. मी तयार आहे आपला बिझिनेस पार्टनर व्हायला. मी आज फार खुश झालोय.”
श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ” मी फक्त १०% नफा घेईन, त ९०% घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं.”
भिकाऱ्याने त्या माणसाच्या पायांवर लोळणंच घेतली आणि रडत रडतच तो बोलला, “आपण सांगाल तसंच मी करिन. मी खरंच आपला खूप आभारी आहे.” आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्याने काम सुरु केले. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त, तशात भिकाऱ्यांची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची अधिकच प्रगती होऊ लागली.
आणि मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी व्यापारातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून द्यायचा होता. श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला १०% नफा देखील त्याला खूप अधिक वाटू लागला. आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसला. तो विचार करू लागला… “रात्रंदिवस मेहेनत मी घेतली.. त्या श्रीमंत माणसानं तर कांहीच काम केलं नाहीये..मला जीवनात एक संधी केवळ त्याने दिली आहे. मग मी त्याला हा १०% नफा तरी कां द्यायचा? ह्या नफ्यावर त्याचा अजिबातच हक्क नाहीये.”
इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपला नफ्याचा १०% वाटा घेण्यासाठी आपल्या बिझिनेस पार्टनरकडे आला, तेव्हा चेहेऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला, “सर, अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे, मला या व्यवहारात बहुधा घाटाच झाल्यासारखं वाटतंय, शिवाय ह्या धंद्यासाठी मी लोकांकडून घेतलेली कर्जे देखील फेडायची राहिली आहेत.” आता त्या भिकाऱ्याच्या मनात बद्दी आली होती हे स्पष्ट दिसत होतं.
तो श्रीमंत माणूस म्हणाला, ” मला माहित आहे की या व्यवहारात तुला किती नफा झालंय ते, मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ कां करतोयस?”
यावर तो भिकारी पटकन बोलला, “ह्या नफ्यावर तुमचा कांहीच हक्क नाही, सगळी मेहनत तर मीच एकट्यानं केलीय.”
आता विचार करा ..
जर तो श्रीमंत माणूस आपण असतो, आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं?
अगदी याच प्रकारे..
भगवंताने आपल्याला हे जीवन दिले.. हात – पाय – डोळे – कान – नाक – बुद्धी दिली आहे..
सद्सद्विवेक बुद्धी दिलीय’.. बोलण्यासाठी वाणी दिलीय.. समज दिलीय …
आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की दिवसातील चोवीस तासांपैकी १०% वर देवाचा अधिकार आहे..
हा दहा टक्क्यांचा वेळ आपण अगदी खुशीनं आपण भगवंताच्या स्मरणात घालविला पाहिजे…
आपल्या उत्पन्नाचा १०% भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी आपण वापरावा आणि ज्यानं आपल्याला हे जीवन, ही सुखं दिलीत त्या भगवंताचे आभार मानावेत.
सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देवोत हीच त्या जगताच्या पालन करत्या चरणी प्रार्थना करतो…..
Leave a Reply