ऐका गं भिंतींनो
ऐका माज गाऱ्हाणं
ऐकून बी समजून घील
असं न्हाई कोण इथं शानं
परत्येक जण गढलाय
जगाच्या कुटाळक्यांत
कुटं कोण लढत्यात
तर कुटं कोण जागा लढवित्यात
खोपीतला छुपा वडवानल
कुणालाच दिसतं न्हाई
समदं पाह्यजे आलबेल
कुणालाबी परवा न्हाई
भिंती तेवड्या निब्बर नायत
दारं, झडपांनी मोकळं हुत्यात
ल्हाही ल्हाही जळत ऱ्हातं
काळजा अल्लद फुंकर घालत्यात
नाती खाती येती जाती
‘मी’ चं वारं पाया पोखरती
बडेजाव त्यो लबाड बेगडी
उतरंडीस आवताण देती
किडुक मिडूक रं कशापायी
सारं सारं पून्ना येतं
जीव तेवडा जपतं ऱ्हाई
कुडीतलं तेल संपत जातं
कुडीतलं तेल संपत जातं!!
— वर्षा कदम.
Leave a Reply