गॅस संपला मग सिलेंडर आणून मग स्वयंपाक या सगळ्यात खूप वेळ गेला. पोटात कावळे ओरडत होते पण नाईलाज होता. तर कधी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सगळा स्वयंपाक तयार आहे पण काही कारणाने थांबावे लागते. भूक. शाळेतून. कामावरुन आल्यावर हातपाय धुवून जेवायला बसणार तोच कोणाचा फोन येतो काहीतरी कारणाने जेवता येत नाही… भूक. रसरसून भूक लागली आहे पण तोंड आले की. किंवा आजारपणात चव जाते समोर ताटात अनेक पदार्थ ते ही आवडीचे पण जेवायला जमत नाही.
भूक… वयानुसार भूक आणि पदार्थ बदलत जातात. पण ही एक मूलभूत गरज आहे. बेचव जेवण. न आवडते जेवण. त्यामुळे कधीकधी घरात वाद होतात. आरोपप्रत्यारोप जेवणावर पाणी. असे अनेक प्रकार असतात की ज्या मुळे भूक मरते किंवा मारावी लागते. एकदा असाच अनुभव आला होता. दिवसभर हिंडत बरीच कामे झाली होती. भूक प्रचंड प्रमाणात लागली होती. म्हणून आम्ही सगळे एका मोठ्या हॉटेलात गेलो तर रांग लागली होती म्हणून बराच वेळ तिष्ठत राहिलो. समोरचे टेबल कधी रिकामे होईल याची वाट पहात होतो. त्यांचे झाल्यावर आम्ही बसलो. पदार्थ यायलाही उशीर झाला. भूक.. म्हणजे बघा पैसा देऊनही वेळेला मिळाले नाही. घरीही असेच होते. घरात सगळे भरपूर आहे पण करणारे नाहीत आणि स्वतः ला करता येत नाही किंवा येत असूनही परावलंबी आहे आजारपणामुळे पण भूक….
पण ज्यांना हे कधीच मिळत नाही. गरिबी. म्हणून लग्न समारंभात बाहेर उभे राहून वाट पहात असतात की ताटातील उष्टे का होईना पण काही तरी मिळेल या आशेने. तेवढ्यात कुणी तरी येऊन त्यांना ओरडून हाकलून देतात ते जातात पण भूक जात नाही. मोठमोठ्या दुकानातून अनेक पदार्थ विकायला ठेवलेले असतात पैसे नाहीत म्हणून फक्त बघायचे. ही भूक माणसाला चोर. गुन्हेगार बनवते. कोडगे बनवते. म्हणून अन्नदान करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेवढे जमेल तेवढे तरी करावे. पूर्वी माधुकरी मागून. वार लावून जेवण्याची पद्धत होती. आजही अनेक ठिकाणी अन्नछत्र चालवले जातात.
प्रसादाच्या रुपाने जेवण देण्याची परंपरा आहे. कोरोनाच्या काळातही असे उपक्रम सुरू झाले होते. विसरून धर्म जात भूकेल्याला घास देणारा किंवा घास मुखीचा देणाऱ्याला भेटायला स्वतः सावळा विठ्ठल येतो असे म्हणतात…
भूक आपल्याला लागते तशीच सर्व सजीव प्राण्यांनाही लागते. याची जाणीव ठेवून पहा. विशेष करून गरीब. अपंग असहाय्य यांच्या भूकेची काळजी घेतली पाहिजे. हे फक्त भूकेच्या बाबतीतच नाही तर अनेक बाबतीत आहे अशा वेळी आपल्याला त्यांच्या जागी ठेवून बघा म्हणजे कळेल की गरज कशी असते व ती पूर्ण न झाली की काय होते. काय वाटते. गम्मत म्हणजे ज्यांना भूक असते त्यांना मिळत नाही आणि ज्यांना सगळेच मिळते पण भूक लागत नाही.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply