सुमारे दिडशे वर्षांपूर्वीची एक दंतकथा आहे. एका राजाने चार मजली भव्य राजवाडा बांधला. राजवाड्यावरील छतावर त्याने तांबा या धातूचे चांगले पाच सेंटीमीटर जाडीचे पत्रे घातलेले होते. राजवाड्यात सुखाने नांदत असताना एका मोहाच्या क्षणी राजा, एका स्त्रीच्या मोहजालात गुरफटला. त्या पायी त्याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली. तिच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी, तिने पाच लाख रुपये मागितले. राजाला प्रश्न पडला, पैसे उभे कसे करायचे? त्याने राजवाड्याच्या छतावरील तांब्याचे पत्रे विकून आठ लाख रुपये उभे केले, त्यातील पाच लाख तिला देऊन तीन लाखांचे लोखंडी पत्रे पुन्हा राजवाड्यावर चढवले.. तोच हा भोरचा राजवाडा, जो आजही दिमाखात उभा आहे!!
तिसरे पंतसचिव चिमाजी नारायण यांच्या कारकीर्दीत १७४० साली हा राजवाडा बांधला गेला. १८५८ व १८६९ अशा दोन वेळा लागलेल्या आगीत वाड्याचे मोठे नुकसान झाले. पुन्हा दोन लाख रुपये खर्च करुन वाड्याची पुनर्बांधणी केली गेली. तोच हा राजवाडा, आज भोरच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे.
इंग्रजांच्या काळात अनेक संस्थाने विलीन झाली. त्यातून भोरचे संस्थान खालसा न होता तसेच राहिले. आज राजवैभव नसले तरीही त्या काळच्या ऐश्वर्याची, उच्च अभिरुची असलेली ही देखणी ऐतिहासिक वास्तू उभी आहे. या वाड्याची पुनर्बांधणी ही इंग्रजांच्या काळात झाल्यामुळे सहाजिकच पेशवेकालीन व पाश्चात्य शैली यांची सरमिसळ झालेली दिसते. या चार मजली वाड्याचे एकूण क्षेत्रफळ ४४ हजार चौरस फूट आहे. लाकूड काम, दगड काम व वीट काम या तिन्ही गोष्टींचा मिलाफ या वास्तुरचनेत पहायला मिळतो. या तीन चौकी प्रशस्त वाड्याची जमिनीवरील रचना ही इंग्रजी L अक्षरासारखी आहे. नगारखान्यासहीत महिरपीचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे. पहिल्या चौकात प्रवेश केल्यावर उंच जोत्यांसह पायऱ्यांची रचना व उभे लाकडी खांब यातून रुबाबदार वाड्याची भव्यता जाणवते. दुसऱ्या चौकात प्रवेश केल्यावर दुमजली चौकाच्या मध्यभागी दुप्पट उंचीच्या खांबांच्या दरबाराचा शामियाना नजरेस पडतो. दक्षिणेकडील चौकाभोवती राहण्यासाठी दालनं, स्वयंपाक घरं व भोजनगृह आहेत. चौकामध्ये उघडणाऱ्या कमानींच्या खिडक्यांमुळे दोन्ही मजल्यांवर भरपूर प्रकाश व खेळती हवा मिळते. इथे वरुन खाली, येण्या-जाण्यासाठी असलेले जिने हे ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या तेरा अक्षरांनुसार तेरा पायऱ्यांचेच आहेत. तळमजल्यावरील स्वयंपाकघरात धूर कोंडून राहू नये म्हणून छतामधून अत्यंत कौशल्याने चार चार धुराडी ठेवलेली आहेत. कोणे एकेकाळी याच स्वयंपाक घरातून तयार झालेल्या पंचपक्वान्नाच्या जेवणावळी अनेकदा या वाड्यात उठल्या असतील..
दरवर्षी रामनवमीचा उत्सव या वाड्यात वंशपरंपरेने साजरा केला जातो. त्या दिवशी गावभोजन असते. आताच्या पिढीतील पंतसचिवांच्या हस्ते रामजन्म सोहळा पार पडतो. पंतसचिव यांच्या आताच्या पिढीनेही हा राजवाडा उमेदीने सांभाळला आहे.
१९७७ सालापासून हा राजवाडा चित्रपटाच्या शुटींगसाठी देण्यास सुरुवात झाली. आधी ‘बैराग’ नंतर ‘शापित’ या चित्रपटांचे इथे चित्रीकरण झाले. त्यानंतर आशा काळे अभिनित ‘अर्धांगी’ या मराठी चित्रपटाचे शुटींग झाले. ‘खाकी’, ‘मंगल पांडे’, ‘कुंकू’, ‘चिंगारी’, ‘फुलवंती’, ‘वासुवेव बळवंत फडके ‘, ‘बालगंधर्व’, ‘राजकुमार’, ‘बाजी’, ‘मुंबई पुणे मुंबई ‘, ‘बाजीराव मस्तानी’ इत्यादी चित्रपट व ‘पेशवाई’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘कल्याणी’, ‘एक वाडा झपाटलेला’, ‘लक्ष्मी’, ‘पिंजरा’, ‘सावित्रीबाई फुले’ अशा अनेक मालिकांचे शुटींग इथे झालेले आहे.
मी इयत्ता तिसरीत असताना, आमच्या शाळेची सहल भोर, भाटघर व आंबवडे या ठिकाणी गेली होती. त्या वेळेस हा राजवाडा पाहिल्याचे मला पुसटसं आठवतंय. त्यानंतर १९९६ साली वाजवू का? या दादा कोंडके यांच्या चित्रीकरणावेळी पुन्हा पाहिला. त्याच दरम्यान एका लग्न समारंभाचे फोटो काढण्यासाठी याच वाड्यात गेलो होतो. आता त्या गोष्टीलाही २७ वर्षे होऊन गेली आहेत. पूर्वी पुण्यातील शनवार वाड्याप्रमाणे इथे कोणीही कधीही या राजवाड्यात प्रवेश करु शकत होतं, आता मात्र पूर्व परवानगीशिवाय वाड्यात प्रवेश करता येत नाही. सध्या राजवाड्याभोवती दुकानांचं अतिक्रमण झालंय. आतमध्ये दोन राजकीय कचेऱ्या आहेत. मागील बाजूस काही भाडेकरु कुटुंब राहताहेत. काही ठिकाणी पिंपळाच्या रोपं, जमिनीवर घट्ट पसरुन भिंतीला चिकटून उभी आहेत. वरचेवर देखभाल व पडझड झालेल्या लाकडी नक्षीकामाचे नूतनीकरण न केल्यास ही वास्तू हळूहळू निष्प्रभ होत जाईल.. त्यासाठी अशा वास्तू जतन करणं हे महत्त्वाचे आहे… आज राजे- महाराजे नाहीत मात्र त्यांच्या ऐश्वर्याची साक्ष देणारे असे राजवाडे, हेच इतिहासाचे खरे साक्षीदार आहेत…
– सुरेश नावडकर, पुणे
१८/११/२३
Leave a Reply