लहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे. मानेकाका त्या दिवशी सकाळीच गच्ची धुवून घ्यायचे. साडेआठ, नऊ वाजले की सोसायटीतली सगळी मंडळी वर जमा व्हायची. चेअरमन, सेक्रेटरी व इतर कमिटी मेंबर त्या दिवशी जोरात असत. जणू घरचेच कार्य असावे अशी त्यांची धावपळ सुरू असे.
सामूहिक ‘भेळ व मसाला दुध’ असा ठरलेला मेनू असायचा. साधा सोप्पा. त्यात बदल नसे. दोन,तीन वर्तमान पत्रे खाली पसरून त्यावर भेळ बनवली जायची. सुकी भेळच बनवत. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, यानी जो काही त्याला ओलावा यायचा तेच. थोडा बटाटा पण उकडून घातलेला असे. वर्तमानपत्राचे मोठ्ठे चौकोनी तुकडे करून त्यावर दिली जायची प्रत्येकाला खायला. चमचे, प्लेटी या भानगडी नव्हत्या. मुठ मुठ भरून तोंडात कोंबायची. खाल्यावर हात झटकले की झाले.
एकीकडे गाण्याच्या भेंड्या किंवा संगीत खुर्ची असे काहीतरी खेळ चालू असत. रात्री गच्ची वरून लांबचे दिवे बिवे बघण्यात वेळ जाई. कोणी दिव्याचे कंदिल पतंगाला जोडून आकाशात सोडलेले असत. ते ही पहायला मजा यायची. हळूहळू चंद्र डोक्यावर येई. खुप छान दिसे. प्रदुषण नसल्यानेही तो जास्त स्पष्ट व तेजस्वी दिसे. कोणी दादा शुक्राची चांदणी, धृवतारा, सप्तर्शी, मंगळ अशी तारकांची ओळख आंम्हाला करून द्यायचा प्रयत्न करे. आंम्हीही हो हो करायचो.
आमचे चाललेले आकाशदर्शन पाहून, “मुलांनो! त्यावरच्या डागांमुळे तयार झालेला आकार तुम्हाला सश्या सारखा दिसतोय का हरिणा सारखा?” असे जोशीआजी आम्हाला विचारत. अन मग “कोणाला तो सश्यासारखा वाटतो. त्यांनी त्याचे नाव ‘शशांक’ ठेवल. तर कोणाला हरिणा सारखा भासला. त्यानी ‘मृगांक’ ठेवल!” हे ही मग सांगत. त्यावर मग आम्हा मुलांच्यात वाद होई, नक्की तो कसा दिसतोय या वरून.
भेळ खाऊन झालेली असे. पाध्ये आजी मसाला दुधाचे पातेले वर घेऊन येत. चंद्राला नैवेद्य दाखवत. पण दुध पिण्यासाठी मात्र बारा वाजेतो थांबावे लागे.
तोवर “कोजागरी म्हणजे ‘को जागर्ती’..कोण जाग आहे?” हे विचारत आकाशातून देवी लक्ष्मी रात्री फिरत असते अशी माहिती कोणी सांगे सर्वांना.
“अन फिरतांना राहाते कोण चांगला आहे, कारण झोपला आहे ते. जो जागा असेल त्यावर लक्ष्मी संतुष्ट होऊन आशिर्वाद देते.”
हे एकल्यावर आम्हा बच्चेकंपनीचे लक्ष आकाशाकडे लागून राही. अगदी दुध पितांना देखील. का तर आकाशात कुठून येतांना दिसत्येका लक्ष्मी? ते पहायला. आणि मुख्य म्हणजे ती आपल्याला पाहत्येना ह्याची खात्री करायला!
— अनंत गद्रे
“आम्ही साहित्यिक’ वरील लेखक
(सुधारीत पुन:प्रकाशित)
Leave a Reply