नवीन लेखन...

भुमिकांची अदलाबदल

आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही. समोरच्या माणसाची भुमिका समजून घेण्यासाठी थोडासा परकाया प्रवेशाचं कौशल्य अंगी असावं लागतं आणि ते प्रयत्नाने सहज साध्य असतं. असं कौशल्य आत्मसात करायचं तर एकच अट असते आणि ती म्हणजे स्वत:च्या ‘अहं’चा त्याग करणं..!आपल्या मतांच्या विरुद्ध बोलणाऱ्या त्या माणासाच्या जागी आपण एकदा का प्रवेश केला, की त्याची भुमिका आपल्याला बरोबर समजते.

एखाद्याचा खुन करणं हा समाजाच्या दृष्टीनं गुन्हा असला तरी त्या खुन करणाराच्या भुमिकेत शिरून आपण विचार केला की त्याची बाजू न्यायं असु शकते हे आपल्याला पटते. मी हल्ली असाच विचार करायला सुरुवात केली आहे आणि गम्मत म्हणजे मला तेंव्हापासून सर्व जगच चांगलं भासू लागलंय. अर्थात अशावेळी आपली एक भुमिका असणं गरजेचं असतं आणि त्यावर ठाम असणंही. आपण ठाम राहाण्यासाठी दुसऱ्याचा विचार बरोबर चुकीचा नसून ‘वेगळा’ आहे असा विचार करणं आवश्यक असतं. हे स्पष्ट करताना मी नेहेमी ‘पेप्सी’चं उदाहरण देतो. पेप्सी या थंड पेयाची रिकामी बाटली समोरून पाहिली असता PEPSI अशी अक्षरं दिसतात. पण तीच बाटली उलटीकडून पाहिली असता 12939 अशी अक्षरं दिसतात. आता उलट व सुलट अश्या दोन्ही बाजूकडून पाहाणाऱ्या दोघांचंही म्हणणं बरोबरच असते, फरक फक्त कुठून पाहातो त्या ‘जागे’चा असतो..! आपण फक्त क्षणभर त्या जागेची अदलाबदल केली की त्याची योग्यायोग्य भुमिका आपल्याला समजते, ती पटणं आवश्यक नसतं. असं ‘समज’ येणं ही संवादाची पहिली पायरी असते.

हे सर्व लिहीण्याचे कारण की माझ्या एका व्हाट्सअॅप ग्रुपवर जातीभेद व आरक्षणावर झालेली चर्चा. खरं तर याला चर्चा म्हणणंही योग्य नाही कारण ती नको एवढी ताणली गेली आणि त्याचं पर्यवसान एकाने ग्रुप सोडण्यात झालं. जातीभेद, रिझर्वेशन यावर चर्चा व्हायला हवी पण भाषा संयत आणि मर्यादशील असावी. तसंच चर्चा करणारांनी आपल्या पूर्वजांनी जे केलं किंवा भोगलं त्याचा अभिमान किंवा अपमान आता इतक्या वर्षांनतर बाळगून चालणार नाही आणि तरच पूर्णपणे वस्तुनिष्ठ चर्चा संभवते. हे असं घडणं सहजा सहजी शक्य नाही आणि झालंच तर काही विघ्नसंतोषी लोक तसं होऊ देणार नाहीत कारण त्यांची दुकानं बंद होण्याची त्यांना भिती असते.

चर्चा संवाद घडवते आणि संवादातूनच मार्ग मिळतो. एकमेकांना शिव्या देऊन प्रश्न चिघळतो, मिटत नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. व असं करण्यापेक्षा एकमेकांनी एकमेकांच्या भुमिकांची अदलाबदल करून विचार करणं गरजेचं आहे. जातीधारीत रिझर्वेशन हवं असं म्हणणारांनी, ते नको असं म्हणणारांच्या भुमिकेत शिरून ते तसं का म्हणतात याचा विचार करायला हवा व रिझर्वेशन नको असं म्हणणारांनी ते हवं असं म्हणणारांच्या जागी स्वत:ला कल्पून विचार करायला हवा आणि तसं झालं तरच काहीतरी सकारात्मक धडू शकेल, नाहीतर जे सध्या घडतंय तेच घडणार आणि समाजात तेढ निर्माण होण्यानाचून दुसरं काही घडणार नाही.

वाद घालण्यानं किंवा न बोलण्याणं किंवा संवाद तोडण्याणं मार्ग कसा निघेल? वाद मिटून मार्ग निघण्यासाठी संवाद हा एक आणि एकच पर्याय शिव्लक उरतो. आणि त्यासाठी वर लिहील्याप्रमाणे ‘अहं’चा त्याग करून स्वत:ला दुसऱ्याच्या जागी कल्पून विचार करणं आवश्यक आहे. जाती-रिझर्वेशनच कशाला, कोणत्याही गोष्टींवर मतभेद झाले असता त्या गोष्टीच्या बाजूने मत असणारांनी आणि विरूद्ध मत असणारांनी एकमेकांची जागा बदलून किंवा एकमेकांच्या भुमिकांची अदलाबदल करून विचार केल्यास वादापेक्षा संवाद वाढून काहीतरी चांगलं, सकस असं निश्तितच घडू शकेल, नव्हे घडतंच..!!

— नितीन साळुंखे
9321811091

मन की बात 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..