नवीन लेखन...

भुरा….

‘धडधड धडधड कर्र…कच…कच…!’

कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्‍याचीवाडी….चलो भुर्‍याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्‍यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं….! होय…. भुऱ्याचच…! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्‍या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्‍याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे.

महादा,सुदामा अन् रम्या शहरातल्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकत होते.त्यांना भुऱ्याच्या बाबतीतील ‘त्या’ सर्व कहाण्या मनघडंत आणि कपोलकल्पित वाटायच्या.गावातलं कुणीतरी म्हातारं खोड सांगायचं की,‘एकदा गावातला एक फलाना बिस्ताना व्यक्ती आपली बैलगाडी जुंपून फाट्याकडच्या शेताकडे जात होता… अमावस्येची रात्र होती…त्या बैलगाडीच्या धुरकर्‍याचा असल्या अफवांवर बिलकुलच विश्वास नव्हता.तो आपला धुर हाकत हाकत रस्त्यानं चालला होता.तेवढ्यात अचानक त्याच्या रस्त्यात एक मोठाच्या मोठा बाळराक्षस आला.त्या बाळराक्षसांनं त्या व्यक्तीची गाडी अलगद हातान उचलली आणि आपल्या हातावर एखाद्या खेळण्याप्रमाणे तो ती गाडी खेळवु लागला. त्याचा हा खेळ त्याची घटका संपेपर्यंत चालूच होता.अचानक घटका संपल्याचा त्याला आभास झाला आणि त्याने त्या गाडीचा, त्या गाडीवरच्या धुरकऱ्यासहित मुठीत आवळून बुगदा बुगदा करून टाकला.दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीराचे हाल पाहून सगळं गाव हादरून गेलं होतं.

भुऱ्याबद्दल गावामध्ये व्यक्ती तेवढ्या कथा होत्या.कुणी सांगायचे की त्या रस्त्यावर भुऱ्या एका घुबडाच्या रुपात उडत फिरतो म्हणून….! अमावस्येच्या त्या ‘काल’घटे मध्ये जो कोणी त्याच्या पाशात अडकेल त्याला ते निशाचर घुबड आपले वेगवेगळे आवाज काढत मोहनी घालायच. हळूहळू तो आवाज ऐकणाऱ्याला त्या घुबडाची भाषा समजायला लागायची.मग ते घुबड शिकारीशी गोड गोड बोलून एक एक खेळ खेळायलं लागायचं….अगदी त्याच्या अंगा खांद्यावर खेळायचं….आणि कालघटिका संपत यायला लागली की,मग मात्र ते घुबड आपलं आक्राळ विक्राळ रूप घ्यायचं आणि त्याच्या जाळ्यात अडकलेल्या शिकारीला पायाच्या पंजात धरून उंच उंच आभाळी नेऊन खाली सोडुन द्यायचं.

तसं पाहीलं तर गावातल्या वेगवेगळ्या म्हातार्‍यांजवळ वेगवेगळ्या कहाण्या होत्या.कुणी सांगायचं की भुऱ्या अमावस्येच्या रात्री खेकडा बनून रस्त्यावर येतो म्हणून…! एक खेकडा….दोन खेकडे….तीन खेकडे…खेकडेच खेकडे….खेकडेच खेकडे…..! ते सगळे खेकडे मिळून त्या सावजाच्या भोवताली आपला खेळ मांडायचे आणि त्यांच्या सावजा सोबत खेळ खेळायचे.बरं त्या खेकड्यांच्या चालीत काय जादू होती कोणास ठाऊक..? जो कुणी त्या खेकड्यांची चाल पाहायचा तो संमोहून गेल्यासारखा त्या चालीकडे बघतच राहायचा.त्यांची ती विशिष्ट लकबिची लयबध्द चाल पाहून बघणारी व्यक्ती त्या खेकड्यांकडे आपोआपच खेचली जायची.रातच्यालं त्यांची घटका संपण्याच्या वेळेपर्यंत ते खेकडे त्या सावजाशी पोटभरून खेळायचे, अन घटका भरली की मग मात्र ते खेकडे एकमेकांत विलीन होऊन भल्या मोठ्या खेकड्याचं रूप धारण करायचे आणि त्या सावजाला आपल्या पाशगृहात घेऊन जायचे.तिथे त्या शिकारीच्या अंगावर आपल्या नांग्यांनी प्रहार करून सहस्त्रछेद विधी करायचे.त्याचे शरीर छिन्न विछीन्न झाले की अंगावरचे मांस ओरबाडून त्याची शिकार करायचे…..! दुसऱ्या दिवशी त्या शिकारीचे छिद्रमय झालेले मृत शरीर फुगून पाण्यावर तरंगलेले आढळून यायचे.

एसटी मधून उतरल्यानंतर महादा,सुदामा आणि रम्या गावाकडे निघाले.त्या परिसरात दूर दूर पर्यंत माणसाचा मागमूसही नव्हता.रस्त्याने चिटपाखरूही नसल्याने तो सुनसान रस्ता आणखीच भयानक वाटत होता.मध्येच कुठे तरी जंगली जनावरांच्या अथवा रात किड्यांच्या आवाजाने त्या वातावरणातील शांतीचा भंग होत होता.वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची भयानक शांतता होती.अगदी जवळचेही दिसत नसल्यामुळे तिघेही चालताना जोर जोरात बोलत होते.फाट्यापासून गावाचे अंतर केवळ तिन किलोमीटर होते.तरीही आपण खूप वेळापासून चालतोय असे त्यांना वाटत होते.तेवढ्यात त्यांना रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या डेबर्‍या (ते झाड खोडाच्या मध्यभागी वाकलेलं असल्यामुळे त्या कडुनिंबाच्या नाव होतं डेब्रा निंब असं पडलं होतं)निंबाच्या झाडाखालुन कुणीतरी रस्त्याकडे चालत येताना दिसलं.एवढ्या भयान वातावरणात आणि रस्त्यांनं चिटपाखरूही नसताना कुणीतरी आपल्या संगतीला आलेय या भावनेने त्या तिघांनाही बरे वाटले.तसेही भूतस्य कथा रम्या…असं म्हणतात. आज त्यांना तसल्या वातावरणाचा जवळून अनुभव येत होता.

“अंहुं…अं..ख्ख…ख्ख…ख्यराक…च्च…कं.. क्कं,काय पाव्हनं कुठल्या गावचं म्हं…म्हणायचं तुम्ही?” खाकरत खाकरत अंधारातून ती आकृती जवळ आली आणि त्याने रम्या,सुदामा आणि महादाला प्रश्न केला.अंगापिंडाने जरा स्थुल आणि देवींच्या व्रृणांनी कुरूप झालेल्या चेहर्‍याच्या त्या मालकाचा आवाज मात्र भलताच जाडा भरडा, आणि रहस्यमय वाटत होता.त्याचे पोट भलतेच पुढे आलेले होते.पाय वाकलेले असल्यामुळे चालतांना तो एका विशिष्ट लयीत चालत होता.तो बोलतांना त्याच्या उच्चारणांसोबत येणारा हवेचा झोत सगळ्या वातावरणात त्याच्या शब्दांना पसरवतोय असे वाटत होते.नेमकं त्याच्या आवाजात क्रुरता होती,भीती होती की रहस्यमयता होती हे काही कळत नव्हतं.चालता चालता तो म्हातारा कुणाशी तरी बोलायचा…मध्येच हसायचा….मध्येच कुणाकडे तरी बघून हातातील काठी फिरवत काही बाही बरळायचा….त्याचं ते वागणं बघून रम्या,महादा आणि सुदाम्याला आता मात्र भीती वाटू लागली,परंतु आपल्याला त्या म्हाताऱ्याच्या तशा वागण्या भीती वाटत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी त्या म्हाताऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.“आज्या,तुम्हालं याच्या आंधी कव्हा पाहिलं नाय गावात…नेमकं कुठलं म्हणायचं तुम्ही….?” महादा म्हणाला.

“हुं…अं..चु…च्च…च्च…,मी…मियी…याच गावचा हाय मनलं…हं…अं…!”

“अं….या गावचे म्हणताय पण आम्ही तर तुम्हालं कव्हाच गावखत पाह्यलं नाही ब्वा.” आपल्या मनातली भिड चेपल्यामुळे रम्या म्हणाला.तसा तो म्हातारा गप्पकन ब्रेक लागल्यासारखा एका जागी थांबला अन् सुदाम्याच्या नजरेत पाहून बोलू लागला,“अं…च्च…च्चु…च्चम्म…सांगीन ते बी वेळ आल्यावर सांगीन…. अजून वेळ आलेली नाय…ते…ते इथेच राखणीवर राहते…. त्याची वेळ व्हयाच्या आंधी चला गपागप गावाकडं…..नायं तं ते कुणालं बी सोडणार नाही बघा….!”

“कोण वो…कोण नाय सोडणारं…आनं कामुन बरं…. कोणं काय बिघडवलय त्या भुताचं…आं..आन व्हय वो आज्या खरचं भुर्‍याचं भुत हाय का वो…आण ते भुत व्हवुन कामुन राहते.आता हेच पहा नं रातच्या पाहारीच इकडल्या शिवारात कोण बी येत नाही आणि तुम्ही एकटेच राहता म्हंता…मंग तुम्हालं भ्याव वाटत नाही का ? खरंच जर भूत आसतं तं तुम्हालं नसत का दिसलं? तुम्ही काय बी म्हणा… भूत बीत काय नसते हो… मलं तर हे सगळे मनाचेच खेळ वाटतात.”!” महादा त्या म्हातार्‍‍याची टवाळकी करण्याच्या हेलमध्ये बोलला,अन कर्रकच्चुन ब्रेक लावुन गाडी थांबवावी तसा तो म्हातारा गप्पकन एका जागीच उभा राहिला. “हुं…अं..चु…च्च…च्च…!…श्शुऽऽ….शांत बसा…. ऐकतोय तो…. तो इथेच आहे….सगळ्या गप्पा ऐकतोय…. तो कव्हाचाच आलाय….पण त्याची वेळ झालेली नाही अजून….रातंलं दोन सारख्या तुकड्यांत कापुन वेळ येते त्याची…!मग सुरूवात होते त्याच्या साम्राज्याची…! त्याच्याकडे मायाजाल आहे…तो सावजालं हेरतो…अन् ते मायाजाल तो चौकड फेकतो.त्याच्या त्या मायाजालात अगदी अलगदपणे ते सावज फसते…..ॲंऽऽ ह्यॉऽऽ हॅं…हयॅंऽऽ हा….आं…!” अतिशय गंभीरपणाने सांगत असतांनाच तो म्हातारा जोर जोरात हसायला लागला.रात्रीच्या त्या गुढ निबीड अंधारात त्याचं ते पहाडी हसणं अंगाचा थरकाप उडवत होतं.त्याच्या त्या अकस्मात गडगडाटी हसण्यामुळे ते तिघेही वर्गमित्र भितीने थरथरत होते.त्यांचे अंग घामाने ओले चिंब झाले होते तर भीतीने शहारून जाऊन त्यांच्या अंगावरील रोम रोम थरारून उभे राहिले होते. क्षणभर सुदाम्याच्या तं अंगातले बळच गळून गेले होते.त्या म्हाताऱ्याच्या आवाजामध्ये भीती,रहस्य,करुणा असे वेगवेगळे भाव एकाच वेळी जाणवत होते.

“बर आज्या,तुम्ही म्हणता ते जर खरं मानलं तर मग एक सांगा,असं कामुन करते बरं ते भुऱ्या…!” रम्या घाबरत घाबरत बोलला.

“हुं…अं..चु…च्च…च्च ते त्याचं काय हाय पोरांनु,मं…मव्हा जनम बी ईथल्लाच हे….मलं लहानपणचा भुर्‍या आठवते. माय नसलेलं पाच-सहा वर्षाचं बोधल्या-बोधल्या,गबरू-गबरू असलेलं ते पोरगं जन्मजातच दोन्ही पाय वाकडे असल्यानं डब्बुक….डुब्बुक…असं खेकड्यासारखं लयीत चालायचं.त्याच्या दोन्ही हातापायांच्या काड्या अन पोट भदाड्या असं त्याचं वेंधळट रूपडं होतं.अंगावर देवीचे वृण आल्यानं त्याचा सगळा चेहरा कुरूप झालेला व्हता.त्यामुळे गल्लीतलेच काय पण गावातील पोरंसुध्दा त्यालं त्यांच्यासोबत खेळू द्यायची नाहीत.भुर्‍या नेहमीच मुलांसोबत खेळण्यासाठी खूप तरसायचा. हे बघून त्याच्या वडिलांनाही खूप दुःख व्हायचं.एके दिवशी त्याच्या वडिलांनी शेजारच्या मुलालं भुऱ्या सोबत खेळायलं बलावलं.आपल्या सोबत कुणीतरी खेळायलं आलय म्हणून भुऱ्यालं लय आनंद झालता.कुणासोबत तरी खेळण्यासाठी तो खूप आसुसलेला व्हता.भुर्‍यालं देवानं रूपडं देलं नव्हतं पण बोलण्याची कला मात्र फार छान दिली होती.त्याचा आवाज जरी रटाळ असला तरी सुद्धा तो ज्या पद्धतीने गोष्टी सांगायचा तसं तस्ं समोरची व्यक्ती एखाद्या मायाजालामध्ये अडकावं तशी त्याच्या बोलण्यात गुरफटून जायची. त्याच्याशी खेळायलं आलेला ते शेजारचा मुलगाही असाच त्याच्या बोलण्याच्या मायाजालात गुरफटला. भुर्‍याच्या हाताची नखं वाढलेली होती.ती नेहमी सळसळ करायची मग भुऱ्याने त्या मुलालं पाण्यात बुडवलं आणि आपल्या टोकदार नखांनी तो त्याच्या अंगावर टोचु लागला.या खेळात ते शेजारचं पोरगं पाण्यात बुडून मेलं.गावातल्या लोकांनी या सर्व गोष्टीसाठी भुऱ्यालं कारणीभूत ठरवून त्यालं मारहाण करायलं सुरुवात केली. सर्वप्रथम त्यालं एका उंच कड्यावर नेलं आणि तिथून त्याचा कडेलोट केला.कडेलोटानंतर सुद्धा भुऱ्यालं काहीच झालं नाही.मग मात्र ते लोकं खुप खवताळले.परत त्या लोकांनी त्यालं सुळावर चढवलं.भुर्‍याच्या अंगावर सहस्त्रछिद्र पडले व्हते…तरीही भुर्‍याचं नशीब बलवत्तर म्हणून तो जिवंतच होता.मग मात्र गावकरी लोकं लयचं चिडले त्यांना वाटलं की भुर्‍याच्या अंगात राक्षसी शक्ती आहेत म्हणूनच तो वाचतोय.त्यांनी भुऱ्यालं लाथा बुक्क्यांनी मारत पायदळी तुडवून मारायलं सुरुवात केली.हे मात्र भुर्‍यालं सहन झालं नाही.लई यातना झाल्या त्याच्या अंगालं….! त्याच्या बा लं त्याची ती तशी अवस्था पाहवली नाही….उर बडवु बडवु नरडा फाटोस्तोर ते रडु लागला…! रडून रडुन कुठं गेला काय ठाऊक…. डबल काय ते भुर्‍यालं भेटायलं आलाच नाही…मंग भुर्‍या शेतातच राहु लागला…त्याच्या बा नं झाडावर बांधून देलेल्या घरात…! दिवसभर तो झाडावरच लपून राहायचा. आणि रात झाली की रात्री चे दोन तुकडे करणाऱ्या बारा वाजताच्या वेळेपासून ते सव्वा एक वाजेपर्यंतच्या वेळेचा आता तो अनभिषिक्त सम्राट होता.त्याच्या शिवारातल्या ‘त्या’ वेळेचा आता ‘तो’ राजा होता…त्या वेळेला जो ही कोणी माणूस त्याच्या मायाजालात फसतो त्यांना तो पकडून आणतो…त्यांच्याशी खेळ खेळ खेळतो…तो त्याच्याच आवडीचे खेळ त्या पकडलेल्या माणसांशी खेळतो…. आणि मग त्याची वेळ संपत येताच तो त्या सावजाची शिकार करून,पुन्हा आपली वेळ येण्याची वाट बघत बसतो….!” तो म्हातारा आपल्या विशिष्ट शैलीत आपली कथा सांगत होता.एव्हाना आतापर्यंत बोलताना तो म्हातारा सुरुवातीला ‘हुं…अं..चु…च्च…च्च…!’असा आवाज काढतो हि त्याची लकब आहे हे सर्वांच्या लक्षात आलं होतं.आता सर्वांनाच त्याचं बोलणं आवडायला लागलं होतं.तो म्हातारा जे काही बोलत होता ते सर्व त्यांना विस्मयकारक वाटत होतं.त्याच्या गोष्टी ऐकून रम्या आणि सुदाम्यालं भीती वाटत होती पण महादा मात्र नवलाईनं ऐकत होता.

रम्याला आभाळात वारं घोंघावत असल्याचा भास झाला आणि तो जाग्यावरच थबकला.तो वर आभाळाकडे टक्क लावून पाहत होता. एवढ्यात त्याला आपल्यासमोर लक्ख उजेड पडलेला दिसायला लागला.परंतु सुदामा आणि महादा मात्र त्या म्हाताऱ्या सोबत अंधारामध्ये एकाग्रचित्ताने त्या म्हाताऱ्याच्या गप्पा ऐकतं चलत होते.रम्याने पाहिले की तो अंधारही त्या म्हाताऱ्याच्या गप्पा ऐकतं ऐकत त्यांच्यासोबतच चलत होता.रम्या जीवाच्या आकांताने ओरडून त्यांना आवाज देत होता परंतु त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. अचानक त्याला दोघांच्या मध्ये एक उंच उंच भिंत तयार झाल्याचे भासले. तेवढ्यात त्याने आकाशात पाहिले ‘हुटऽ हां…हुटऽ….हुटऽ हां…हुटऽ’असं करत एक घुबड उंचावरून खाली उडत येत होतं.ते जसं जसं खाली येत होतं तसतसा त्याचा आकार वाढत होता.रम्याने त्या घुबडाच्या डोळ्यात पाहिले आणि तो त्या डोळ्यांमध्ये खोलवर डुबतच गेला.आता मंतरल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.तो काही हालचाल न करता एका जागी मख्ख उभा होता.ते घुबड आले आणि त्याने रम्याला आपल्या दोन्ही पंजामध्ये उचलले आणि उंचच उंच कड्यावर घेऊन गेले.रम्याला घेऊन जात असतांना ते घुबड रम्याशी फार आनंदाने खेळत होते.हवेमध्ये उंच फिरत असताना अचानक ते घुबड कड्याच्या टोकावर पोहोचले आणि मग मात्र का जाणे पण त्या घुबडाने रम्याला खाली सोडून दिले.रम्या खोल दरीत जाऊन पडला होता. रम्याचे शरीर चंदामेंदा झाले होते,तरीही रम्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

इकडे अंधारात त्या म्हाताऱ्याच्या गप्पा ऐकत ऐकत चालत असतानाच अचानक सुदाम्याच्या पायाला काहीतरी लागले आणि तो मटकन खाली बसला.त्याने पुढे…. बघितले.त्याला त्या अंधारात स्पष्ट दिसत होते….अगदी स्पष्ट…! महादा आणि तो म्हातारा गप्पा करत करत पुढे चालत होते. त्यांच्यासोबतच त्यांच्या गप्पा ऐकत अंधारही चालत होता.सुदाम्याने समोर बघितले.त्याला रस्त्याच्या बाजूला प्रचंड मोठा तलाव दिसत होता आणि त्या तलावातून खेकड्यांची भली मोठी फौज त्याच्या दिशेने चालत येत होती. त्याच्या दिशेने येणारे ते खेकडे आता एकमेकांच्या अंगावर चढत होते आणि अचानक ते एकमेकांमध्ये विलीन होत होत मोठ्ठा… मोठ्ठा…आकार घेत होते.सुदाम्याने पाहिले की सर्व खेकडे एकमेकांत विलीन होत एका भल्यामोठ्या खेकड्याने आकार घेतला होता….सुदाम्याने त्या खेकड्याकडे पाहिले तर त्याला तो प्रचंड मोठा जाणवत होता. सुदाम्यांनं त्या खेकड्याच्या डोळ्यात पाहिले. त्यालाही त्या खेकड्याच्या डोळ्यात पहाताच खोल विहरत असल्याचे जाणवले. एवढ्यात त्या खेकड्याने आपल्या नांग्यामध्ये सुदाम्याला उचलले आणि तलावात नेऊन त्याला पाण्यात बुडवले. आता तो खेकडा मोठ्या आनंदाने आपल्या नांग्यांनी सुदाम्याच्या अंगावर सहस्त्रछिद्र विधी पार पाडत होता. सुदाम्याचे अंग छिद्रांनी छिन्न-विछीन्न झाले होते,तरीही त्याला फार समाधान वाटत होते.तो समाधानाने त्या खेकड्याच्या डोळ्यात पाहत होता.

महादा त्या म्हाताऱ्याच्या गप्पांनी संमोहित होऊन त्याच्या मागोमाग चालत होता. आपले दोन्ही मित्र आपल्या सोबत नाहीत याचेही त्याला भान नव्हते.तो म्हातारा महादाला भुऱ्या बद्दलच्या विविध रंजक गोष्टी सांगत होता. महादा संमोहित होऊन त्या म्हाताऱ्याच्या गोष्टी ऐकत होता परंतु तरीही त्याचा भुताखेतांच्या त्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. पण त्या म्हाताऱ्याच्या गोष्टी मात्र त्याला ऐकाव्याश्या वाटत होत्या.त्याला त्या म्हाताऱ्याच्या गोष्टींमध्ये फार अतिशयोक्ती वाटत होती,म्हणून मग त्याने त्याची फिरकी घ्यावी या हेतुने त्या म्हातार्‍याला म्हटले,“आज्या,तुम्ही इतक्या वेळंपसून मलं भुर्‍याच्या गोष्टी सांगत आहात….तुम्हालं कस काय माहित त्याच्या इतक्या गोष्टी..? कोण आहात तुम्ही ?”

तसा विजेच्या वेगाने तो म्हातारा जाग्यावरच गर्रक्कन कलला….. त्या म्हाताऱ्याने महादाकडे बघितले…आपल्या जाड्याभरड्या पण आसमंत चिरून टाकणाऱ्या अक्राळ विक्राळ आवाजात ओरडला…..

“भुरा…..ऽऽऽ!”

तसं महादानेही त्या म्हाताऱ्याकडे बघितले.त्या दोघांची नजरा नजर झाली. ते बघून अंधारही थोडा बाजूला सरकला होता. महादाने त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात बघितले….. आणि तो त्याच्या डोळ्यात हरवूनच गेला….त्याला एखाद्या खूप खोल अशा घननिळं सागरामध्ये विहरत असल्याचे भासले.आता महादा त्या म्हाताऱ्याकडे समाधानी मुद्रेने स्तब्धपणे बघत उभा राहिला होता.अचानक तो म्हातारा लोप पावला आणि त्याच्या जागी आता एक गोंडस आणि सुंदर असं बोधल्या-बोधल्या आणि गुबरू गुबरू बाळ महादाला दिसू लागलं.महादा यंत्रासारखा हसत हसत त्या बाळाकडे गेला. आणि मुग्ध झालेल्या चेहऱ्याने त्याच्या डोळ्यात बघत त्याच्यासमोर समाधानाने आडवा पडला. अचानक ते बाळ मोठं व्हायला लागलं होतं….! मोठं….,एवढं मोठ्ठं की ते आता बाळराक्षसच झालं होतं.त्या बाळराक्षसाने आपल्या हाताच्या वाढलेल्या नखांनी महादाच्या अंगावर ओरबडले आणि आपला भला मोठ्ठा राक्षसी पाय महादाच्या अंगावर टाकत त्याला चिरडून टाकले.

खूप दिवसांनी पुन्हा एकदा सव्वा घटकेसाठी का होईना पण भुर्‍याला पोटभरून खेळण्याचा आनंद मिळाला होता…!

©गोडाती बबनराव काळे, लातुर
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..