प्रत्येक कॉलेज मध्ये एक ‘ती’ असतेच जी सर्वांची जान असते. बरेच जण अभ्यास सोडा तिची एक झलक पाहण्यासाठी कॉलेज मध्ये येतात..अशीच एक ‘भूविका’ ….जिच्या नावातच स्वर्ग दडलंय…त्या स्वर्गाच्या फेऱ्या मारायला कोणाला नाही आवडणार बरं… एखाद्या लावण्यवती सारखं तिचं सौंदर्य, चेहऱ्यावर विलक्षण तेज, टपोरे बोलके डोळे, आणि त्यात लांब सडक केसांमुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसायचं….तिच्या प्रत्येक नखाऱ्यावर फिदा होणारी हजारो मुलं दररोज कॉलेजच्या गेट समोर पिंगा घालायची. पण त्यांना भाव देणार ती कसली भुविका…..
भुविकाला आपल्या दिसण्याचा कधीच गर्व नव्हता. एकदा कॉलेजात प्रवेश केला की लेक्चर पूर्ण करूनच ती घरी जात असे…. नावा प्रमाणेच ती अभ्यासातही अत्यंत हुशार…ब्रेन वीथ ब्युटीच मूर्तिमंत उदाहरण….शिवाय तिने कधी आपल्या मर्यादेची सीमा ही ओलांडली नव्हती. कला शाखेतून ९९ टक्के गुण मिळवत राज्यातून ती प्रथम आली. या घवघवीत यशानंतर तीने आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेतली. तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते.. त्याकरिता तिने स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावण्याचे ठरवले…
भूविका आई वडिलांची एकुलती एक लेक…. आई गृहिणी तर वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करायचे…. भूविकावर त्यांचं जीवापाड प्रेम… फार वर्षानंतर त्यांना मुलं झालं होतं… त्यामुळे तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आपल्या लेकीला जपलं…..मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या भुविकाच्या घरची परिस्थिती बेताची…. पोटाची खळगी भरावी तेवढाच पगार तिच्या वडिलांना मिळायचा….. परंतु त्यांनी हार मानली नाही. लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाताला लागेल ते काम करायचे. मिळणाऱ्या अधिकच्या मिळकतीतून त्यांनी तिला क्लासेस लावून दिले. इथूनच भुविकाच्या आयएएस अधिकारी बनण्याच्या खडतर प्रवासाची वाटचाल सुरू झाली…..
आयएएस अधिकारी होणे सोपे नाही हे भूविकाला चांगले ठाऊक होते. पण या रेस मध्ये तीला अव्वल यायचे होते. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्री समीकरणातून यशाचं शिखर आपण नक्की सर करू शकतो असा तिचा विश्वास….. Effort never dies हे सूत्र ती नेहमीच लक्षात ठेवायची. तिने या करिता अभ्यासाचं शेड्युल तयार केल.
सकाळी लखलखीत उगवणाऱ्या सूर्यासोबत योगा आणि व्यायाम करत तिच्या दिवसाची सुरवात व्हायची… यानंतर चहा, नाश्ता झाला की ९ वाजता क्लासला जाण्याची लगबग… नऊ ते दोन वाजेपर्यंत क्लास चालत असे….क्लास झाला की घरी येवुन जेवण…मग अभ्यास आणि उजळणी…..संध्याकाळी आईला कामात थोडी मदत करायची आणि रात्री पुन्हा तीन तास अभ्यास…अशा प्रकारे तिचा संपूर्ण दिवस व्यस्त असायचा… अभ्यास आणि घर या पलिकडे तिच जगचं नव्हत…. तिला फक्त आपलं ध्येय गाठायच होते…आई बाबांच्या मेहनतीचे चीज करायचे होते. त्यांच्या कष्टाची तिला जाणीव होती.
भुविकाचे क्लासेस घरापासून दहा मिनिटाच्या अंतरावर होते….. त्यामुळे ती पायीच जात होती. एका गजबजलेल्या दाट वस्तीतील ‘ यश ‘ या दुमजली इमारतीत तिचे क्लासेस… त्यामुळे इमारतीच्या खाली विद्यार्थ्यांचा नेहमीच घोळका असायचा…बाकी विद्यार्थ्यांप्रमाणे ती ही क्लास सुटल्यानंतर काही वेळ गप्पा मारायची आणि मग थेट घरचा रस्ता…
सांगितल्या प्रमाणे यश या इमारती जवळ दाट वस्ती…या वस्त्तीतच एक छोटंसं समीर नावाचं किराणा दुकान…. समीर त्या दुकानात बसायचा….प्रत्यक्षात समीर आणि भुवीका ची काहीच ओळख नाही….पण समीरचे रस्त्यावरून जाणाऱ्या भुविकाकडे नेहमी लक्ष असायचे….शांत आणि हसरी भूविका त्याच्या दुकानासमोरून नेहमीच ये जा करायची…… एकदा पेन घेण्यासाठी भूविका त्याच्या दुकानात गेली. यावेळी समीरने बोलता बोलता तिला नाव विचारले… भुविकाने ही मनमोकळ्या मनाने आपले नाव सांगितले आणि तिथून निघून गेली… पण त्याच्या मनात ती घर करून गेली.
ऐन पंचविशीत शिरलेल्या समीरला लग्न करायचे होते. भुविकाला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला… त्या दिवसानंतर समीरला भूविकाची भुरळच पडली….भुविकाला या सर्व प्रकरणाची काही कल्पनाच नव्हती. ती तर स्वतःच्या स्वप्नांच्या विश्वात बुडालेली होती….
समीरच्या आईला सुंदर सून हवी होती…मग आपण हिच्याशीच लग्न करायचं का??? असा विचार त्याचा मनात फिरत होता. भूविकाची येण्या जाण्याची वेळ त्याने नोट करून ठेवली होती… याबद्दल मात्र त्याच्या आईला काहीच माहिती नव्हते… एकतर्फी तो तिच्या प्रेमात पार वेडा झाला होता….
काही महिन्यानंतर भर चौकात त्याने भुविकाला अडवून आपल्या प्रेमाची कबुली दिली….अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिला काही सुचतच नव्हते, ती घामाने ओली चिंब झाली, चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती…. एखादी व्यक्ती आपली वाट अडवते यामुळे ती घाबरली होती… तिने नकार देत माझी वाट सोड नाहीतर तुझी पोलिसात तक्रार करणार अशी धमकीच देवून टाकली…तरीही तो बाजूला होण्यास तयार नव्हता…. यानंतर भुविकाच दुसऱ्या रस्त्याने घराच्या दिशेनी निघाली.. तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला नाही…त्याकडे दूर्लक्ष करत पुन्हा आपल्या अभ्यासात मग्न झाली.
पण समीर मात्र तिच्या धमकीला घाबरला नव्हता..त्याला ती हवी होती.. यासाठी आपण वाटेल ते करणार… मी तिच्यासोबतच संसार थाटणार असे स्वप्न तो रंगवत होता.. भूविका क्लासला जातांना तो रस्त्याच्या कडेला उभा राहायचा, परंतु ती त्याच्याकडे कानाडोळा करत आपल्या सरळ वाटेने जायची…
आज क्लासचा शेवट दिवस होता.. कारण उद्या भुविकाचा पेपर..ज्या दिवसाची एवढे महिने वाट बघितली त्या स्वप्नांचं सोनं करायचा दिवस अतिशय जवळ आला होता…. नेहमी प्रमाणे आज ही भुविका क्लासला जाण्यासाठी निघाली.. पण वाटेत पुन्हा समीर आडवा आला….मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशी लग्न करायचे आहे… तिने नेहमीप्रमाणे त्याला नकार दिला.
पण समीरच्या मनात काही बरे वाईट सुरू होते….नकार ऐकताच त्याच्या डोक्यातला सैतान जागा झाला. भुविकाला काही कळण्यापुर्वी त्याने पाठीच्या मागच्या बाजूला शर्टात फसवलेली बाटली काढून तिच्या डोक, तोंडावर फेकले…. त्याने तिच्यावर ऍसिड हल्ला केला आणि तिथून पळून गेला.
आपल्यासोबत काय झाले तिला कळलेच नाही…भुविका त्या जीवघेण्या वेदनांनी विव्हळत होती. तडफडत होती… मोठमोठ्याने किंचाळत होती. तिचा आवाज ऐकुन बघ्यांची गर्दी झाली. तिचे ते लांबसडक केस पूर्ण जळाले होते…चेहऱ्यावरचे मास खाली गळून पडत होते. चेहऱ्याचा आणि छातीच्या डाव्या भागाचा कोळसा झाला होता…पण कोणाचीच तिच्या जवळ येण्याची हिम्मत झाली नाही. एकवेळ दगडाला पाझर फुटला असता…पण ह्या जिवंत माणसांच्या हृदयाला पाझर फुटला नाही… हा जिवंत समाज तिच्या वेदना निर्जीव मोबाईल मध्ये कैद करण्यात व्यस्त होता….
वाचवा..मला …वाचवा… आई .. आई……. जळतय ग माझं शरीर ….. मला पाणी द्या ……म्हणत ती ओरडत खाली पडली पण कोणीच पुढे येऊन तिच्या मदतीला धजावले नाही…. त्यातल्याच एका व्यक्तीने पोलिसांना कळवले….लागलीच पोलिस घटनास्थळी आले. त्यांच्या मागोमाग सायरन वाजत रुग्णवाहिका ही दाखल झाली…. एका निष्पाप तरुणीचा जीव वाचवण्याचा तळमळीने रुग्णवाहिका तिला घेवून झपाट्याने रुग्णालयाच्या दिशेने निघाली… बघ्यांची गर्दी ही वाढतच होती. दबक्या आवाजात लोकांची घोळके चर्चा करत होते…….
घटनास्थळी पोलिसांना भुविकाची बॅग दिसली….त्यात परीक्षेचे आयकार्ड आणि पुस्तकांसहीत मोबाईल दिसला…त्यांनी भुविकावर ऍसिड अटॅक झाल्याचे तिच्या पालकांना कळवले…हे ऐकुन तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला… ज्या लेकीला येवढ्या प्रेमाने वाढवले.. डोक्या खांद्यावर खेळवले त्या आपल्या लेकिवर ऍसिड हल्ला झाल्याचे समजताच त्यांनी टाहो फोडला… तिच्या आईची तर शुद्धचं हरपली…एखाद्या खवळलेल्या नदीच्या पुरात अख्ख गावं उध्वस्त होत तसचं या घटनेनं त्यांच पुरतं आयुष्यच उध्वस्त झालं.
कसेबसे अंगात बळ आणत तिच्या वडिलांनी आई सह रुग्णालय गाठले…..ज्या अतिदक्षता विभागात भुविकाला ठेवले होते…त्या खोलीतील तिचा रडण्याचा आवाज दूरवर येत होता… त्या दिवशी आभाळ ही दाटून आलं होत, भूविकाच्या वेदना ऐकुन आभाळाला ही अश्रू अनावर झाले होते…आपल्या पोटच्या गोळ्याच्या या वेदना ऐकुन तिच्या पालकांच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते…त्यांना तिला बघायचे होते…पण डॉक्टरांनी सध्या भेटण्यास नकार दिला….तिचे वडील डॉक्टरांपुढे हात जोडून ढसाढसा रडू लागले…. माझ्या मुलीला वाचवा…मी आयष्यभर तुमचा ऋणी राहील…. पहाड बनून तिच्या पाठीशी उभा असलेला बाप आज कोलमडून पडला होता…. आई…. आई…. म्हणत ती ओरडत होती……तिच्या या वेदना आई बाबांना असह्य झाल्या होत्या…..
माझ्या मुलीने काय वाईट केले होते कोणाचे??? तीला ही शिक्षा दिली……हा प्रश्न तिच्या वडिलांना सतावत होता…. अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या माझ्या मुलीवर का हल्ला केला??? काय दोष तिचा अश्या असंख्य प्रश्नांचा कल्लोळ त्यांचा मनात सुरू होता… तो भयावह दिवस त्यांच्या आयुष्यात कायमचा काळोख घेऊन आला . रात्रभर ते रुग्णालयातील बाकावर बसून तिला भेटण्याची वाट बघत होते…..
शेवटी पहाटे डॉक्टरांनी त्यांना भुविकाला भेटू दिले….आपल्या मुलीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले, पण त्यांनी तिला हिम्मत दिली यावेळी त्यांचा आवाज घोगरा झाला होता… भूविका एकटक आईकडे पाहत होती…तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते…परंतु त्याच उत्तर कोणाकडेच नव्हते…. आई….ए आई….. माझा पेपर होता आज……काय झालं ग हे माझ्यासोबत……..मला जगायचं आहे….मला जगायचं आहे…..आयएएस अधिकारी व्हायच आहे….सतत बडबडत होती….तिला मृत्यूला मात द्यायची होती….तीन दिवस उलटून गेले…भुविकावर काही प्रसिद्ध डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू होते….
परंतु ऍसिड हल्ल्यामुळे तिच्या एका डोळ्याने अंधुक अंधुक दिसू लागले होते…. तिच्या अन्न नलिकेला मोठ्या प्रमाणात ईजा झाली होती…. छातीचा एक भाग पूर्ण जळल्यामुळे शरीरात संक्रमण वाढले होते……डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते……पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ही पाच दिवसानंतर एका होतकरू मुलीची मृत्यूशी झुंज संपली…..आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी भुविका अनेक प्रश्न मागे ठेवून गेली… एकुलती एक लेक काळाच्या पडद्याआड निघून गेल्याने तिचे आई वडील बेशुद्ध झाले होते…..
मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष…अद्याप समीर फरारच…आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत…… समीर सारखी सडकी मानसिकता असलेली लोक काय थेट आकाशातून खाली येतात का?? नाही ना.. ती तुमच्या माझ्या सारख्या समाजातीलच असतात… कोणाच्या तरी घरी जन्माला येतात …अश्या मानसिकतेला वेळीच मुळासकट उपटून फेकायला हवे …तेव्हाच अश्या घटनांना आळा बसेल….
— सौ. शिल्पा पवन हाके.
Leave a Reply