त्याचे स्वप्नाळू डोळे कुठेतरी दूर पहात असत.
त्याचं बोलणं दर्दभरं, परिणामकारक परंतु एखाद्या स्त्रीच्या बोलण्यासारखं मऊ होतं.
ह्या सर्वावरून असं वाटायचं की कुठलं तरी गहिरं दु:ख त्याच्या आत दडलं आहे.
तो बिबट्याला सर्कशीत खेळवणारा धाडसी माणूस होता.
पण तो तसा वाटत नसे.
त्याची उपजीविका त्यावर अवलंबून असल्यामुळे तो खूप प्रेक्षकांसमोर खेळ करणाऱ्या बिबट्यांच्या पिंजऱ्यात शिरत असे आणि आपल्या हिंमतीचे प्रदर्शन करून त्या प्रेक्षकांना थरार अनुभवायला देत असे.
त्यासाठी त्याचे मालक त्याला तसाच साजेसा पगार देत असत.
मी म्हटलं तसा तो बिबट्यांचा खेळ करणारा वाटत मात्र नसे.
त्याची छोटी कमर, निरूंद खांदे, फिकट त्वचा आणि किडकिडीत देह, ह्यांमुळे तो खूप दु:खाने व्याकुळ वाटण्यापेक्षा, त्याच्या दुःखांत गोड हळवेपण जाणवे.
त्या दुःखाचं ओझं तो तसंच सहजपणे वागवतोय असं वाटे.
एक तास मी त्याच्याकडून एखादी गोष्ट मिळवायचा प्रयत्न करत होतो परंतु त्याची कल्पनाशक्तीच कमी असावी.
त्याला त्याच्या कामांत रोमांचक असे कांही वाटतच नव्हते.
त्यांत कांही हिंमतीचं काम वाटत नव्हतं, थरार वाटत नव्हता.
उलट तें एक कंटाळवाणे जीवन वाटत होते.
सिंह, हो, त्याने सिंहाशी दोन हात केले होते.
त्यांत कांही विशेष नव्हतं.
फक्त तुम्ही भानावर राहिलांत तर फक्त एका काठीच्या सहाय्याने तुम्ही सिंहाला गप्प करू शकतां.
एका सिंहाशी त्याने अर्धा तास लढाई केली होती. प्रत्येक वेळी सिंह चालून आला की हा भान न हरवतां काठीचा तडाखा बरोबर सिंहाच्या नाकावर लगावत असे.
मग तो नतमस्तक होऊन जवळ आला की आपला पाय त्याच्या तोंडात द्यायचा.
त्याने पाय तोंडात घ्यायला जबडा पुढे केला की पाय मागे घ्यायचा आणि पुन्हां नाकावर फटका मारायचा. बस्स.
मग आपल्या दर्दभऱ्या मऊ आवाजांत बोलतां बोलतां त्याने मला आपल्या हातावरचे व्रण दाखवले.
अनेक जखमांच्या खूणा होत्या त्यावर.
एक तर अगदी अलिकडे एका वाघिणीने त्याच्या खांद्यावर पंजा मारल्याने हाडांपर्यत खोल गेलेली जखम होती.
त्याच्या कोटाला नीटपणे रफू केलेली क्षतं मला दिसत होती.
त्याचा कोंपरापासूनचा उजवा हात मला एखाद्या मशीनमधून घालून काढल्यासारखा वाटत होता.
वाघांच्या पंजांच्या फटक्यांचा तो प्रताप होता.
तो म्हणे की ह्याचं कांही वाटत नाही फक्त पावसाळयात थोडा त्रास होतो.
अचानक कांही आठवण होऊन त्याचा चेहरा उजळला कारण जितका मी गोष्ट ऐकायला उत्सुक होतो तितकाच तो आता गोष्ट सांगायला उत्सुक दिसला.
“तुम्ही बहुतेक त्या सिंहांना नमवणाऱ्या आणि त्याचा द्वेष करणाऱ्या माणसाची गोष्ट ऐकली असेलच !” असं म्हणून त्याने समोरच्या पिंजऱ्यातील आजारी सिंहाकडे नजर टाकली.
“त्याला दांतदुखी आहे.” त्याने सांगितले व पुढे म्हणाला, “सिंहाला नमवणाऱ्याचा सगळ्यात थरारक आणि प्रेक्षकांत खूप प्रिय खेळ होता तो. तो म्हणजे सिंहाच्या जबड्यात डोकं देणं.
त्याचा द्वेष करणारा त्याचा प्रत्येक खेळ रोज पहात असे व कधीतरी तो सिंह त्याचा घांस घेईल म्हणून वाट पाही.
यथावकाश तो म्हातारा झाला, तो सिंह नमवणारा म्हातारा झाला आणि सिंहही म्हातारा झाला.
शेवटी एका प्रयोगाला त्याने पहिल्या रांगेत बसून त्याला पहावयाचे होते तें दृष्य पाहिले.
सिंहाने त्या सिंह नमवणाऱ्याचा घास घेतला.
डॉक्टरही बोलवायला लागला नाही.”
गोष्ट सांगतां सांगतां सहज त्याने आपल्या नखांवर नजर टाकली.
जर दुःखद प्रसंग सांगत नसता तर तो टिका करतोय असेच वाटले असते.
“मी ह्याला धीर धरणं म्हणतो आणि माझीही तीच लकब आहे.
परंतु मी ज्याला ओळखत होतो त्याची ती लकब नव्हती.
तो एक छोटा, बारका, चपटा, तलवारी गिळून दाखवणारा आणि तलवारी व खंजीर ह्यांचे वेगवेगळे खेळ दाखवणारा फ्रेंच माणूस होता.
स्वतःचं नांव डी व्हीले असं सांगायचा.
त्याची सुंदर बायकोही सर्कशीत होती.
ती उंच झूल्यांवरचे थरारक खेळ करत असे.
मग झूल्यावरून सुंदर डाईव्ह घेत असे व सर्वांना घायाळ करेल अशी दिलखेंचक अदा करत असे.
डी व्हीलेचा हात वाघाच्या पंजाइतकाच झपकन् हलत असे आणि तितकाच झटकन् त्याच्या रागाचा पाराही वाढत असे.
एकदा रिंगमास्टर त्याला ‘बेडुक-खाव’ की असं कांहीतरी त्याहून वाईट बोलला तेव्हां त्याने त्याला धरला व त्याला कांही सुचायच्या आंत खेंचून समोरच्या बोर्डावर नेऊन आदळला आणि सर्व प्रेक्षकांसमोर खंजीर फेंकून बोर्डावर त्याच्या जवळ दणादण मारायचा खेळ सुरू केला.
एकामागून एक खंजीर आग ओकत येत होते आणि रिंगमास्तरच्या सर्वांगाभोवती बोर्डावर इतक्याजवळ थडाथड रूतत होते की रिंगमास्तरच्या अंगावरचे कपडे आणि कांही ठीकाणची चामडीही ते छेदत होते.
विदूषकांना ते खंजीर काढून त्याला सोडवतांना खूप कष्ट पडले.
तेव्हांपासून सर्वजण डी व्हीलेपासून सावध राहू लागले आणि त्याच्या पत्नीशी शिष्टसंमत पध्दतीनेच वागू लागले.
ती खरं तर चंचल होती परंतु सर्वजण डी व्हीलेला वचकून होते.
पण एक माणूस असा होता की जो कुणालाच घाबरत नव्हता, तो म्हणजे सिंहाला नमवणारा वाॅलेस.
तोच सिंहाच्या जबड्यांत डोकं देण्याचा खेळ करत असे.
तो त्यांतल्या कोणत्याही सिंहाच्या जबड्यांत डोकं देई पण तो नेहमी आॅगस्टस नावाच्या एका विश्वासार्ह चांगल्या वागणाऱ्या सिंहाला त्यासाठी जास्त पसंती देई.
वाॅलेस, आम्ही त्याला ‘किंग वॉलेस’ म्हणत असू, कोणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीला/गोष्टीला भीत नसे.
तो खरंच राजा होता, बिलकुल अतिशयोक्ती नाही.
मी त्याला दारू पिऊन पैजेवर आंत जाऊन नाठाळ सिंहांना काठीशिवाय फक्त हातांनी वठणीवर आणतांना पाहिलं आहे.
फक्त सिंहाच्या नाकावर हाताचे ठोसे मारून तो त्याला सरळ करीत असे.
“मादाम डी व्हीले…..”
आमच्यामागे काहींतरी गलबला झाला म्हणून तो बिबट्यांचा खेळ करणारा वळला.
जोडून असलेल्या पिंजऱ्यांपैकी एकातून माकडाने दुसऱ्या पिंजऱ्यात हात घातला होता आणि तो दुसऱ्या पिंजऱ्यातल्या एका मोठ्या लांडग्याने पकडला होता व तो खेंचू पहात होता.
तो हात लवचिक असल्यासारखा लांब लांब होतोय असं भासत होतं.
त्यांच्यावर लक्ष ठेवणारा जवळपास नव्हता म्हणून बिबट्यांना खेळवणारा माणूस उठला व दोन ढांगात पिंजऱ्याजवळ जाऊन लांडग्याच्या नाकावर हातातल्या छडीने असा कांही फटका मारला की लांडग्याने माकडाचा हात सोडला व तो मागे सरला.
मग परत येऊन त्याने गोष्ट सांगण्यात व्यत्यय आल्याबद्दल माझी माफी मागणारे स्मित केले आणि जणू मधे कांही झालंच नाही, अशा प्रकारे अपुरं वाक्य पूर्ण करत आपली गोष्ट पुढे सुरू केली.
“………वॉलेसकडे पाही व वॉलेस तिच्या नजरेला नजर देई.
डी व्हीले रागाने काळानिळा होई.
आम्ही वॉलेसला सावध करायचा प्रयत्न केला पण त्याने आमचे म्हणणे उडवून लावले.
तो आम्हांला हंसत असे.
तसाच तो डी व्हीलेकडेही पाहून हंसला, डी व्हीलेला त्याच्याशी द्वंद्व करायचं होतं म्हणून.
त्याने डी व्हीलेचं डोकं धरून एका खळ असलेल्या बालदींत बुडवलं.
डी व्हीलेचा अगदी पहाण्यासारखा अवतार झाला होता; मी त्याला बाहेर यायला मदत केली.
तो अतिशय शांत होता व त्याने ना शिव्या दिल्या ना धमक्या.
मला मात्र हिंस्र श्वापंदांच्या डोळ्यांत दिसते तशी चमक त्याच्या डोळ्यांत दिसली.
मग मी माझा नेहमीचा स्वभाव सोडून वॉलेसला सावध करायचा प्रयत्न केला.
पण तो फक्त हंसला.
मात्र नंतर त्याने मादाम डी व्हीलेकडे पहायचे बंद केले.
अनेक महिने मधे गेले व मला वाटायला लागले की आपण उगाच धास्तावलो होतो.
आम्ही त्यावेळी सॅनफ्रॅनसिस्कोमधे खेळ करत होतो.
दुपारचा खेळ होता.
मोठा तंबू बायका-मुलांनी भरून गेला होता.
माझा छोटा चाकू घेऊन एकजण गेला होता, त्याला मी शोधत होतो.
चालता चालता मी मोठ्या तंबूला लागूनच असलेल्या तयारी करण्याच्या तंबूला असलेल्या छिद्रांतून आंत पाहिलं.
मला हवा होता तो माणूस तिथे नव्हता पण किंग वॉलेस तिथे समोरच संपूर्ण वेशांत सिंहाचा खेळ करायला जाण्याच्या तयारीत त्याची पाळी यायची वाट पहात उभा होता.
आंत झूल्यावर काम करणाऱ्या नवरा-बायको मधल्या खोट्या खोट्या विनोदी भांडणाची मौज तो घेत होता.
इतर सगळेही तिकडेच पहात होते.
फक्त तिथे असणारा डी व्हीले तो खेळ पहाण्या ऐवजी वॉलेसकडे तिरस्काराने व द्वेषाने पहात होता.
वॉलेस आणि इतर सहकारी त्या भांडणांत इतके रमले होते की कुणाचही डी व्हीले काय करतोय त्याकडे लक्ष नव्हतं.
परंतु मी तंबूच्या त्या छिद्रांतून पाहिलं.
डी व्हीलेने आपल्या खिशातून रुमाल काढला व चेहऱ्यावरील घाम पुसल्यासारखे केले कारण त्या दिवशी फार उकडत होते.
त्याच वेळी तो वॉलेसच्या पाठून अगदी जवळून निघून गेला.
त्याच्या नजरेत नुसताच द्वेष नव्हता तर विजयी भावनाही मला दिसली व मी चिंताक्रांत झालो.
मी मनाशी म्हणालो, “डी व्हीलेवर नजर ठेवायला हवी.”
मग जेव्हा तो तिथून जाऊन शहरांत जाणाऱ्या बसमधून गेलेला दिसला तेव्हां मी थोडा निश्चिंत झालो.
काही क्षणातच मी ज्याला शोधत होतो तो मला तिथेंच आलेला सांपडला.
एव्हाना वॉलेसचा सिंहांचा खेळ सुरू झाला होता व प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध होऊन तो खेळ पहात होता.
त्या दिवशी वॉलेसने सर्वच सिंहांना जरा जास्तच चिथावले व आवाज करायला लावले.
अर्थात म्हातारा ॲागस्टस ह्याला अपवाद होता.
तो कांही कोणत्या चिथावण्याने अस्वस्थ होणे शक्य नव्हते.
शेवटी आपल्या चाबकाचा आवाज काढून वॉलेसने ऑगस्टसला स्टूलावर विशिष्ट रितीने बसायला लावले.
मग ऑगस्टसने नेहेमीच्या आज्ञाधारकपणे आ पसरला.
त्याबरोबर वॉलेसने आपले डोके त्याच्या जबड्यांत दिले.
मग एकाएकी ऑगस्टसने जबडा मिटला आणि ‘क्रंच्’ आवाज झाला.”
बिबट्यांना खेळवणारा त्याच्या लकबीप्रमाणे उदासीनतेने हंसला, त्याच्या डोळ्यात तोच दूरस्थ भाव पुन्हां आला.
“आणि असा किंग वॉलेसचा शेवट झाला.”
तो आपल्या दर्दभऱ्या आवाजांत म्हणाला, “सगळा गोंधळ शांत झाल्यावर मला वॉलेसच्या शरीराजवळ जायची संधी मिळाली.
मी जवळ जाऊन त्याच्या डोक्याचा वास घेतला आणि तात्काळ मला शिंक आली.”
“म्हणजे त्याच्या डोक्यात ……”
मी उत्सुकतेने विचारले.
“तपकीर ! वॉलेसच्य डोक्यावर त्या डी व्हीलेने तपकीर टाकली होती.
बिचाऱ्या म्हाताऱ्या ऑगस्टसला जाणूनबूजून कांही करायचचं नव्हतं, तो फक्त शिंकला होता.”
अरविंद खानोलकर.
मूळ कथा – द लिओपार्ड मॅनस् स्टोरी.
मूळ लेखक – जॅक लंडन. (१८७६-२०१६)
तळटीपः जॕक लंडन हा प्रसिध्द अमेरिकन कादंबरीकार, कथाकार व सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक नियतकालिकांमधून कथा/कादंबऱ्या मालिका स्वरूपांत लिहिणं व लोकप्रिय करणं ह्याचं श्रेय त्याला जातं. त्याने सेलर (खलाशी) म्हणून कांही वर्षे काम केलं. त्याकाळचा अमेरिकेतला “व्हायोलन्स” अनुभवला. तो आणि जगण्याचा झगडा त्याच्या लिखाणामधे दिसून येतो. त्याने पंधरा सोळा कादंबऱ्या, सुमारे तीनशे कथा व अनेक लेख लिहिले. व्यावसायिक दृष्ट्या लिखाणावर पैसे कमवून श्रीमंत होणारा तो पहिलाच लेखक. दुर्दैवाने तो केवळ चाळीसाव्या वर्षीच मरण पावला. प्रस्तुत गोष्ट त्याच्या इतर लिखाणाहून थोडी वेगळ्या धर्तीची आहे. परंतु तितकीच प्रसिध्द आहे. आपणांस आवडेल अशी अपेक्षा आहे. अभिप्राय जरूर कळवावा.
Leave a Reply