रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण पाच-सात किलोमीट पर्यंत दुसरी दुकान नव्हती. .
सायकली राहिल्या नाही तर रिपेअरिंगची दुकाने कुठे राहतील. दुकान म्हणजे काय तर रस्त्याच्या रस्त्याच्याकडेला एका पेटी मध्ये काही स्पॅनर घेउन बसलेली एक व्यक्ती. वयाची साठी अोलांडलेली. तरीही चपळता तरूणाला लाजवेल अशी. माझा नंबर यायला एखादा तास तरी लागणार होता. काही टाईमपास हवा म्हणून गप्पांना सुरवात केली.
“काका तुमच्याकडे आता रिपेअरिंगला मोठी सायकाल येत नसेल ?. बर्याच लोकांनी आता दुचाकी वाहन घेतलेय. त्यामळे तुमचा धंदा पण मंदा झाला असेल.”
एका लहान सायकलला उलटी फिरवून काका स्पॅनरने बोल्ट खोलत होते. काका कामावर एकाग्रता ठेऊन माझ्याशी बोलायला लागले.
“फरक खूपच झाला आता. तरी थोडीफार जुनी गिर्हाईक आहेत माझी.”
हातातला स्पॅनर तसाच धरून, काकांनी समोर डोळ्यांनीच इशारा केला.
“ते बघा माझं जुनं गिर्हाईक .” समोर पाहिले तर एक गृहस्थ सायकलवर येत होते. सडपातळ बांधा. वय जवळजवळ ह्या काकांच्या वयाचे.काका पुढे सांगू लागले.
“आज हा तीस वर्षापेक्षा जुने गिर्हाईक आहे. सायकल चालवणे हा त्याचा नाईलाज नाही. हा स्वत:ची चारचाकी घेऊन फिरू शकतो. त्याच्या मुलांन कडे महागड्या बाईक आहेत. घरी दोन चारचाकी उभ्या आहेत. तरी याने सायकल चालवणे सोडले नाही .”
मला खूप आश्चर्य वाटले, त्या व्यक्तीचे सायकाल प्रेम पाहून. ती व्यक्ती जवळ येत होती. पायाने पायंडल मारत, मानेसह शरिराचे अंग विशिष्ट पध्दतीने हालत होते. सहज अंदाज काढला कुठल्या तरी गाण्यावर काकांच्या शरीराने ठेका घेतला होता. व्यक्ती जवळ आली आणि गाणेही स्पष्ट ऐकू यायला लागले.
“हम तो तेरे आशिक है सदियो पुराणे! चाहे तू माने चाहे न माने॥. .”
सायकल स्वार दुकाना जवळ थांबला .खाली उतरून त्यांनी पंप घेतला आणि सायकल मध्ये हवा भरू लागले. दुकानदार काका मस्करी मध्ये त्यांना बोलले. “म्हातारा झालास झालास आता किती सायकल चालवशील .आता आराम कर.नाहीतर एखादी टूव्हीलर घे.”
सायकलवाल्या काकांनी मंद स्मित करून, त्यांचे बोलणं स्विकारले..
“आता म्हातारा झालो म्हणून फक्त सायकलच चालवतो. पुर्वी सायकल कमी चालवायचो आणि अंगमेहनत जास्त असायची आणि गरजही होती. कारण नेहमीचे कुटूंबाची जबाबदारी. आता मुल अंगमेहनतीचं काम करून देत नाही. आता बसून खातो, नातवंड साभाळतो. परंतु कुठे बाहेर जायची वेळ आलीच तर सायकलचाच प्रवास. सायकल चालवणं बंद नाही केले. अन् करणारही नाही. सायकल चालवणं बंद केले तर पोट वाढणार, शरिर बेडाैल होणार. मग आजारही जोडिला येतील. त्यातच पथ्य आली. अजून पर्यंत जे मनाला आवडतंय ते खात आलोय, ते अन्न खाता येणार नाही. खाल्लं ते पचवण्यासाठी मेहनतही हवी शरिराला. म्हणून सायकल चालवणं बंद केले नाही .”
दुकानवाले काका पुढे सांगायला लागले. “आम्ही म्हणजे आमचा ग्रुप होता. पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र सायकलवर फिरलो असू. जोडीला मस्त सुखी मच्छी बनवून घ्यायची. भाकरी किंवा चपाती असायचीच. एकदम कमी पैश्यात फिरून व्हायचं .”
तो सायकलस्वार पुढे सांगायला लागले. “सायकल म्हणजे मेंटेनंन्स नाही. पेट्रोल कितीही वाढू द्या आम्हाला फरक नाही .दोन-तीन भाकरी खाल्या की झाले. मग दहा-बारा किलोमीटरचा अावरेज मिळतो मस्तपैकी .” मला सुरवातीला तो सायकलस्वार गाणं बोलत आला ते आठवलं .
“हम तो तेरे अाशिक है सदियो पुराने ! चाहे तू माने या चाहे न माने ॥. .”
हे त्याच्या सायकलरुपी प्रेयसीला तर नव्हते. .
-प्रभाकर पवार.
Leave a Reply