नवीन लेखन...

राजकारणात रचनात्मक काम केल्यास स्त्रियांना मोठी संधी !

भारताचाच नव्हे तर जगाचा विचार केला तरी राजकारणात महिलांचा मोठा प्रभाव पडल्याची उदाहरणे आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये महिलांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. म्यानमारच्या नेत्या ऑग सॉन स्यू की यांनी 25 वर्षाहून अधिक काळ देशाच्या लष्करी सत्तेशी लढा दिला. इंदिरा गांधींचे उदाहरण देशवासियांना माहिती आहेच.

पंढरी प्रहारने आपल्या दिवाळी अंकासाठी विविध विषयांची निवड केली. राजकारणातील स्त्री या विषयावर संपादकांनी मतप्रदर्शन करण्यास सांगितले. माझ्या मते दिवाळी अंक हे केवळ कथा – कविता, विनोदी लेख यासाठी वाचले न जाता विविध विचार प्रकट करणार्‍या साहित्यासाठी वाचले जावेत हे योग्य. मराठी भाषा समृध्दीच्या एका टप्यावर आहे. स्पर्धेच्या जगात मराठी भाषेची पीछेहाट होते आहे, अशा स्वरुपाची चर्चा केली जाते. पण माझ्या मते मराठी भाषा ही चंद्र – सूर्य तारे आहेत तोपर्यंत राहणार आहे.

आता संपादकांनी सांगितलेल्या विषयाकडे वळू या. राजकारणातील स्त्री हा विषय त्यांनी दिला आहे. मी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात सुमारे 40 वर्षे काम करते आहे. पण सत्ता हे मी साध्य मानलेले नाही, तर ते एक साधन आहे. समाजाचे बहुतेक सगळे प्रश्न सरकार नावाच्या संस्थेशी निगडीत असतात. सरकार जे निर्णय घेते त्याचे परिणाम समाजावर होत असतात. प्रत्यक्ष परिणामांपेक्षाही अप्रत्यक्ष परिणाम दूरगामी स्वरुपाच असतात. हे परिणाम पुरुषवर्गापेक्षा महिला वर्गास अधिक प्रमाणात भोगावे लागतात. भारतीय स्त्री सोशीक असते असे म्हटले जात, पण ती एकाकी असते तेव्हा तिला अन्य पर्यायच असत नाही. अशिक्षितपणामुळे हक्कांची जाणीवच नसते. त्यामुळे हक्कासांठी झगडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महिलांना हक्कांची जाणीव करुन देणे हेच काम आधी मोठ्या जिकिरीचे असत. पण एकदा महिला जागृत झाली की ती अन्यायाविरुध्द संघर्ष करतेच, पण एकंदर सामाजिक विकासातही महत्वाची भूमिका बजावते.

मी प्रारंभी म्हटले तसे राजकारण हे साध्य नव्हे, तसे सत्ता हे देखील साध्य नव्हे, पण राजकारण करणार्‍या राजकीय पक्षांनी सत्ता प्राप्त कुन सामाजिक आणि राजकीय विकास साधावयाचा असतो. सत्ता संपादन करण्यासाठी निवडणूक लढविणे ही अपरिहार्य गोष्ट असते. निवडणूक लढविण्यासाठी मानसिक धैर्य हवे असते. शिक्षण हे राजकीय नेतृत्वास अपरिहार्य नाही, त्यामुळे कोणासही राजकीय क्षेत्रामध्ये उतरता येते, पण राजकारण हा व्यवसाय मानला तर अन्य कुणाचेही प्रश्न सुटणार नाहीत; फक्त त्या व्यक्तीचे स्वत:चे जे काही प्रश्न असतील ते सुटल्यासारखे वाटतील. प्रत्यक्षात यामुळे जनकल्याण किती होईल हेही पाहणे महत्वाचे आहे.

भारताचाच नव्हे तर जगाचा विचार केला तरी राजकारणात महिलांचा मोठा प्रभाव पडल्याची उदाहरणे आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये महिलांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. म्यानमारच्या नेत्या ऑग सॉन स्यू की यांनी 25 वर्षाहून अधिक काळ देशाच्या लष्करी सत्तेशी लढा दिला. इंदिरा गांधींचे उदाहरण देशवासियांना माहिती आहेच. आज भारतात ममता बॅनर्जी, जयललिता, शीला दीक्षित या महिला मुख्यमंत्रीपद सांभाळित आहेत. दिवंगत नंदिनी सत्पथी यांनी ओरीसाचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. तर बिहारमध्ये लालूंच्या आशीवार्दामुळे त्यांच्या पत्नी राबडीदेवी स्वयंपाकघरातून थेट मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीपर्यंत पोहोचल्याचेही लोकांनी पाहिले. उमा भारती, वसुंधराराजे यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द लोकांनी पाहिली; तर देशाच्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांना संधी मिळाल्याने महाराष्ट्रीय जनतेची मान उंचावली.

आपापल्या शक्तीनुसार महिलांनी राजकारणात उत्तम कामगिरी बजावलेली आहे, पण पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना पुढे यरण्यासाठी काव्या लागणार्‍या संघर्षात त्यांची मोठी शक्ती खर्च होते. पण ज्यांना संघर्ष करायचा आहे, त्या महिलांना कोणी रोखू शकत नाही, अनंत अडचणी असतात. पहिली गोष्ट म्हणजे महिलांना संसार आणि राजकारण याचा ताळमेळ बसवावा लागतो. राजकारणात सक्रीय काम करण्याचा विचार जरी मनात आला तरी पहिला विरोध घरातूनच होतो. अपवाद राजकीय क्षेत्रात स्थापित झालेल्या घराण्यांचा म्हणता येईल. पण या घाण्यांमधूनही स्त्रीया मोठ्या संख्येने राजकारणात आल्याची उदाहरणे कमीच आहेत. उलट अनेक स्त्रियांना त्यांच्या आवडीच्याक्षेत्रात काम करण्यासाठी पहिले बंड उंबरठ्याच्या आतच करावे लागते.

चित्रपटांमध्ये राजकारणी स्त्रीची प्रतिमा काल्पनिक पद्धतीने रंगविली जाते. त्या पद्धतीची प्रतिमा पडद्यावर अभिनेत्रीने वठविली तरी वास्तव काय आहे हा प्रश्न उरतोच. शेवटी राजकारण कशासाठी करायचे याचे उत्तर देणे सोपे नाही. पण समाजातील अन्याय, अत्याचार दूर व्हावेत आणि सामाजिक सौख्य नांदावे ही प्रमाणिक भूमिका असते. पण ही भूमिकाही समाज सहजासहजी स्वीकारत नाही. वर म्हटलं तसं राजकारणात काम करणार्‍या स्त्रियांना पहिला विरोध उंबरठ्याच्या आत होतो, आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर प्रत्येक पावलावर हा विरोध सहन करावा लागतो. माझा स्वत:चा अनुभव सांगते, वैद्यकीय श्रेत्रात पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे मी प्रॅक्टीस केली. दवाखाना चालवावा, तो वाढवावा पुढे त्याचे हॉस्पीटलमध्ये रुपांतर करावे आणि छान आयुष्य जगावे असे स्वप्न (राजकारण आणि समाजकारण याची बर्‍याचदा गल्लत होते. पण या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक अशा आहेत. राजकारणामुळे जे व्यासपीठ उपलब्ध होते तिथे स्त्रियांना केवळ स्त्रियांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी प्राप्त होते. मात्र त्याचा उपयोग स्त्रिया कशाप्रकारे करुन घेतात आणि राजकीय पक्ष त्यांना तशी संधी किती देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे.) बाळगण्याचा तो काळ होता; म्हणजे 1975 चा सुमार असेल. पण महाविद्यालयीन जीवनाच्या आधीपासूनच समाजाशी माझी कुठेतरी जवळीक आहे हे समजल्यानंतर नियतीने आपल्याकडे हे काम सोपविले आहे याची जाणीव झाली आणि कुठलाही कामात झोकून देण्याची सवय आणि आपण हाताळत असलेल्या विषयात असलेला प्रामाणिकपणा आणि पोटतिडीक यामुळे अनेक विषय हाताळून त्याची तड लावण्याचे काम करता आले; ही आनंदाची गोष्ट आहे. पण काम करण्याची इच्छा झगडून मिळवावी लागते. प्रयत्न करावेच लागतात. ही संधी सहजासहजी चालून येत नाही. राजकारणातले यश म्हणजे काय याचीही प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. आपल्या आवाक्यात असणारी खुर्ची पटकावणे आणि त्या खुर्चीवर बसून कामाचा आनंद अनुभवणे हे माझ्या दृष्टीने यश नव्हे. कारण समाजाचे प्रश्न संपणारे नाहीत, उलट काळाबरोबर त्या प्रश्नांचा गुंता वाढत जातो. प्रत्येक टप्प्यावर प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करताना एका प्रश्नातून दुसरा प्रश्नही तयार होत असतो. त्यामुळे लढण्याची ही प्रक्रिया सतत चालणारी असते.

राजकारण सत्तेसाठीच असते. त्यामुळे अथक परिश्रम करुनही जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा अनेकांना, विशेषत: स्त्रियांना, वैफल्यकिंवा निराशा येण्याची मोठी शक्यता असते. राजकारणातील यश किंवा अपयश हे मुख्यत: निवडणुकीतील यशापयशावरुनच ठरवले जाते. निवडणुकीतील पराभव हा अनेक वर्षे मागे खेचणारा असतो. पण अपयशातून पुन्हा उभे रहायचे असते. स्त्रियांच्या बाबतीत ही बाब अधिक प्रकर्षाने समोर येते.

राजकारण आणि समाजकारण याची बर्‍याचदा गल्लत होते. पण या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक अशा आहेत. राजकारणामुळे जे व्यासपीठ उपलब्ध होते तिथे स्त्रियांना केवळ स्त्रियांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी प्राप्त होते. मात्र त्याचा उपयोग स्त्रिया कशाप्रकारे करुन घेतात आणि राजकीय पक्ष त्यांना तशी संधी किती देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे.

मझ्या सुदैवाने शिवसेनेची विधानपरिषद सदस्या या नात्याने गेली 10 वर्षे कामाची संधी मिळाली. ही संधी मिळण्याआधीही मी शिवसेनेचे संघटनात्मक काम केले. या कामासाठी शिवसेना कार्याध्याक्ष उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे माझे मोठे बळ ठरले. त्यापूर्वी महाविद्यालयघीन रजघीवनापासून मी सामाजिक प्रश्नांसाठी संघर्ष करीत असताना राजकारणाचाही एक भाग होतेच. पण अत्यंत कठीण आणि संवेदनशील असे प्रश्न हाताळताना हा आशीर्वाद आणि मार्गदर्शन महत्वाचे ठरते.

याबाबत मी नगर जिल्ह्यात कोठेवाडी येथे झालेल्या भयंकर अत्याचारांचे उदाहरण देईन. माणूसकीला काळिमा फासणारी ती घटना महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या दृष्टीने एक कलंक होती. ग्रामीण भागात दुर्गम ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर त्याची तड लावणे, ज्या स्त्रियांवर अत्याचार झाले त्यांना बोलते करणे, त्यांच्या पाठिशी ताकद उभी करणे, न्यायालयीन लढाई लढणे हे सोपे नव्हते. पण राजकारणात काम करणार्‍या कोणत्याही स्त्रीच्या पाठीशी जर योग्य ते पाठबळ उभे राहिले तर लढण्याचे बळ आणखी वाढते. पण त्यानंतरही समस्या आणि विरोधाचे अडथळे प्रत्येक वाटचालीत उभे असतात. अत्याचारीत स्त्रीला न्याय मिळेपर्यंत अनेकदा तिचे समाजाकडून धिंडवडे निघतात आणि तिला न्याय देण्यासाठी झटणार्‍या स्त्रियांची मोठी दमछाक होण्याचीही भीती असते. गेली 20 वर्षे शिवसेनेची महिला आघाडी कार्यरत आहे. पण महिलांना काम करण्याची खूप मोठी संधी यापुढील काळात आहे; हे मी जाणीवपूर्वक नमूद करते. शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात स्त्रियांची संख्या लक्षणीय असते; याचे कारण शिवसेनाप्रमुखांचे आश्वासक नेतृत्व.महाराष्ट्रातील स्त्रियांना शिवसेनेचा मोठा आधार वाटतो याचे कारण शिवसेनेची रोखठोक आणि स्पष्ट भूमिका हेच आहे. मी 1998 सालापासून शिवसेनेत काम करायला प्रारंभ केल्यास आता 14 वर्षे होतील. मला राजकीय, सामाजिक आणि वैचारिक सुरक्षितता याच ठिकाणी जाणवली हेही नमूद करावयाचे आहे.

राजकारणात स्त्रियांनी का करीत असताना धाडस अंगी बाणवणे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांचा नियमितपणे अभ्यास करणेही आवश्यक आहे. कोणत्याही (घराचे अर्थकारण स्त्री सांभाळते तेव्हा तिचा दृष्टीकोन बचतीचाच असतो. स्त्रीयांकडे स्थायी समिती, अर्थ समिती अशी सभापतीपदे आली आणि तिने ठरविले तर वायफळ खर्चावर तिला सक्तीने नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर सरपंच, महापौर, नगराध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना स्त्रियांना आपला प्रभाव दाखविणेही शक्य आहे.) प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर त्यास कोणी प्रतिकार केल्यास आपण निरुत्तर न होता प्रतिवाद करण्यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरतो. अनेकदा एखादा प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक व्हावे लागते. राजकारणात काम करताना ही आक्रमकता अंगी बाणवायला शिकलेच पाहिजे.

आपणास मुद्दाम सांगते की, शिवसेना महिला आघाडीची स्थापना अशा गरजेतून झाली आहे. मुंबईत चेंबुर भागात स्त्रिया स्थानिक गुंडांना कंटाळल्या होत्या. त्या धाडसाने पुढे झाल्या व त्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या स्थापनेची मागणी केली. तेथे महिलांची आघाडी स्थापन झाली. पुढे फक्त मुंबईत 227 शाखा स्थापन झाल्या. यातून काही महिला पुढे महानगरपालिकेवर निवडून आल्या. त्यांना काम करण्याची अत्यंत चांगली संधी प्राप्त झाली.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांत स्त्रियांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. पण शिवसेनेने आरक्षण नसलेल्या जागीही स्त्रियांना उमेदवारी दिलेली आहे. महत्वाचे म्हणजे अन्य पक्षातील स्त्री कार्यकर्त्या आणि शिवसेनेतील स्त्री कार्यकर्त्या यातला फरक लोकांना जाणवतो. आक्रमक असली तरी आश्वासक आणि विश्वासू ही शिवसेनेतील स्त्रियांची प्रतिमा ठळकपणे जाणवेल. याचे कारण शिवसेनेत येणार्‍या स्त्रिया सत्ता संपादन करण्याच्या हेतूने येण्याऐवजी काही सामाजिक कार्य हाती घेण्याच्या ईर्षेने येतात. शिनसेनेत अनेक स्त्रिया रोज किमान 3-4 तास पक्षासाठीच काम करतात. शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते. त्यामुळे सत्तेच्या पदांवर नजर ठेऊन येणार्‍यांचे प्रमाण कमी आहे एवढे नक्की.

आरक्षणामुळे स्त्रियांना काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एक बाब नक्की आहे की अर्थकारण स्त्रीच्या हाती असणे हे अधिक चांगले. घराचे अर्थकारण स्त्री सांभाळते तेव्हा तिचा दृष्टीकोन बचतीचाच असतो. स्त्रीयांकडे स्थायी समिती, अर्थ समिती अशीसभापतीपदे आली आणि तिने ठरविले तर वायफळ खर्चावर तिला सक्तीने नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर सरपंच, महापौर, नगराध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना स्त्रियांना आपला प्रभाव दाखविणेही शक्य आहे. पण त्यासाठी निर्धार हवा. अन्यथा सत्तेच्या पदावर स्त्री आणि कारभार पहाणारा तिचा पती अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण कोणत्याही संस्थेत प्रतिनिधी म्हणूननिवडून गेल्यानंतर आवश्यक तेवढा वेळ त्या कामासाठी देण्याने बरेच काही साध्य करता येईल, असे मला वाटते.

प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे राजकारणात स्त्रियांना टोकाची टीका सहन करावी लागते. पण त्यालाही खंबीरपणे तोंड देण्याची तयारी हवी. हल्ली विविध चॅनेलवरुन होणार्‍या विषयांवरच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. तशी अनेक स्त्रीयांना मिळालेली आहे. इथे अगदी थोड्या वेळात आपली भूमिका मांडायची असते. पण बर्‍याच वेळा आपले विचार न पटणारे वक्तेही या र्चेत सहभागी होतात. उपरोधाने, आक्रमकपणे बोलून नामोहरम करण्याचाही प्रयत्न करणारे वक्ते व राजकीय नेते महाराष्ट्रात आहेत. पण त्यांना तिथल्या तिथे उत्तर देण्यास पर्याय असत नाही. अखेर ही लोकशाहीतली चर्चा असते. पण मी स्त्री आहे म्हणून माघार घेतली असे कदापि होता कामा नये.

स्त्री आणि पुरुष यांच्यात स्पर्धा असतेच. ती थोडी नैसर्गिक स्वरुपाचीही असते. मुख्यत: निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक ताकदवान बनविलेले असले तरी स्त्री हे शक्तीचे प्रतिक आहे. ही शक्ती योग्य प्रकारे वापरली तर स्त्री कुठेही कमी नाही. राजकारणात तर मुळीच नाही. म्हणून वर्तमान स्त्रीचे आहे, भविष्यात स्त्रियांना चांगली संधी आहे, त्यांच्या कामाची गरज आहे, त्यामुळेच राष्ट्रहित आणि विकासाला वचनबद्ध होऊन परिश्रम करुन सातत्याने कार्यरत रहावे.

एक महत्वाचा प्रश्न; ज्याकडे राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रियांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तो म्हणजे अमाप स्वातंत्र्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या आणि भावी काळातील स्त्रियांची प्रतिमा. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करीत आहेत हे खरे असले तरीही स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यासह पबमध्ये जाणे, रेव्ह पार्टी करणे अशा स्वरुपाची नवी संस्कृती समाजात झपाट्याने फोफावते आहे. पबमधल्या पार्ट्यांवर धाडी पडतात तेव्हा अर्ध्यामुर्ध्या कपड्यात तोंड लपविणार्‍या मुलींची छायाचित्रे वृत्तपत्रात प्रकाशित होतात आणि या मुलींची छायाचित्रे घेण्यासाठी त्यांचा पाठलाग करणार्‍या छायाचित्रकारांचे फोटोही प्रकाशित होतात तेव्हा आपण कुठे चाललो आहोत याची कल्पना येते. प्रचंड शहरीकरण आणि समाजाच्या काही वर्गांकडे आलेल्या प्रचंड पैशाचे हे परिणाम आहेत. पण ते आता एका वर्गापुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्वच आर्थिक स्तरांपर्यंत पोहोचत आहेत. पोलिसी कारवाई हा कायदेशीर व तात्पुरता उपाय झाला! पण समाजात पसरत असलेले हे विष रोखण्याची कामगिरी स्त्रियांना आणि विशेषत: राजकारणात असलेल्या स्त्रियांना करावयाची आहे. त्यामुळे राजकारणातल्या स्त्रीयांनी केवळ सत्तेच्या राजकारणाकडे न पाहता या अत्यंत गंभीर अशा सामाजिक प्रश्नांकडे पहावे. समाजाशी विशेषत: स्त्रियांशी संवाद वाढवायला हवा.

— डॉ. नीलम गोर्‍हे
विधानपरिषद सदस्या, शिवसेना प्रवक्ता

(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..