धुकं पांघरून निश्चिन्त झोपलेल्या गंगामाईचा हेवा करीत आज सकाळी मी आशिया खंडातील सर्वात मोठ्या (वाहनचालकाने पुरविलेली माहिती) आणि नुकत्याच बांधलेल्या “गांधी सेतू ” या पुलावरून ( चालकाच्या मते तो नऊ किलोमीटर लांबीचा आहे- मला ते पटले नाही, पण मोजण्याचे साधन पटकन हाती नसल्याने मी ते मान्य केले) प्रवास केला.
तापमान ६.२ सेल्सिअस असे वृत्तपत्राने नमूद केले होते.
पाटणा व्हिजीट तिसरी – आधी वडिलांच्या कारकिर्दीत, मग आईच्या आणि आता मुलाच्या ! गांवाने कात टाकलीय. सगळी नितीश बाबूंची कृपा (इति पुन्हा चालक). रस्ते खणलेले, वाटेत अस्ताव्यस्त वाहने आणि थंडीच्या कडाक्यात जगायला निघालेली माणसे. काही वर्षांपूर्वी असेच चित्र वाराणसीला बघितलेले. बहुधा असे शहरांचे उत्खनन आता शहरांच्याच विकासासाठी अपरिहार्य झाले असावे.
आम्हांला मागे टाकत एक बस गेली. ” आगे बढेंगी बिटीया” असा सुखद नारा लिहिलेली. खरंच सरकार चालविण्याचे काम आता महिलांना द्यावे-नाहीतरी घर त्या फार निगुतीने आणि व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे चालवीत असतातच.
चालकाने कारमध्ये शिव-धून ( रमेश भाई ओझा यांची – ” ओम नमः शिवाय ” ) लावलेली होती. ही धून सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदीरात प्रथम भेटली आणि वेडावून त्यावेळी मी ती कॅसेट विकत घेतल्याचे आठवून गेले. आज गंगा-प्रवाह ओलांडून जाताना ती कानी पडत होती. थंड सकाळ एकदम शुचिर्भूत झाली.
अचानक शेजारून एक पिता आपल्या १०-१२ वर्षाच्या कन्यकेला बाईकवर घेऊन त्या थंडीतही (बहुधा) शाळेत सोडायला निघाला होता. मी चालकाला कार थोडी धीमी करायला लावली. शेवटी ती बिटीया आमच्या आगे गेली हे पाहून दूरवर गेलेले नितीशबाबू सुखावले असतील.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply