नवीन लेखन...

प्राण्यांचा जैवभार

मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे माहीत असायला हवं. विविध जातीच्या प्राण्यांची संख्या शोधताना, जीवशास्त्रज्ञ आणखी एका गोष्टीचा विचार करतात. तो म्हणजे त्या-त्या जातीच्या प्राण्यांचं पृथ्वीवरचं एकूण वजन – म्हणजेच जैवभार. इस्राएलमधील वाइझमान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील जीवशास्त्रज्ञ रॉन मिलो आणि त्यांचे इतर सहकारी गेली काही वर्षं प्राण्यांच्या विविध जातींचा पृथ्वीवरचा जैवभार अधिकाधिक अचूकरीत्या शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत, त्यांनी अलीकडेच केलेलं यावरचं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. आपल्या या संशोधनात त्यांनी संगणकाला प्रशिक्षित करून, त्याच्याच बुद्धिमत्तेद्वारे सुमारे ४,४०० जातींच्या सजीवांचा पृथ्वीवरचा जैवभार शोधून काढला आहे.

रॉन मिलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वापरलेली पद्धती ही तीन टप्प्यांची पद्धत आहे. पहिला टप्पा हा मुख्यतः संगणकीय प्रारूपाच्या निर्मितीचा होता. यासाठी त्यांनी, कोणत्याही जातीतील प्राण्यांची संख्या ज्या घटकांवर अवलंबून असते, असे विविध घटक नक्की केले. यांत त्या-त्या जातीतील प्राण्याचा आकार, त्याचं वजन, त्याचा आहार, त्याच्या प्रत्येक पिढीचा आयुष्यकाल, अशा विविध सहा घटकांचा समावेश होता. ज्या प्राण्यांच्या जातींबदद्लची ही माहिती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर त्यांची एकूण संख्या माहीत आहे, अशा सुमारे चारशे जातींची या संशोधकांनी प्रथम निवड केली. या चारशे जातींपैकी सुमारे दोनशे जातींचा त्यांनी गणिती अभ्यास करून, या सहा घटकांची प्रत्येक जातीतील प्राण्यांच्या संख्येशी आणि पर्यायानं त्यांच्या पृथ्वीवरच्या जैवभाराशी सांगड घालणारं गणिती प्रारूप तयार केलं. त्यानंतर या प्रारूपाद्वारे त्यांनी संगणकाला, या विविध घटकांवरून एखाद्या जातीचा जैवभार कसा काढायचा यांचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी या संगणकाकडून उर्वरित दोनशे जातींचा जैवभार जाणून घेतला. या उर्वरित दोनशे जातींचा जैवभार अगोदरच माहीत होता. त्यामुळे या दोहोंच्या तुलनेद्वारे या संशोधकांनी, आपल्या मूळ प्रारूपातल्या त्रुटी जाणून त्यात योग्य ते बदल केले आणि प्रारूपात अधिक अचूकता आणली. त्यानंतरच्या अंतिम टप्प्यात या संशोधकांनी, ज्या जातींतील प्राण्यांची संख्या उपलब्ध नाही, अशा सुमारे ४,४०० जातींचा जैवभार या प्रशिक्षित संगणकाकडून जाणून घेतला.

संगणकाद्वारे काढल्या गेलेल्या निष्कर्षांतून, मोठ्या आकाराच्या प्राण्यांनी, पृथ्वीवरच्या जैवभाराचा मोठा भाग व्यापला असल्याचं दिसून आलं. मात्र त्यातही एक वेगळीच गोष्ट आढळली. जमिनीवर वावरणाऱ्या सस्तन वन्यप्राण्यांपैकी, ‘आफ्रिकन सवाना एलफंट‘ या नावे ओळखला जाणारा, गवताळ भागात वावरणारा आफ्रिकन हत्ती हा सर्वाधिक वजनाचा प्राणी आहे. पूर्ण वाढीनंतर सात-आठ टन वजन असणाऱ्या या आफ्रिकन हत्तीचा जैवभारातला वाटा पहिल्या क्रमांकाचा नव्हे तर, तिसऱ्या क्रमांकाचा निघाला. पहिला क्रमांक आहे तो, व्हाइट-टेल्ड डीअर या मुख्यतः अमेरिकेत आढळणाऱ्या हरणाचा. पूर्ण वाढलेल्या या हरणाचं वजन शंभर किलोग्रॅमपर्यंतही असू शकतं. सुमारे साडेचार कोटी इतक्या संख्येत अस्तित्वात असलेल्या या प्राण्यांचं एकूण वजन, म्हणजे त्यांचा जैवभार सत्तावीस लाख टन इतका असल्याचं दिसून आलं. पृथ्वीवरील भूप्रदेशावर वावरणाऱ्या सस्तन वन्यप्राण्यांच्या एकूण जैवभाराच्या तुलनेत हा जैवभार बारा टक्के भरतो. त्यानंतर क्रमांक लागतो तो संख्येनं एकूण तीन कोटी असणाऱ्या रानडुकरांचा. तिसऱ्या क्रमांकावरचा आफ्रिकन हत्ती हा भूचर सस्तन प्राण्यांच्या जैवभारातला सहा टक्के भार उचलतो. या आफ्रिकन हत्तींची संख्या पाच लाखांच्या आसपास आहे.

या संशोधनात जमिनीवरील वन्यप्राण्यांबरोबरच जलचरांचाही समावेश केला गेला. जलचर सजीवांच्या जातींची संख्या एकूणच भूचर वन्यप्राण्यांच्या तुलनेत कमी आहे. तरीही जलचर सस्तन प्राण्यांचा जैवभार, भूचर सस्तन वन्यप्राण्यांच्या तुलनेत जवळजवळ पावणेदोनपट असल्याचं आढळलं आहे. जलचर सस्तन प्राण्यांच्या बाबतीत, फीन व्हेल या देवमाशाचा जैवभार सस्तन जलचरांच्या एकूण जैवभारापैकी सुमारे वीस टक्के भरतो. पन्नास-साठ टन वजनाच्या या फीन व्हेलची संख्या एक लाखाच्या आसपास असावी. किंबहुना सस्तन जलचरांच्या या यादीतले पहिले पाच क्रमांक हे देवमाशांच्याच विविध जातींनी पटकावले असून, या पाचही देवमाशांपैकी प्रत्येकानं उचलेला जैवभाराचा भाग हा व्हाइट-टेल्ड डीअरपेक्षा अधिक आहे. संख्येनं सुमारे एक कोटी असणारे क्रॅबइटर सील हे सस्तन जलचर सहाव्या क्रमांकावर आहेत.

एकेका जातीचा, संपूर्ण पृथ्वीवरचा जैवभार काढणं हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. कारण कित्येक जातींची या बाबतीतली पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तरीही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या अभिनव पद्धतीचा वापर करून, रॉन मिलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे काम सोपं केलं आहे. या पद्धतीद्वारे या संशोधकांनी, विविध सस्तन प्राण्यांबरोबरच मुंग्या, घुशीसारखे बिळात राहणारे प्राणी, इत्यादी प्राण्यांचा जैवभारही शोधून काढला आहे. या संशोधकांनी आपल्या या संशोधनात माणसाचाही अर्थातच समावेश केला. माणसाचा जैवभार हा जमिनीवर वावरणाऱ्या सस्तन वन्यप्राण्यांच्या तुलनेत तब्बल अठरापट भरत असल्याचं, या संशोधनानं दाखवून दिलं आहे. आकड्यांच्या भाषेत हे सांगायचं तर, आठ अब्ज माणसांनी व्यापलेल्या या पृथ्वीवर, प्रत्येक माणसामागे फक्त तीन किलोग्रॅम वजनाचे भूचर सस्तन वन्यप्राणी अस्तित्वात आहेत. माणसानं वन्यप्राण्यांना या पृथ्वीतलावरूनच ‘हुसकावून’ लावलं असल्याचं हे आकडे दर्शवतात!

(छायाचित्र सौजन्य : Larry Smith / pxhere.com / Aqqa Rosing-Asvid / Wikimedia)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..