नवीन लेखन...

बिरबलचे स्वर्गारोहण

बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरविण्यासाठी त्याचा द्वेष करणारे लोक नेहमीच काहीना काही डाव रचीत असत. परंतु बिरबलापुढे त्यांची डाळ मुळीच शिजत नसे. त्यांचे सर्व डाव त्यांच्याच अंगाशी येत व त्यांची चांगलीच फटफजिती होते.

एकदा बिरबलाच्या शत्रूनी एक नवाच डाव रचला. व त्या डावात बादशहाच्या मर्जीतला न्हावी, जो करीम, त्याला सामील करून घेतले.

त्यानंतर एक दिवस बादशहाची मर्जी पाहून त्याची दाढी घोटता घोटता करीम म्हणाला, “सरकार आपल्या पिताजींचा माझ्यावर फार लोभ होता. त्यांचं स्वर्गामध्ये कसं काय चाललं आहे, हे जाणून घ्यायची मला फार इच्छा होत आहे.” ते ऐकून बादशहा हसून म्हणाला, “अरे मुर्खा, स्वर्गातली हकिगत आपल्याला इथे कशी कळणार?”

“सरकार! आपण स्वर्गात एखादा जासूद पाठवला तर?” करीमने वस्तरा साफ करता करता विचारले.

“हे कसे शक्य आहे?” बादशहाने आरशात पहात विचारले.

“सरकार, बिरबलासारखे चतुर लोक दरबारात असल्यावर कोणतीच गोष्ट अवघड नाही.” करीम उत्तरला.

“तू म्हणतोस तेही खोटं नाही. हे काम बिरबल नक्कीच करू शकेल.” बादशहा म्हणाला. आणि बादशहाने बिरबलाला हाक मारून स्वर्गात जाऊन पिताजींची खबर आणण्याची कामगिरी त्याच्यावर सोपविली.

आपल्या शत्रूंचा कावा बिरबलाने लागलीच ओळखला व त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवायचे असे ठरवून तो नम्र स्वरांत बादशहाला म्हणाला, “सरकार, सदेह स्वर्गात जायचे तर खर्च फार येईल; शिवाय त्यासाठी पाचसहा महिन्यांचा अवधीही लागेल.”

“काही हरकत नाही. तुला हवे तेवढे पैसे खजिनदाराकडून घेऊन जा.” बादशहाने हुकूम सोडला.

बिरबलाने लगेच खजिनदाराकडून दहा हजार मोहरांची रक्कम घेतली व तो आपल्या कामगिरीला लागला.

दुसऱ्या दिवसापासून बिरबलाने आपल्या विश्वासू सेवकाकरवी आपल्या घरापासून थेट स्मशानापर्यंत एक भुयार खणण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसांत भुयार खणण्याचे काम संपले. मग बिरबलाने एक चांगला मुहर्त पाहून त्या दिवशी स्वर्गात जाण्याचा बेत जाहीर केला. आता बिरबल नक्की मरणार हे पाहून त्याच्या शत्रूंना मोठा आनंद झाला. परंतु बिरबल त्या सर्वांना पुरून उरणारा होता. ठरल्या दिवशी बादशहासकट सर्व लोक स्मशानभूमीवर जमा झाले. बिरबलाने मुद्दामच भुयाराच्या तोंडाशी चिता रचली. नंतर सर्व लोकांसमक्ष बिरबल त्या चितेवर चढला. चिता पेटविण्यात आली. ज्वाळांचे लोट उसळले. काळाकुट्ट धूर आकाशात उंच झेपावला. तेवढ्यात बिरबलाने गुपचूप भुयाराचे दार उघडले व तो आत शिरला. तेथे पूर्वीच आणून ठेवलेला हाडांचा सापळा त्याने चितेत ठेवून दिला व भुयारातून तो आपल्या घरी जाऊन झोपला.

दुसऱ्या दिवशी चितेत तो हाडांचा सापळा राजसेवकांना सापडला. तो पाहून बिरबलाचे शत्रू आनंदाने बेहोश झाले. बादशहाच्या दु:खाला मात्र सीमा राहिली नाही. बिरबलाचे गुण आठवून तो हुंदके देऊ लागला. पुढे काही दिवस लोटल्यानंतर बिरबल एका रात्री भुयारातून एकदम स्मशानात प्रकट झाला. त्याला पाहून तिथल्या डोंबाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने ती बातमी बादशहाला कळविली. बिरबल जिवंत आहे हे ऐकून बादशहाचा आनंद गगनात मावेना. त्याने बिरबलाला घेऊन येण्यासाठी रथ रवाना केला. त्या रथात बसून बिरबलाची स्वारी मोठ्या ऐटीत राजवाड्याकडे आली. बिरबलाला पाहून बादशहाने त्याला कडकडून मिठी मारली. बिरबलाला गहिवरून आले.

नंतर बादशहाने बिरबलाला मोठ्या प्रेमाने शेजारी बसवून विचारले, “काय बिरबल, काय म्हणते तुझी सफर? स्वर्गात तुला आमचे पिताजी भेटले का?”

त्यावर बिरबल आनंदून म्हणाला, “सरकार, स्वर्गाच्या सफरीची कथा काय सांगू आपणाला. आपण तर अगदी मजेत होतो तिथे. देवदूताने सोन्याच्या विमानात बसवून मला सर्व स्वर्ग दाखवून आणला. वा ! वा! काय तेथली अपूर्व शोभा! तिथला तो रत्नजडीत राजवाडा. तेथले ते रंगीबेरंगी फुलांनी नटलेले वृक्ष. ते अमृताचे झरे. वा! वा! वाहवा! आपण तर इतके खूष झालो की, तेथून परत इकडे येऊच नाही, असे वाटत होते.”

“बरं, ते राहू दे; आमचे पिताजी भेटले का तुला?” बादशहाने कुतुहलाने विचारले.

“वा! वा! सरकार, अहो त्यांना भेटण्यासाठीच तर मी तिकडे गेलो होतो. मला पाहून त्यांना मोठा आनंद झाला.”

“तिकडे सुखात आहेत ना ते?”

“वा, वा. ते काय सांगावे! स्वर्गातली सारी सुखे त्यांच्यासमोर हात जोडून उभी आहेत. पण..!”

“पण काय?” बादशहाने घाबऱ्या स्वरांत विचारले.

“पण फक्त एकाच गोष्टीची त्यांना तेथे उणीव आहे सरकार.” “कोणत्या?”

“त्यांना तिथे चांगला न्हावी काही मिळत नाही!” “मग?”

“म्हणून त्यांनी आपल्याला असा निरोप दिला आहे की, माझ्या करीमला इकडे ताबडतोब पाठवून द्या.’

आपल्या पिताजींचा हा निरोप समजताच बादशहाने ताबडतोब हुकूम सोडला-“करीम न्हाव्याला आताच्या आता चितेवर जाळून स्वर्गात पाठवा.

” बादशहाच्या हुकूमाची अंमलबजावणी ताबडतोब झाली. करीम न्हावी प्राणास मुकला, आणि बिरबलाच्या शत्रूंचा डाव त्यांच्याच अंगाशी येऊन त्यांची फटफजिती झाली.

[ ‘बालसुधा’, पुस्तक ७ वे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १९-२२]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..