भर थंडीच्या दिवसात अकबर आणि बिरबल तळ्याभोवती फेऱ्या मारत होते. बिरबलच्या मनात विचार आला की, पैशासाठी माणूस काहीही करू शकतो. बिरबलने आपल्या मनातले विचार व्यक्त केले. अकबराने तत्काळ त्याचे बोट पकडले आणि तळ्यातल्या पाण्यात बुडवले; बिरबलने चटकन आपले बोट मागे घेतले, कारण तळ्यातल्या थंड पाण्याने ते गारठले होते.
अकबर म्हणाला, “मला नाही वाटत पैशासाठी कुणी माणूस या तळ्यात रात्र काढील!”
बिरबलने उत्तर दिले, “मी खात्रीने असा माणूस शोधून काढीन.”
अकबरने बिरबला आव्हान दिले आणि त्याने खरोखर असा माणूस शोधून काढला तर आपण त्याला शंभर सोन्याच्या मोहरा बक्षीस देऊ, असे सांगितले.
बिरबलने खूप शोध घेतला, अखेर त्याला पैशाची अत्यंत निकड असलेला असा एक माणूस भेटला की जो हे दिव्य करायला तयार झाला.
तो गरीब माणूस तळ्यात उतरला. हा माणूस आपले वचन खरोखर पूर्ण करतो की नाही हे पाहण्यासाठी अकबराने त्याच्यावर पाळत ठेवण्याकरिता दोन पहारेकरी नेमले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते पहारेकरी त्या तळ्यातल्या गरीब माणसाला अकबराकडे घेऊन आले. अकबराने त्या गरीब माणसाला विचारले की, तू खरोखर रात्रभर त्या तळ्यात होतास का? त्या गरीब माणसाने उत्तर दिले, ‘होय, आपण रात्रभर तळ्यात राहिलो.’ अकबराने त्यावर त्या गरीब माणसाला विचारले, तू कशी काय त्या तळ्यात रात्र काढली?
त्या गरीब माणसाने सांगितले की, तळ्याबाहेर एक दिव्याचा खांब होता, मी पाण्यातल्या गारठ्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून एकटक त्या दिव्याकडे पहात राहिलो. अकबराने त्या गरीब माणसाला बक्षीस दिले नाही; कारण अकबराच्या मते त्या गरिबाने दिव्याची उष्णता मिळवली, आणि म्हणून त्याला थंडी वाजली नाही.अखेर तो गरीब माणूस बिरबलाकडे मदतीसाठी गेला.
दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात गेला नाही. राजाने वाट पाहिली, अखेर बिरबलाच्या घरी चौकशीसाठी नोकर पाठविला. नोकर परत आला आणि त्याने सांगितले की खिचडी शिजल्यावर बिरबल दरबारात येईल. राजाने तासन तास त्याची वाट पाहिली पण बिरबल काही आला नाही. अखेर राजाने ठरविले की आपणच बिरबलाच्या घरी जावे आणि तो काय करतो आहे ते पहावे.
राजाने पाहिले, बिरबल जळत्या लाकडांसमोर जमिनीवर बसला होता, आणि खिचडीचे भांडे पाच फूट उंचावर टांगलेले होते. राजाला आणि त्याच्या नोकराला हसे आवरेना.
अकबर बिरबलाला म्हणाला, जाळापासून एवढ्या उंचीवर भांडे ठेवल्यावर खिचडी कशी काय शिजेल?
बिरबल म्हणाला, ” अगदी याच पद्धतीने चांगल्या फर्लांगभर अंतरावरून त्या गरीब माणसाने खांबावरल्या दिव्यापासून ऊब मिळवली ना?”
राजाला त्याची चूक उमगली, आणि त्याने त्या गरीब माणसाला शंभर मोहरांचे बक्षीस दिले.
(ब्रेन टॉनिक मासिक, मे २०१३ )
Leave a Reply