नवीन लेखन...

बर्डमॅन – उदय मांद्रेकर

बर्डमॅन उदय मांद्रेकर

आमचे चोडण बेट जैवविविधतेने नटलेले आहे. त्याचे संरक्षण करणे हे आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आपण मानतो. इथल्या खारफुटी या पर्यावरणातील महत्वाचे घटक आहेत. त्यामुळेच मैलोदूर असलेले हजाराे पक्षी या बेटावर येतात. खारफुटी, वनौषधी, पक्षी, प्राणी यांनी सजलेले हे निसर्गरम्य बेट असून, गोवेकर या नात्याने आपल्याला फार अभिमान वाटतो. अशा या जैवविविधतेने सधन असलेल्या बेटावरचा नागरिक म्हणून आपण आपल्यापरीने सदैव सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीन, असे पक्षीप्रेमी उदय मांद्रेकर यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.

पक्षीदर्शनातून खुप काही शिकलो

चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो. आपण असे ठराविक मानधन वगैरे काही सांगत नाही. परंतु जे मिळतं त्यात आपण फारच समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला यावेळी आवर्जुन सांगावेसे वाटते की, आपण गेल्या सत्तावीस वर्षात या लोकांकडून भरपूर काही शिकलो आहे.

मांद्रेकर यांच्याकडे माहितीचा खजिना

उदय मांद्रेकर यांना इथल्या वनौषधी, पक्ष्यांविषयीची भरपूर माहिती आहे. आणि आपण ही सगळी माहिती इथे येणाऱ्या लोकांकडून मिळविली आहे, असे त्यांचे मत आहे. मांद्रेकर यांनी यावेळी बोलताना मजेशीर गोष्ट सांगितली. आपण रायबंदर येथील बालभारती विद्यालयात दहावीच्या वर्गात असताना अशी गोष्ट घडली की आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागण्याबराेबरच, आपण निसर्गाच्या अगदी जवळ आलो. शाळा सुटली, जास्त शिकलाे नाही, याची खंत आपल्याला आहेच. तरीही या कामात व्यस्त असल्यामुळे आपण समाधानी आहे. ९० सालची ही गोष्ट आहे. आपण शाळेत जाताना सकाळी सकाळी एकेदिवशी इंग्लंड नॉर्थव्हेल्स् येथील एक जोडपं फेरीतून उतरलं. त्याकाळी केवळ दोनच फेरीबोटी असायच्या. शाळेला उशीर होत होता. परंतु ते जोडपं कसली चौकशी करतात, याकडे आपलं लक्ष होतं. आपल्या मित्राने सांगितलं की त्यांना पक्षी अभयारण्य पाहायचे, पक्षी निरीक्षण करायचे आहे. आपल्याला हसायला आलं. चोडणमध्ये कसले आले पक्षी? इथे तर जळी स्थळी कावळेच दिसतात. असे आम्ही आपआपसात बोललो. डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य होऊन चार वर्षे उलटली होती. अशी कितीतरी लोकं तेव्हा चोडणमध्ये यायची. आपल्या एका मित्राने त्यांना पक्षी दाखवण्यास मला सांगितले. आपण शेजाऱ्यांकडून होडी घेऊन त्यांना खाडीतून घेऊन गेलो. त्यांच्याकडे मोठा कॅमेरा, दुर्बिणी होत्या. आपल्याला तर नवलच वाटले. आपण जन्मापासून या गावात आहे. आम्ही कधी नाही पक्षी बघायला फिरलो. आम्हाला ते रोजचंच वाटायचं. तर हे लोक परदेशातून आपल्या बेटावर येतात. त्या दिवसभराच्या त्यांच्या सहवासात आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या. आपण जी गोष्ट थट्टेवारी, हसण्यावरी नेलेली त्यात खुप काही आहे. त्या इंगलंडच्या जोडप्याला आपण दिवसभर बेटावर फिरवल्यानंतर त्यांना अत्यंत आनंद झाला. जाताना आपल्या हातावर पैसे ठेऊन ते गेलेही. काही दिवसांनी आणखिन काही माणसे मला शोधत शोधत घरी पोचले. असे करता करता, आपण या लोकांमध्ये ओळखीचा झालो. बाहेरून येणारी लोकं आपल्याला शोधत घरी येऊ लागली.

बोटमॅन ते बर्डमॅन

लोकं आपल्याला बोटमॅन म्हणून ओळखायची. तेव्हा माझ्याविषयी माहिती घेऊन ते आपल्याला शोधत घरपर्यंत यायचे, असे मांद्रेकर सांगतात. इथे येणारी लोकं ही पक्षीनिरक्षक असतात. काही छायाचित्रकार असतात. काही नुसताच निसर्ग पाहायला येतात. या साऱ्यांकडून आपण शिकत गेलो. निसर्गाचे वेगळे रूप कसे अनुभवायचे हे या लोकांनी आपल्याला शिकवलं. माझाच गाव कधीकाळी आपल्याला परका होता. तो आता जवळचा वाटू लागला आहे. खरं तर आपल्याला आपल्या बेटाविषयी काहीच माहिती नव्हती. परंतु आज आपल्या बेटावर आहे, ते कुठेच नाही. त्यामुळे जगभरातील पक्षीप्रेमी या बेटावर येतात. उदय मांद्रेकर आता सर्वांना बोटमॅन किंवा बर्डमॅन म्हणून परिचीत आहे.उदय मांद्रेकर सांगतात, ऑक्टोबर महिन्यात थंडीच्या दिवसात चोडण बेटावर पक्षी यायला सुरूवात होते. याच दिवसांत निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी गोव्याला भेट देतात. त्यामुळे आपल्याला पहाटेपासुनच सुरूवात करावी लागते. परंतु इतर पर्यटक केवळ निसर्ग पहायला येतात, ते जरा उशीरा येतात. आत्तापर्यंत आपण हजारो पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींना भेटलो आो.स्कॉटलँड, इंग्लँड, अमेरीका, तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातील छायाचत्रकार , पक्षी निरीक्षकही इथे येतात.

मांडवी वरददायिनी

मांडवी नदीच्या काठावर वसलेल्या या बेटावर पक्षी, वनौषधी तर आहेच शिवाय लागूनच असलेल्या एकोशीच्या खाडीत मोठ्या प्रमाणात मासे आहेत. एकतर खारफुटीवरील फळांफुलांचा मध चाखायला हे पक्षी येतात. शिवाय मोठ्या पक्ष्यांना या खाडीतले मासे मिळतात. म्हणूनच आपण म्हणतो पर्यावरणाच्या दृष्टीने चोडण बेट हे परिपोषक आहे. शाळेत शिकत असताना आपण पर्यावरण शिकलेलो. परंतु त्याचा अर्थ माहित नव्हता. आज निसर्गाने आपल्याला दृष्टी दिली आहे. पर्यावरणाविषयी, निसर्गाविषयी शिकायला मिळाल्याने आपण इथल्या साऱ्याच गोष्टींकडे हे आपले वैभव आहे, या दृष्टीने पाहातो. उदय मांद्रेकर म्हणतात, या खारफुटींमध्ये बाभळ, हिपळ, चीपळ, आल्बा, कँडेलीया, इत्यादी अनेक जातींची झाडे आहेत. या झाडं बहरायला लागली की पक्ष्यांना गोव्यात यायचे वेध लागतात. ते पुढे म्हणतात, चोडण बेटावर आतल्या बाजुला मोठी वाहने किंवा बोटी येत नाही. त्यामुळे इथे पक्षी निवांतपणे वास करतात. म्हणूनच आपण आपल्या बेटाचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मांद्रेकर म्हणाले. मांडवीने चोडण बेटाला भरभरून दिले आहे, याचेच द्योतक म्हणजे इथल्या खारफुटी. मांद्रेकर केवळ पक्षी निरीक्षणासाठीच लोकांना नेत नाही, तर फावल्या वेळेत ते खाडी स्वच्छ करून घेतात. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या, पिशव्या या नदीतील मासे आणि मगरींना घातक असतात. त्यामुळे आपण खाडी सदैव स्वच्छ ठेवतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कुटुंबियांचे सहकार्य लाभले

आपण जेव्हा शाळा साेडली तेव्हा वडिलांना फार वाईट वाटले होते. परंतु आज आपले काम पाहून ते खुश आहेत. आई वडिल तुकाराम आणि जिजाई तसेच आपली बायको उत्कर्षा यांचे आपल्याल सदैव सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शशांक भोसले यांनी आपल्यावर बनवलेला माहितीपट म्हणजे माझ्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल. मुंबईत आपले फार कौतुक झाले. आपल्या कार्याची दखल घेऊन निर्मिलेल्या या माहितीपटाला वाखाणले गेले यात अपल्याला फार आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. आपले हे कार्य आपण असेच चालू ठेवणार असे मांद्रेकर यांनी यावेळी सांगितले. उदय मांद्रेकर यांना माहितीही नाही की त्याची आज सर्वत्र ख्याती आहे.

यूट्यूबवर प्रसिध्द केलेला हा माहितीपट हजारो लोक पाहातात व त्याच्या कार्याला सलाम करतात.

— कालिका बापट 

1 Comment on बर्डमॅन – उदय मांद्रेकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..