लहानपणापासूनच मांडव्याचा समुद्र, अकरा वर्षांचा असताना वर्षभर श्रीवर्धन आणि जुनियर कॉलेजला असताना अलिबागचा समुद्र जवळून बघता आला. अमावस्या आणि पौर्णिमा असली की समुद्राला उधाणाची भरती आणि ओहोटी लागलेली दिसायची. भरतीला नेहमी पेक्षा कितीतरी वर येणारी समुद्राची पातळी आणि ओहोटी असताना खूप मागे जाणारे पाणी. चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण हे अमावसेच्या दिवशी खूप जास्त असते. अथांग समुद्राचे पाणी जर या दिवशी एवढे वरखाली होत असेल तर आपल्या मानवी शरीरातील रक्त पण या दिवशी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात उसळत असणार. एखाद्या दिवशी होणारे अपघात हे आज अमावस्या आहे म्हणून तर झाले नसावेत ना अशा कुतूहलाने शोध घेतला असता. अमावसेच्या दिवशी बहुतेक करून गंभीर आणि मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात असेच दिसून आले. योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता मनात होणारी चलबिचल यामुळेच अपघात होत असावेत आणि याला शरीरात उसळणारे रक्तच कारणीभूत आहे की असा निष्कर्ष तर नाही ना निघत असे कोणालाही वाटावे. काहीतरी शास्त्रीय कारण असल्याशिवाय अमावस्या अशुभ आहे जेणेकरून घराबाहेर पडू नये किंवा एखादे महत्वाचे कार्य हाती घेऊ नये अशी प्रथा पडली असावी. पण हल्लीच्या आधुनिक युगात अशा प्रथा पचायला खूप जड जातात.
2013 च्या चैत्र अमावसेला गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी देवाने आमच्या घरात कन्यारत्न दिले. तिच्या येण्याने सगळ्यांनाच आनंद झाला. सगळ्यांच्याच डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू तिच्या येण्याचे सुख आणि समाधान व्यक्त करत होते. डिलिव्हरी नंतर प्रियाला ओटी मधून रूम मध्ये शिफ्ट केले. अनेस्थेशियाची गुंगी अजून उतरली नव्हती. पण शेजारी नुकत्याच जन्मलेल्या मुलीला पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. नातेवाईकांना ज्यांना ज्यांना समजले ते ते बघायला येऊ लागले. माझी मावस बहीण तर ऑफिस सुटल्यावर धावत धावतच आली होती. थोड्या वेळाने प्रियाची ताई आणि मामी आली. मुलीला बघून प्रत्येकाला आनंद होत होता. ज्याचा तो येताना मिठाई आणि खायला प्यायला घेऊन येत होता. मॅटरनिटी होम मध्ये माझ्या मुलीचा जसा काही जन्मोत्सवच साजरा केला जात होता.
डिलीव्हरी नंतर अडीच तीन तास झाले असावेत प्रियाकडे बघून तिच्या मामीला काहीतरी वेगळेच जाणवले. प्रियाला काहीतरी होतेय असे तिला वाटले, हा डिलीव्हरी नंतरचा थकवा नाहीये असे तिला वाटतं असताना तिने सिस्टरला बोलावले आणि प्रियाला बघायला सांगितले तेवढ्याने पण तिचे समाधान झाले नाही. मामीने डिलिव्हरी केली त्या डॉक्टरना ताबडतोब बोलवायला सांगितले. डॉक्टर आल्यावर त्यांनी प्रियाला बघितले आणि लगेच पुन्हा ओटी मध्ये न्यायला सांगितले. नॉर्मल डिलिव्हरी नंतर अडीच तीन तासांनी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता. अडीच तासानंतर सुरु झाला होता की अगोदरपासूनच होत होता आणि कोणाला समजले नाही असा विचार करायला वेळच नव्हता. डॉक्टर ने ताबडतोब अनेस्थेटिक आणि सर्जनला बोलावून घेतले. सिस्टर ने माझ्याकडे प्रियाचे ब्लड सॅम्पल दिले आणि रक्ताच्या चार बाटल्या आणायला सांगितल्या. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर, तीन तासांनी रक्ताच्या चार बाटल्या सांगितल्यावर, मुलगी झाल्याचा आनंदात असणाऱ्या आमच्या सगळ्यांना घाम फुटायला लागला. सिस्टर ने दिलेल्या पत्त्यावरील ब्लड बँकेतून सॅम्पल क्रॉस मॅच होऊन रक्ताच्या चार बाटल्या मिळेपर्यंत सिस्टरचे दोन वेळा फोन येऊन गेले. रक्ताची खूप गरज आहे आणि ताबडतोब पाहिजे म्हणून धावत धावत येऊन रक्त सिस्टरच्या हातात द्यायच्या आत तिने आणखीन चार बाटल्या रक्त लगेचच जाऊन आणायला सांगितले. प्रियाचा मावस भाऊ श्वेतन नेमका आला होता. तोसुद्धा माझ्यासोबत ब्लड बँकेत आला पण तिथे आणखी चार ऐवजी तीनच बाटल्या मिळाल्या. इकडे प्रियाची तब्येत बिघडली म्हणून मॅटरनिटी होम मध्ये रडारड सुरु झाली, आईने घरी फोन करून भावाला बाबांना असतील तसे घेऊन यायला सांगितले. दोघेही डॉक्टर असलेल्या माझ्या मामे बहिणीला आणि भाऊंना इथला प्रकार समजल्यावर ते पण ताबडतोब निघाले. मिळालेल्या तीन बाटल्या घेऊन आल्यावर सिस्टर ने अजून एक ऐवजी आणखीन पाच रक्ताच्या बाटल्या आणायला दुसऱ्या एका ब्लड बँकेचा पत्ता दिला, हा सगळा प्रकार बघून चक्कर येऊन पडतो की काय अशी अवस्था होऊन गेली. चार चारच्या आठ आणि अजून आता चार म्हणजे बारा बाटल्या रक्त तीन तासाच्या आत हा विचार कल्पनेपलीकडे होता. आत ओटी मध्ये आणखीन एक अनेस्थेटिक आणि सर्जन असे एकूण पाच डॉक्टर होते. आत काय चालले आहे, प्रियाची परिस्थिती कशी आहे कोणीच सांगायला तयार नव्हते. आत गेलेल्या पाच डॉक्टर पैकी अडीच तासात एकदा डॉक्टर ने बाहेर येऊन सांगितले कीे आम्ही पेशंट वाचविण्याचा प्रयत्न करतोय केवळ एक टक्का आशा आहे, पेशंट 99 टक्के गेल्यात जमा आहे. प्रियाचे सगळे मामा मामी आणि दोन्ही मावश्या आल्या होत्या. भाऊ आई वडील असे सगळ्यांचा धीर सुटला. एकीकडे सगळ्यांची रडारड आणि एकीकडे रक्त आणण्यासाठी धावपळ काय करू काय नको करू काही सुचत नव्हते. ब्लड बँकेत गेल्यावर पेपर वर्क आणि ब्लड सॅम्पल ची क्रॉस मॅच होईपर्यंतचा वेळ जीवघेणा वाटत होता. रक्तासाठी इकडून तिकडे धावाधाव करताना हे काय होतेय आणि काय होईल या विचारांनी हातपाय गळून गेले होते. रक्ताच्या बाटल्या घेऊन जाईपर्यंत प्रियाला मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलला घेऊन जायचे म्हणून मामा आणि मामी आग्रह करायला लागले. आत ओटी मध्ये पाच डॉक्टर मागील तीन तासापासून प्रयत्न करत होते. पुरेसे रक्त पण मिळाले होते अशा परिस्थितीत वाशीहून मुंबईला ऍम्ब्युलन्स मधून हलवणे योग्य वाटले नाही. हिंदुजाला पोहचे पर्यन्त अर्धा ते पाऊण तास आणि तिथे जाऊन मध्यरात्री च्या वेळी सगळे डॉक्टर उपलब्ध झाले नाही तर काय करायचे. त्यामुळे आता जे होईल त्याला सामोरे जाणे भाग होते. बारा पैकी अकरा बाटल्यांमधील रक्त प्रियाला दिल्यानंतर तिचा रक्तस्त्राव आटोक्यात आला होता. माझी मामे बहीण आणि भाऊ आल्यावर तिथल्या डॉक्टरांनी त्यांना सगळं समजावून सांगितले. पोटाला कापून आत गर्भाशय आणि सगळं तपासून झालंय, असा प्रॉब्लेम होऊ शकतो असे गृहीत धरून नॉर्मल डिलिव्हरी ऐवजी सिझेरियन का नाही केले वगैरे प्रश्नाची उत्तरं शोधण्यापेक्षा ती आता धोक्याच्या बाहेर आहे. मॅटरनीटी होम मध्ये ICU नसल्याने तिला वाशीतील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये शिफ्ट करायला सांगितले. रक्त आणण्याच्या गडबडीत मॅटरनिटी होम मध्ये काय काय घडलं काहीच माहिती नव्हतं. माझी आणि प्रियाची आई माझ्या मुलीला घेऊन सुन्नपणे हताश होऊन बसल्या होत्या. प्रियाचे पपा कुठे दिसलें नव्हते पण त्यांनी त्यांच्या गावातील पीर बाबाला देवा माझा जीव घे पण माझ्या पोरीला वाचव अशी आरोळी ठोकली होती. त्यांनी गावातील पीरबाबा या त्यांच्या ग्रामदेवतेला साकडे घातले म्हणूनच प्रिया वाचली होती.
आमच्या मुलीला जन्म देऊन मृत्यूच्या दारात जाऊन तिचा पुनर्जन्म झाला होता. माझ्या मुलीला आईचे पहिले दूध घ्यायचे असताना तिची आई ICU मध्ये हळू हळू रिकव्हर होत होती. ती रिकव्हर होत असताना माझी आणि प्रियाची आई त्यांच्या नातीकडे भरल्या डोळ्यांनी बघून तिला कसतरी करून झोपवत होत्या. पुढील दीड दोन महिन्यात प्रिया पूर्ण रिकव्हर झाली.
प्रिया पूर्णपणे बरी होऊन घरी आल्यावर दहा पंधरा दिवसानी प्रियाचे पपा त्यांच्या गावावरून त्यांच्या सानपाडा येथील घरी येण्यासाठी दुपारी निघाले होते. तीन किंवा चार तासात पोहचणे अपेक्षित असताना रात्रीचे नऊ वाजले तरी पोचले नाही म्हणून त्यांची शोधाशोध सुरु झाली. बसने घरी यायला निघालेले पपा दुसऱ्या दिवशी सकाळी एक फोन आल्यानंतर रेल्वे अपघातात मृत्यू पावले असावेत अशी बातमी मिळाली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी वाशीच्या महानगर पालिकेतील शवागारात प्रियाचा भाऊ, माझे बाबा आणि प्रियाचा मावस भाऊ असे गेलो असता. जे व्हायला नको होते आणि पपांचा मृतदेह नसावा असे मनोमन वाटतं असताना. देवा माझा जीव घे पण माझ्या मुलीला वाचव अशी मागणी करून प्रियाला पुनर्जन्म मिळवून तिला पूर्ण बरी होऊन दिल्यावर, तिच्या पपांना देवाने बोलावून घेतले होते. सानपाडा दत्तमंदिर जवळ लोकल ट्रेन ची धडक लागून पपांचा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता.
बारा बाटल्या रक्त आणले होते अशा परोपकारी रक्तदात्यांची ना ओळख होती ना माहिती होती. प्रियाच्या पपांनी देवाकडे जिवाच्या बदल्यात स्वतःच्या मुलीचा दुसरा जन्मच मागून घेतला.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply