लहानांपासून वृद्धांपर्यंत… विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांचा हक्काचा मित्र म्हणजे ‘गुगल’.
वास्तविक गुगलची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ ला झाली आहे. गुगल कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस २७ सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली.
४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती. खरंतर ‘Google’चं नाव ठेवायचं होतं ‘Googol’. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे ‘Google’ असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं. त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले.
१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे गुगल असे नाव ठेवण्यात आले. सध्या गुगल जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आता जरी गूगलचा नफा प्रचंड असला तरी सुरुवातीची काही वर्षं पेज आणि ब्रिन यांना स्वतःच्या खिशातूनच गुगलचा खर्च भागवायचे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता.
गुगल हे सर्च इंजिन नऊपेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नव्हे. गुगल आपल्या डुडल साठीही प्रसिद्ध आहे. २००२ साली गुगलने पहिल्यांदा डुडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गुगल आपल्या होमपेजवर डुडल द्वारे प्रसिद्ध करते.आज आपल्या वाढदिवसाचे गुगलने डुडल बनवले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply