२०१८ च्या डिसेंबर महिन्यात आमच्या गुड्डीचा (विशाखा) विवाह झाला. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार झाला होता. सन-२०१८ साल लग्नाच्या गडबडीत कधी सरलं हे कळायच्या आत सन-२०१९ साल सुरू झालं.
गुड्डीच्या लग्नानंतर पहिलीच दिवाळी असल्यानं दिवाळ सणाच्या निमित्तानं लेकीला आणि जावई देवांग यांना घेऊन मी व सौ. वृषाली गावी, बिसुरला चार दिवस आलो होतो.
गावाकडची ओढ काही वेगळीच असते. दिवस उगवल्यानंतर पशु- पक्षी चारा मिळवण्यासाठी आकाशात भरारी घेऊन अनेक कोस दूर जातात पण दिवस मावळतीला आपल्या घरट्यात परतण्यासाठी धडपडत असतात. असंच माणसाचं आयुष्य देखील असतं.
सुरूवातीला शिक्षण, पुन्हा नोकरी निमित्त गांव सोडून दूर भटकंती करून जीवनाच्या संध्याकाळी आकाशातल्या पाखरासारखी घरट्याची ओढ लागते.
आपल्या जवळच्या लोकांना भेटण्याची उत्कंठा लागते. गावच्या पंढरीच्या मातीत पाय ठेवायला मन आसुसलेलं असतं. आपल्या गावाची आणि आपल्या माणसांची ओढ कधीच संपत नाही. अशाच ओढीनं आम्ही सगळेजण गावात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलो होतो. गप्पा करता करता माझ्या सेवानिवृत्तीचा विषय निघाला. कारणही तसंच होतं. ह्यावर्षी म्हणजे ३१ डिसेंबर – २०१९ ला मी तब्बल ३९ वर्षे पोलीस खात्यात सेवा करून निवृत्त होणार होतो.
सेवानिवृत्तीचा विषय चालला होता त्याचवेळी गुड्डी एक कागद माझ्या हातात देत म्हणाली, “पप्पा, हे बघा काय आहे? नानांनी (जयसिंग) मला आत्ताच दाखवलय.”
तिच्या हातातील कागदपाहुन माझीही उत्सुकता वाढली. पटकन तो कागद मी उघडून पाहिला आणि आश्चर्याचा धक्का बसला. तो फक्त कागद नव्हता तर मला गाव सोडण्याचा परवाना होता. गाव सोडायला परवाना लागत नाही. पण तो कागद म्हणजे सन १९७४ सालचा जिल्हा परिषद शाळा, बिसुर, सातवीचा शाळा सोडल्याचा दाखला होता.
तो दाखला पाहताच माझं मन भूतकाळात गेलं. मला तेरावं संपुन चौदावं लागलं होतं. गावात सातवी पर्यंत शाळा असल्यानं पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडावा लागणार होता. कवलापुरला रयत शिक्षण संस्थेच्या पंडीत नेहरू विद्यालयात आमची रवानगी झाली. अन् खऱ्या अर्थानं गावची नाळ तुटली.
गावात आमचं घर बेताचच होतं. गरीबीत जन्म झाला म्हणुन नशिबाला दोष न देता ध्येयाला गाठण्यासाठी जंग जंग पछाडण्याची मनाची तयारी होती. कुटुंब गरीब पण गोतावळा मोठा, म्हातारी आजी, तरणी आई, बापु भिमाभाऊ, सदाभाऊ, बब्बा, (बोधले काका) बाबी, सुमाकाकी, सुलाकाकी, कमाकाकी, ताई, माई, मिना, रूपा, दिपा, मी, गुलाब, जयसिंग, बाळु, अनिल, श्रनिवास आणि इतर असा भरगच्च संसार.
म्हातारी आई आणि तरणी आई कांड्याचा मांडा करून संसाराचा गाडा हाकत होत्या. त्या संसाराला मदत होती ती माधवनगर कॉटन मिलची व साखर कारखान्याची. कधी कधी प्रश्न पडायचा ही मिल साखर कारखाना नसता तर गावातल्या लोकांनी काय केलं असतं? खूप मोठा आधार होता त्या मिलचा, माधवनगरच्या पंचक्रोशीतली अनेक कुटुंब मिल व वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर जगत होती. गावात बोटावर मोजण्या इतक्या लोकाकंडे दहा वीस एकर जमिनी होत्या. बाकी सर्व कुटुंबाकडं फार तर चार-पाच एकर जमीन.
तिही पूर्णतः निसर्गावर अवलंबुन होती. म्हणुन गावातली बरीच मंडळी सकाळी सातच्या भोंग्याला सायकल घेऊन धावत होती.
अशा गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. आमचे तिर्थरूप बापू व चुलते सदाभाऊ, बब्बा हे फार वयातच मिलमध्ये कामाला लागले. तिघात एक सायकल वापरून रात्रं दिवस कष्ट करून त्यांनी आम्हाला शिकवलं. वाढवलं.
ह्या सर्वांना एक आधार होता तो भिमाभाऊंचा. ते मुंबईमध्ये पोलीस खात्यात हवालदार होते. नंतर फौजदार होऊन सेवानिवृत्त झाले. त्यांनी पडत्या काळात घराला मोठा आधार दिला. घरातली मंडळी खूप काबाडकष्ट करत होती. त्यांची धडपड बघुन जिवाची तगमग होत होती. वाटायचं आताच गांव सोडावा. कुठंतरी कामधंदा करावा आणि घरच्यांना सुख द्यावं. पण नुसतं वाटून काय फायदा?, वय लहान होतं, अजून शिक्षण पूर्ण नव्हतं. शिकायची उर्मी होती. त्याच बरोबर घरात व शेतात कामाला मदत करण्याची भावना मनात होती. म्हणुन आम्ही पैरा पद्धतीनं एकमेकांच्या शेतात काम करून घरच्यांची पैशाची बचत करत होतो. सकाळी सहा वाजता उठुन आम्ही जनावरांचं शेण, घाण काढुन शाळेत जात होतो.
आठवी ते बारावी पर्यंत बिसुर ते कवलापुर चालत पाच वर्षे शिक्षण घेतलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिदवाक्य” कष्ट करा व शिक्षण घ्या ह्या कर्मवीर आण्णांच्या विचारानं प्रेरीत होऊन उज्वल भविष्याचा वेध घेत होतो. घरात गरीब माणसं पण मनानं श्रीमंत होती. कठोर मेहनतीच्या बरोबर सत्याच्या वाटेवर चालण्याचे संस्कार आम्हाला आमच्या कुटुंबाकडुन मिळाले होते. ही आमच्यासाठी मोठी शिदोरी होती आणि ही शिदोरी घेऊन आम्ही आजही त्याच वाटेवर चालत आहोत.
म्हातारी आई, तरणी आई म्हणायची, “गाव सोडलात तर सुखाचे दिवस येतील.
न्हायतर जन्मभर मिलमध्ये धागे तोडत बसावं लागेल, ”
त्यांचं म्हणणं योग्य होतं. गांव सोडायचा विचार अनेकदा मनात आला “पण”? ह्या पणनं विचाराचं काहुर उठायचं जायचं तर कुठं? असा विचार करत असतांना सन १९८० साल उजाडलं. मी बारावी पास झालो. वाडवडिलांची पुण्याई फळाला आली. मला मुंबईला येण्याचा मार्ग दिसला. भिमाभाऊंच्या नजरेतुन मला माझ्या भविष्याची किरणं दिसू लागली. विचार पक्का केला मुबईला जायचं. भाऊंच्याकडे रहायचं पडेल ते काम करायचं, कष्ट करायचे आणि पोलीस खात्यात भरती व्हायचं.
“एकच ध्यास, पोलीस खात्यात भरती.” मला नशिबानं साथ दिली, मुंबईला जाण्याचं कारण मिळालं, पण प्रसंग सर्वांना कष्टमय होता. राजू, भिमाभाऊंचा मुलगा, त्याच्या पायाला जखम झाली आणि मी जून १९८० मध्ये ठाण्यात दाखल झालो. जून ते डिसेंबर सहा सात महिने भिमभाऊंनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळं मी जानेवारी १९८१ साली ठाण्याच्या मैदानावर उतरलो आणि बघता माझी पोलीस शिपाई पदासाठी निवड होऊन जालन्याला प्रशिक्षणाकरिता रवाना झालो.
त्या सहा महिन्यात बिनतोड मेहनत केली. कठोर मेहनत व प्रमाणिक पणाच्या जोरावर खात्यात भरती झालो. ठाण्यात एक श्री. गणपती मंदिर आहे. त्या मंदिरात जायचा माझा नेम कधी चुकला नाही. गणपती बाप्पाच्या कृपेने मी इच्छीतस्थळी पोहोचलो होतो. ठाण्यात येऊन भिमाभाऊ व सुलाकाकीजवळ राहुन जिवन प्रवास सुरू केला. जालना येथे ट्रेनिंगला गेला ३८९/- रू. प्रमाणे पहिल्या पगाराची सुरूवात झाली. ठाणे, विरार, पडघा, भिवंडी तालुका येथे पोस्टींग झाली. नोकरी करता करता शिक्षण घेऊन पदवीपर्यंत शिक्षण १९८६ ला पूर्ण झाले. सन १९८७ ला पोलीस उप-निरीक्षकाची परिक्षा देऊन फौजदार होण्याचं स्वप्न होतं. त्या काळात फौजदार होणं फार कठीणं होतं पण ते स्वप्न सत्यात साकारलं.
To be continued >>
व्यंकटराव पाटील
सहायक पोलीस आयुक्त
(निवृत्त)
Leave a Reply